शीतल केळकर    

मी जेव्हा ‘चतुरंग’मध्ये ‘आणि आम्ही शिकलो’ या सदराविषयी वाचलं, तेव्हा मी शिकागोला मुलाकडे होते आणि ऑनलाइन पेपर वाचत होते. वाटलं, ही संधीच आहे माझ्यासारख्यांना व्यक्त व्हायला. मी मनानं पोहोचले रीझव्‍‌र्ह बँकेत जेव्हा संगणकीकरण आलं त्या काळात. ‘कॉम्प्युटर कम्पल्सरी’ केल्यानं ट्रेनिंग आलंच आणि त्यातल्या गमतीही! ‘ए, तुझ्या स्क्रीनवर काय आलंय? माझ्या स्क्रीनवर असं दिसतंय.. मागे कसं जायचं गं? काय गं, नाही जमत!’ अशी आमची आपापसात चर्चा होत असे. टेन्शन असायचं, पण ऑफिसबाहेर पडलो की एकमेकांना कॉम्प्युटर चालवताना आलेल्या समस्या ऐकून हसूही आवरत नसे. कारण सुरुवातीला काही समजतच नव्हतं. अनुभवी वरिष्ठांनी कानमंत्र दिला, की प्राधान्यानं कॉम्प्युटर ‘ऑन’, ‘ऑफ’ करणं, ‘बेसिक प्रोग्रॅम’ वापरणं आणि ‘की बोर्ड’ शिकून घ्या. बस्स, जिवात जीव आला आणि ट्रेनिंग संपवून त्यात पारंगतही झालो इतका त्यात रस वाटू लागला होता. इमाने इतबारे नोकरी संपवून निवृत्त झाले.  नेमका तेव्हाच माझ्या साठाव्या वाढदिवसाला पतीनं दिलेला स्मार्टफोन हाती आला. तोपर्यंत मी साधा मोबाइलसुद्धा वापरला नव्हता. एकदम ‘टचस्क्रीन स्मार्टफोन’च! पण उपयोग काय! मी मुलाला म्हटलं, ‘‘त्यावरून साधा फोन कसा करायचा तेसुद्धा कळत नाहीये!’’

Son Post Father marksheet
वडिल म्हणायचे, “पोरा परिक्षेत पास हो”, मुलानं वडिलांचीच दहावीची मार्कशीट केली व्हायरल; VIDEO पाहून व्हाल हसून लोटपोट
Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
foreign girl looking for indian husband
VIDEO : “मला भारतीय नवरा पाहिजे” विदेशी तरुणी शोधतेय लग्नासाठी मुलगा, व्हिडीओ होतोय व्हायरल
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”

 ‘‘अगं, लॅपटॉप वापरणारी तू असं म्हणतेस?..’’ इति लेक. ‘‘संगणकावरचे प्रोग्रॅम ऑपरेट करणं वेगळं. बेडकीला समुद्रात टाकलं की कसं होईल त्यातली गत झालीय!’’ माझी शब्दफेक. पण त्यावर ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..’ हे लेकाचं प्रत्युत्तर तयार होतं. अशा रीतीनं वाळूचे कण न रगडता, मोबाइलवर बोटं चालवायला मी सज्ज झाले.

मग मुलानं मोबाइलवरची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय ते सांगितलं, ‘व्हॉटस्अ‍ॅप’ डाऊनलोड करून ते कसं वापरायचं याचं बोधामृत पाजलं. मग काय! सुज्ञास सांगणे न लगे. ज्या कुणाचे माझ्याकडे फोन नंबर्स होते त्यांच्याकडे व्हॉटस्अ‍ॅप आहे का ते शोधलं आणि ज्यांच्याकडे नव्हतं, त्यांना ते अ‍ॅप डाउनलोड करायला सांगून जणू काही ‘व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटी’मध्ये प्रवेशच घेतला! सगळय़ाचीच देवघेव सुरू झाली. हे काही एका चुटकीत नाही जमलं बरं! ‘टच स्क्रीन’मुळे मोबाइलवर हात बसायलाच वेळ लागला. पण व्हॉटस्अ‍ॅप मेसेजिंगमुळे एकमेकींना आपल्या शंका विचारू लागलो. कोण म्हणत असे, ‘‘मेसेज करायला जमत नाही. अर्थपूर्ण वाक्य पुरं व्हायच्या आत सेंड होतं’’ मग एखादी मेसेजिंगमधली वाकबगार इतरांना टिप्स देत असे. मग काय, कुणी सेल्फी, कुणी ‘गुड मॉर्निग’चे मेसेज, कुणी रेसिपी पाठवायला सुरुवात केली. आधी ‘युटय़ूब’सुद्धा माहीत नव्हतं. ते मोबाइलवर कसं आणायचं कळत नव्हतं. मग त्याची शाळा! यूटय़ुबवर सगळय़ाची उत्तरं मिळत होती.

