आरती कदम

‘बाई आणि घरकाम’ हा चावून चावून चोथा झालेला विषय. पण तरीही तो पुन्हा पुन्हा चर्चा करायला लावणारा आहे, कारण त्याबाबत घराघरांत न झालेला आश्वासक बदल. आजही घराची मुख्य जबाबदारी बाईवरच आहे, वर्षांनुवर्ष ती सांभाळते आहेच, पण आता बाईच्या कामाची व्यवधानं वाढली, बदलली, व्यामिश्र झालेली आहेत. असं असताना तिला घरकामातून किती मोकळीक मिळते? घरकामातल्या किती कामांची जबाबदारी घरातली पुरुषमंडळी घेतात? त्यातून तिचा मनस्ताप वाढतोय की ‘क्षणभर तरी विश्रांती’ मिळतेय? हा प्रत्येक घराचा वैयक्तिक अनुभव. परंतु त्यातून समाजाच्या मानसिकतेचा अंदाज येऊ शकतो. म्हणूनच हा लेख. घराघरांतील परिस्थिती नक्कीच बदलते आहे, मात्र आजही ती ‘मदत’ याच स्वरूपाची असते. का होतंय हे आजही? बाई म्हणून, आई म्हणून, सासू म्हणून आपलं, बाईचं काही चुकतंय का?  विचार करा, व्यक्त व्हा आणि आम्हाला पाठवा.. तुमची मते chaturang.loksatta@gmail.com वर.

‘‘I need a wife, मला एक बायको हवी आहे,’’ स्त्रियांमधली ‘बेस्टसेलर’ यादीतील पहिल्या क्रमांकाची लेखिका ट्विंकल खन्ना एका मुलाखतीत सांगत होती. ‘‘स्त्रियांमधली मी पहिली असले, तरी एकूण पुस्तकांच्या ‘बेस्टसेलिंग लिस्ट’मध्ये मी कायम क्रमांक दोन किंवा तीनवरच असते.  माझ्या आधी एक किंवा दोन, नेहमीचे यशस्वी पुरुष लेखक असतात. त्यांचं काम खरंच मोठं आहे आणि त्यांच्या ‘बॉडी ऑफ वर्क’मुळेच ते तिथे आहेत. बेस्टसेलर यादीत असण्याचा आणि जेंडरचा- लिंगभावाचा काहीही संबंध नाही, हे माहीत असूनही मी हे म्हणतेय, कारण अमिश त्रिपाठींची (त्यावेळी तिच्याबरोबर मुलाखतीत सहभागी) कामाची पद्धत मला माहीत आहे. त्यांच्याच सांगण्यानुसार, ते सकाळी सहाला उठतात. मीही त्याच वेळी उठते. मग ते पूजा वगैरे करून, वृत्तपत्र वाचतात आणि मग थेट आपल्या स्टडी रूममध्ये जाऊन लिखाण सुरू करतात. ती स्पेस, ती मोकळीक मला नाही, कारण मी बायको आहे, आई आहे आणि कुटुंबाची काळजीवाहू आहे. सकाळी लवकर उठून मुलांचं सगळं आवरून त्यांना शाळेत पाठवल्यानंतरच मी मोकळेपणानं श्वास घेऊ शकते. अर्थात जरी हे सगळं मीच निवडलं असलं तरीही..’’ पुढचं ती बोलली नाही, तरी गृहीत आहे, की ‘या पुरुषांएवढा वेळ, घरातल्या काही व्यवधानांपासून मुक्तता, तेवढं मानसिक स्वास्थ्य, मला मिळालं तर मीही अधिकच्या अनेक गोष्टी करू शकते.’

