– अलिमा पठाण

मी पूर्वाश्रमीची अमृता अरुण घोलप. १५ वर्षांपूर्वी माझ्याच एका निर्णयामुळे अमृताची ‘अलिमा पठाण’ झाले. १९ वर्षांची मी माझ्या घरासमोर राहणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडले. प्रेमात पडताना आमच्या दोघांचे धर्म, अशा लग्नाचे काय सामाजिक परिणाम होऊ शकतात, याचा काहीच विचार केला नव्हता. पण हळूहळू वास्तवाचं भान येऊ लागल्यावर हे नातं जर टिकवायचं असेल, फुलवायचं असेल, तर लग्न करण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात येऊ लागलं होतं. सगळय़ांचा विरोध पत्करून आम्ही दोघांनी लग्न केलं. तिथूनच सुरूवात झाली आमच्या दोघांच्या संघर्षांची.

माझा नवरा गेली २० वर्ष बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. पण करोना आणि टाळेबंदीचे परिणाम बांधकाम क्षेत्रावरही खूप झाले. या परिस्थितीचा परिणाम पगारावर झाला, त्यामुळे नोकरी सोडावी लागली. या परिस्थितीमध्ये काय करावं हा सगळय़ात मोठा प्रश्न समोर होता. परिस्थितीवर मात तर करायची होतीच. अशा वेळेस आम्ही दोघांनी पुढाकार घेऊन सोसायटय़ांमधून ‘ऑनलाइन’ पद्धतीनं ऑर्डर घेऊन भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पण हे पुरेसं नाही हेदेखील लक्षात येत होतं. मग दोघांनी खूप विचार करून केटरिंगचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज आमचा व्यवसाय यशस्वीरीत्या सुरु आहे. परंतु हा सुदिन दिसण्यामागे आमच्या दोघांचा एकमेकांच्या साथीनं केलेला १५ वर्षांचा संघर्ष आहे. हा संघर्ष सोपा नव्हता. मानसिक, आर्थिक, भावनिकदृष्टय़ा कसोटी पाहणारा होता.

आमच्या प्रेमाची किंमत फक्त आम्हालाच नाही, तर आमच्या घरच्यांनादेखील मोजावी लागली. एका कर्मठ ब्राह्मण घरातली मुलगी तितक्याच कर्मठ मुसलमान कुटुंबात सगळय़ांचा विरोध पत्करून लग्न करून जाते, ही गोष्ट कोणाच्या पचनी पडणारच नव्हती. या सगळय़ाचा परिणाम माझ्या वडिलांवर झाला. मानसिकदृष्टय़ा खचल्यामुळे ते आजारी पडू लागले, त्यातच त्यांना अल्झायमर झाला. मी लग्न केल्यानंतर वर्षभरातच ते गेले. माझ्या नवऱ्याच्या घरीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. इथे जे माझ्या वडिलांचं झालं, तेच त्याच्या आईचंही झालं. ही परिस्थिती आम्हा दोघांना फार त्रासदायक होती. आपल्या जन्मदात्यांच्या मृत्यूचं आपणच कारण आहोत की काय, ही भावना आज १५ वर्ष झाली तरी मनातून काही केल्या जात नाही. पण आमचा एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम यांनी आम्हाला आजवर तारून नेलं.

असे अनेक प्रसंग आले, ज्यात कुटुंबाची साथ दोघांनाही हवी होती, पण तेव्हा आम्ही दोघंच एकमेकांसाठी होतो. माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळेस असाच एक प्रसंग आमच्या दोघांवर आला. माझा मोठा मुलगा जन्माला आला, त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, की त्याच्या अन्ननलिकेला पीळ असून तातडीनं शस्त्रक्रियेची गरज आहे. नवऱ्याला सुट्टी घेणं शक्य नसल्यामुळे तो ऑफिसला गेला होता. मला काय करावं सुचेना. त्या वेळेस आजच्यासारखे मोबाइल फोनदेखील नव्हते. मी विचार करत बसले होते. डॉक्टरांनी येऊन पुन्हा सांगितलं, की ‘वेळ घालवून चालणार नाही. आम्हाला लगेच निर्णय सांगा.’ मी नुकतीच बाळंत झालेली. पण त्याही परिस्थितीमध्ये, टाके पडलेले असताना रुग्णालयाचे तीन मजले उतरून खाली गेले, एका पब्लिक टेलिफोनवरून तिथेच असलेल्या एका माणसाकडून एक रुपया घेऊन नवऱ्याला फोन केला. नवऱ्यानं फोनवर धीर देऊन मी पोहोचतो असं सांगितलं. तशीच वर गेले आणि ‘माझ्या बाळाला ऑपरेशनला घ्या’ असं डॉक्टरांना सांगितलं. आता आठवलं तरी आम्हा दोघांना विचार येतो, की कसा निभावून नेला असेल हा प्रसंग आम्ही? यावरचं उत्तर एकच- एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास.

आजघडीला म्हणायला गेल्यास सर्व सुरळीत आहे. पण एक वेळ अशी होती, की माझं नेमकं ‘अस्तित्त्व’ काय, हा प्रश्न मला खूप सतावायचा. मी ब्राह्मण कुटुंबातून आलेली, त्यामुळे रोज वरण-भात, तूप असं सात्त्विक जेवणारी. जिच्या घरातल्या माजघरात अंडंही नजरेस पडणं मुश्किल, सगळे देवधर्म, उपासतापास मनोभावे करणारी मी एक दिवस अचानक बुरखा घालू लागते, मांसाहार करू लागते हे थोडंसं आश्चर्याचं. हे सगळं माझ्याही आकलनाच्या पलीकडचं होतं. कालांतरानं मी काही गोष्टी मनापासून स्वीकारल्या, पण अमृता ते अलिमा होण्याचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात मी दोनदा स्वत:ला संपवण्याचादेखील प्रयत्न केला. पण नवऱ्याची भक्कम साथ, त्याचं सांभाळून घेणं, या साऱ्यांमुळे आज आम्ही दोघं आमच्या पायांवर पुन्हा उभे राहू शकलो. अजूनही नातेवाईकांचा विरोध संपलेला नाही. माझं माहेर तर मला केव्हाच  दुरावलंय.. पण आमच्या संसारवेलीवर उमललेल्या दोन फुलांनी आम्हा दोघांनाही घट्ट बांधून ठेवलंय. आयुष्य जगायला एकमेकांवरचं प्रेम आणि विश्वास लागतो तो आमच्यामध्ये आहे. तोच आमच्या जगण्याचा घट्ट आधार आहे..

alimapathan123@gmail.com