एकदा मला मैत्रिणीचा मेसेज आला. ‘‘अगं, रेखाचा वाढदिवस आहे, तिला शुभेच्छा पाठव.’’ मला कळेना, हिच्या बरे वाढदिवस लक्षात राहतात. मग तीच म्हणाली, की ‘‘फेसबुकचा मेसेज आला होता त्याची आठवण द्यायला.’’ मग फेसबुक, मेल, गूगल सर्च, जीपीएस हे व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटीमधूनच शिकलो. मोबाइल हाताळायचा चाळाच लागला. एकमेकींना व्हॉटस्अ‍ॅप कॉल, व्हिडीओ कॉल करू लागलो. त्याचमुळे मला ‘मेमरी क्लब’ जॉईन करता आला. अमेरिकेतल्या नातीला रोज बघायचं सुख लाभलं. तिचा सातासमुद्रापार साजरा होत असलेला वाढदिवस मी इथे बसूनही पाहिला, तेव्हा ही अ‍ॅप्ससुद्धा एक गरजच आहे, हे मनोमन पटलं.  

   त्यात आला करोना. टाळेबंदी लागली आणि सर्व काही ऑनलाइन शिकायची वेळ आली. ऑनलाइन पेमेंट, ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन वस्तू ऑर्डर करणं, हे ज्येष्ठांना शिकवणारे चक्क क्लासही आहेत हे कळलं. हे क्लासदेखील ऑनलाइनच होते! ‘काळाबरोबर शिकतो तो शहाणा’, ‘काळाच्या बरोबरीनं चालतो तो आनंदी आणि स्मार्ट’, ‘चांगलं जगायचं असेल, तर मानसिकता बदला’, ‘नाही येत, नाही जमणार, हा ‘अ‍ॅटिटय़ुड’ बदला’ हे शुभसंदेश असेच मोबाइलवर वाचले होते, ते आठवून गेले. मुलाच्या मदतीनं, एटीएम कार्ड वापरून या क्लासची फी ऑनलाइन भरली. त्या क्लाससाठी ‘झूम मीट’ कसं वापरायचं हे शिकणं आलं. त्यात लागोपाठ दोन दिवस एकच लेक्चर असायचं आणि आदल्या दिवशी आलेल्या समस्या (ज्या व्हॉटस्अ‍ॅप युनिव्हर्सिटीमध्ये सोडवल्या जायच्या नाहीत), त्या दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये सोडवल्या जायच्या. सुरुवातीला नाटकाची वा रेल्वेची तिकिटं ऑनलाइन बुक करताना इतका वेळ लागायचा, की मला वाटायचं एवढय़ात प्रत्यक्ष जाऊन तिकीट काढून आलो असतो! पण म्हणतात ना, practice makes the man perfect. हळूहळू मी सर्व ‘ट्रान्झ्ॉक्शन्स’ शिकून त्यात ‘एक्सपर्ट’ होत गेले! त्या वर्षीचा गणपती उत्सव ऑनलाइन सामान मागवून, झूम मीटवर आरत्या करून साजरा झाला आणि दर्शनाचा लाभ कुटुंबातल्या सगळय़ा सदस्यांना असा मिळाला. (गणपतीची मूर्ती आणायला मात्र प्रत्यक्षच जावं लागलं ती बाब अलाहिदा.) अर्थात या सगळय़ात मुलाची मदत घ्यावी लागतच होता. आवश्यक सगळं शिकलो असं वाटून कृतकृत्य झाल्यासारखं वाटत होतं. करोनाची भीती गेल्यावर शिकागोला आलो. मग सुनेची शिकवणी. सगळय़ा ऑनलाइन साइट बघताना काय काळजी घ्यायची, ‘http’ आणि ‘https’ यातला फरक, सर्च इंजिनवर कसं शोधायचं ते तिनं सांगितलं. शिकागोत बाहेर पडताना

‘weather’ बघणं आवश्यक असतं. ते बघू लागलो.  पुढे नातीनं कळस केला! ‘आयफोन’मधली मनोरंजनासाठीची अ‍ॅप्स कशी वापरायची, फोटोग्राफी करून फोटोत याची टोपी त्याला कशी लावायची, डेटा ‘क्लाऊड ट्रान्सफर’ कसा करायचा, हे तिनं मला इतकं छान शिकवलं, की व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप्सवर माझा भावच वधारला. तिनं जणू माझ्या ‘टेकसॅव्ही’ केकवर चेरीच ठेवली होती!