अलीकडेच ट्विंकल खन्नाची ही जाहीर मुलाखत ‘युटय़ूब’वर पुन्हा एकदा पाहिली. पुन्हा पाहण्यामागची कारणं वेगळी असली तरी त्यातलं एक वाक्य मात्र पुन्हा एकदा तितक्याच तीव्रतेनं मनावर आदळलं, ‘I need a wife’. काही वर्षांपूर्वीची ही तिची मुलाखत एक यशस्वी लेखिका म्हणून घेतली जात होती. आपल्या वेगळय़ा शैलीमुळे अल्पावधीत लोकप्रिय झालेली ही लेखिका. इंग्रजी वर्तमानपत्रातलं तिचं गाजलेलं स्तंभलेखन आणि पुस्तकांच्या निमित्तानं ही मुलाखत चालू होती.  ट्विंकल खन्ना, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र, डिझायिनगचा स्वतंत्र व्यवसायही असलेली, आपल्या विचारांवर ठाम असलेली वेगळय़ा व्यक्तिमत्त्वाची स्त्री. तिच्याकडे मदतीला बाई नसणार का? नक्कीच असणार. तिच्यावर कुणी जबरदस्ती केलीय का, की तिनंच हे सगळं पहाटे उठून करायला हवं? नक्कीच नसेल. तरीही तिच्यासारख्या व्यक्तीला ही तफावत प्रकर्षांनं जाणवत असेल, तर आपल्याही कुटुंबात, घराघरांत असलेली ही असमानता तीव्रतेनं झोंबणारीच आहे. त्याची फार खोलवर रुजलेली पाळंमुळं अद्याप सैलावायला तयार नाहीत. अर्थात हे वर्षांनुवर्ष होत आहे, नवीन काहीच नाही. मग पुन्हा एकदा हा विषय का घ्यावा?     

हा विषय घेण्यामागचा उद्देश इतकाच, की या विषयावर वाचकांना बोलतं करणं. त्यांचे विचार जाणून घेणं. काळाप्रमाणे, तरुण पिढीच्या उच्च शिक्षण, उच्च पदावरच्या, ‘डिमांडिंग’ नोकऱ्यांमुळे परिस्थितीत बदल होतो आहे. मुलगे, नवरे घरकामांत ‘मदत’ करू लागले आहेत. परंतु किती? त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. आता कुठे बदल दिसू लागला आहे, पण आजही घराची मुख्य जबाबदारी स्त्रीवरच आहे. या विषयाला अनेक पदर आहेत. तरीही पुन्हा एकदा ते नव्यानं मांडण्याचं कारण म्हणजे परिस्थितीमध्ये न झालेला आश्वासक बदल. काय आहेत यामागची कारणं? मुख्य प्रश्न म्हणजे पूर्वी काय होतं या वादात न पडता आजच्या काळातही हे घडतंय तेव्हा या सगळय़ा परिस्थितीला बाई जबाबदार आहे का? परिस्थिती न बदलण्यात, किंवा कमी प्रमाणात बदलण्यात बाईचं काही चुकलं आहे का? चुकतं आहे का? याचा विचार करणं.

 काही अनुभव- तीन नामवंत ज्येष्ठ मराठी लेखिकांनी आपल्या लिखाणाचा अनुभव सांगितला तो असा, की ‘‘आजही जेव्हा मला काही लिहायचं असतं, तेव्हा, एकतर मी पहाटे, कुणी उठायच्या आत तास-दोन तास लिहायला बसते किंवा रात्री सगळी कामं आटपली, निजानिज झाली की त्यानंतर शांतपणे लिहायला बसते. मधल्या वेळात कामाचा इतका व्याप असतो, की मला कधीही शांत चित्तानं बसून लिहिता आलेलं नाही. यांच्याबाबतीत मात्र उलट! त्यांचं काही ऑफिसचं काम असलं, की ते आतल्या रूममध्ये दार लावून बसतात नि काम पूर्ण करतात. त्यांचा चहा, खाणं हे मलाच करावं लागतं. ते लाड माझ्या बाबतीत नाहीत!’’

 इतर अनुभव – ‘‘काल यांना बाजारातून भाजी आणायला सांगितली, तर यांनी कोथिंबिरीच्या दहा रुपयांच्या मोजून दहा काडय़ा आणल्या! ३० रुपये किलोचे टोमॅटो ५० रुपयांनी आणले. तेही न निवडता. मग माझी चिडचिड होते. वाटतं, आपणच आणावं.’’

 एका शिक्षिकेचा अनुभव -‘‘यांना पाहुणचाराचा इतका सोस, की कोणत्याही वेळी मित्रांना घरी घेऊन येतात जेवायला. कधी कधी तर न सांगता. आत येऊन हळूच सांगतात, ‘पिठलं भात कर पटकन! एवढय़ा रात्री कुठे जाणार ते?’ अरे पण, मला उद्या सकाळी सातची शाळा आहे, स्वयंपाक करून सगळं आवरायला किती वाजणार मला? मित्रांचा विचार केला जातो, माझा कोण करणार? पण कितीही सांगून हे ऐकत नाहीत त्यामुळे..’’

 लग्नाला दहा-बारा वर्ष झालेल्या तरुणीचा अनुभव – ‘‘आम्ही दोघंही नोकरीला जातो. स्त्रीमुक्तीचा झेंडा घेऊन मी घरकामांची आम्हा दोघांत वाटणी करते. काही दिवस सुरळीत जातात. प्रत्येक जण आपापली कामं करतं. मग याला ऑफिसच्या दौऱ्यावर जावं लागतं किंवा अन्य कामं येतात. त्या दरम्यान माझ्याकडे आलेली त्याची घरातली कामं मी मुक्तीचा झेंडा पुन्हा हातात घेईपर्यंत माझ्याकडेच राहतात.’’

 एका ज्येष्ठ बाईंचा अनुभव- ‘‘आम्ही दोघंही सेवानिवृत्त आहोत.  दोघंच घरात असतो. दोघांनीही खूप कष्ट केलेत. आता शरीर थकलंय. हे पूर्ण निवृत्त झालेत. माझी मात्र कामं आजही तशीच आहेत सगळी! कुणी आलं तरी सरबत देणं, चहा करणं हेसुद्धा हे करत नाहीत. मलाच सांधेदुखीच्या पायांनी उठून करावं लागतं.’’

  वर्षांनुवर्ष हेच घडत आल्यानं बाई सांगत असलेले वा तिनं गृहीत धरलेले मुद्दे-

 लहानपणापासून हेच संस्कार झालेत. आजीनं केलं, आईनं केलं आता आम्ही! घर सांभाळणं ही बाईचीच जबाबदारी. हे आपलं काम नाही, असा विचारही मनात येत नाही. सकाळ झाली की कामांची घाई सुरूच होते.

 बाईला मल्टीटास्किंग जमतं. ती एकाच वेळी अनेक आघाडय़ांवर काम करू शकते. घर आणि संसार ही कसरत पिढय़ान् पिढय़ा बाई करतेच आहे. 

 बाईला निसर्गानंच मुलांची जबाबदारी दिली आहे. तिच्यातले सॉफ्ट स्किल्स- माया, ममता, यामुळेच तर ती बाई आहे. तिच्याइतकी काळजी मुलांचा बाप घेऊच शकत नाही.  

 घरकाम करणं ही माझ्या एकटीची जबाबदारी नाही. कुटुंबव्यवस्था तयार होत असताना पुरुषप्रधान संस्कृतीनं ती रचना केली होती. ती बदलली जाऊ शकते, असा विचार कधी आलाच नाही. त्यामुळे हेच कर्तव्य मानते.

 आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलामुलींना लहानपणापासूनच एकत्र-समान घरकामाचे धडे दिले असते तर परिस्थिती वेगळी असती. असं वाटतं खरं, पण त्याबाबतीत काही केलं नाही हेही खरं.

 मला आवडतं स्वयंपाक करायला. गरम गरम जेवायला वाढल्यावर घरच्यांच्या तोंडावरची तृप्तता मला समाधान देते. आपल्या माणसांसाठी नाही करायचं तर मग कुणासाठी?

 घरचे करतात ना मदत, पण सांगितलं तर! स्वत:हून काही करायचं असतं हे यांच्या लक्षातच येत नाही. आणि काम केल्यावर उपकार केल्याचीच भावना जास्त असते.  

 आमच्या यांना चहासुद्धा करता येत नाही. स्वयंपाक काय करणार कपाळ!

 मी काही दिवस बाहेर गेले वा आजारी असेन तर बाहेरून जेवण येतं घरात. साधा डाळ-भाताचा कुकरसुद्धा लावून घेत नाहीत. करता येतं, पण आळशीपणा. 

 एखाद् दिवशी कामवाली आली नाही तर मलाच पदर खोचून काम करावं लागतं. आणि महिन्यातून दोन-तीन सुट्टय़ा असतातच तिच्या.

 घरात जरा जरी अस्वच्छता दिसली तर अस्वस्थ व्हायला होतं. घरातल्या इतर कुणालाही दिसत नाही ते. मग मीच करते.

 पाहुणे आले की खरी पंचाईत होते. मुक्कामाला आले तर मग खूपच काम वाढतं आणि ताणही. इतर वेळी मदत करतील हे, पण पाहुणे आले, विशेषत: त्यांच्याकडचे, की मात्र काय दाखवायचं असतं कुणास ठाऊक? अजिबात येत नाहीत मदतीला.

 आमच्या सासूबाईंना कामवाली चालत नाही. त्या करत राहातात कामं, मग मलाही उठावंच लागतं करायला. ‘वर्क फ्रॉम होम’चा तोटाच आहे हा.  

 आमच्या सासऱ्यांना बाहेरून जेवण मागवलेलं आवडत नाही. त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवायलाच लागतं.

 आमच्याकडे कर्मकांडं खूप. सगळय़ा पूजा-अर्चा, सण-उत्सव यथासांग साजरे व्हायला पाहिजेत, असा आग्रह असतो. करिअरिस्ट असलेल्या मला ते प्रत्येक वेळी कसं जमेल?

 मुलं वयात  येत आहेत. आपल्याकडे मुलांची जबाबदारी आईवरच दिली जाते. या वयातल्या मुलांच्या इतक्या विचित्र बातम्या ऐकायला मिळतात की टेन्शनच येतं. चांगलं झालं तर ठीक, पण जरा जरी बिनसलं तर आईच्या नोकरी करण्यावर गदा!

 आता रांधा-वाढा-उष्टी काढा याची सवयच झालीय. अंगवळणीच पडलंय. त्यातल्या त्यात सुख आहे ते कामं सोपी करणाऱ्या उपकरणांचं.

  ही आणि अशी अनेक कारणं, बाईला घरकामात अडकवून ठेवणारी! बाई आणि तिचं कुटुंब हा खरंतर खूप मोठा, विस्तृत विषय. मात्र हा लेख फक्त ‘बाई आणि तिचं घरकाम’ या विषयापुरता मर्यादित ठेवू. आणि कौटुंबिकच ठेवू. प्राधान्यानं शहरी आणि आर्थिक-सामाजिक मध्यम-उच्च मध्यमवर्गीय चौकटच याला ठेवू. त्याच्या इतर  कायदेशीर, सामाजिक, आर्थिक, बाजू सध्या बाजूला ठेवू.

 बाईभोवती असणारी घरकामाची करकचून मारलेली मगरमिठी सैलावते आहे का? हा या लेखाचा मुख्य विषय. आणि त्यात बाईची भूमिका काय, हा त्यातला उपविषय. अर्थात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे अनेकींचे अनुभव वेगवेगळे असू शकतात. प्रत्येकीचा मगरमिठीचा काच कमीअधिक असू शकेल.

 मात्र हा लेख त्यांच्यासाठी नाही-

 ज्यांच्या घरात १०० टक्के समानता आहे. घरकाम बरोबरीनं केलं जातं, ती नवऱ्यानं बायकोला केलेली मदत नसते, तर नवरा बायकोच्या प्रत्येक कामात बरोबरीनं सहभागी असतो. अगदी बाईप्रमाणे सकाळी उठल्यावर ठरवून घेतलेली त्यांची त्यांची कामं घरातले प्रत्येक जण नियमित करतात. 

 ‘काय मूर्खपणाचा प्रश्न आहे! घरकामाची जबाबदारी ही बाईचीच आहे. पुरुष त्यात काय करणार?’ असा ठाम विचार करणारे लोक.

 ‘नवरा नोकरी करत असेल तर पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या बाईनं घरातल्या संपूर्ण कामाची जबाबदारी घेतली तर काय हरकत आहे. नवरेमंडळीही काम करून थकूनच घरी येतात.’ असं म्हणणारे लोक.

आजही फारच कमी नवरेमंडळी घरकामात आपल्या बायकोला सर्वतोपरी आणि नियमित मदत करतात. मदत न करण्याची कारणं पतींना तोंडपाठच असतात-

 एकदा का हिला मदत केली, की ती कायम कामं सांगणार. सवयच आहे तिला.

 मला नाही आवडत घरकाम करायला. साफसफाई, आवराआवरी करणं, कपडे वाळत घालणं, घडय़ा घालणं, दळण दळायला देणं, इस्त्री करणं ही काय माझी कामं आहेत?

 माझ्या आईला आवडत नाही मी स्वयंपाकघरात काम केलेलं. आमच्याकडे पुरुष मंडळी घरकाम करत नाहीत. 

 सगळय़ा बायका वर्षांनुवर्ष हेच करत आल्या आहेत. ही वेगळं काय करते?

 हिला हिच्याच पद्धतीनं काम झालेलं हवं असतं. मला जमत नाही. मग खटके उडतात.

 हिला फुटबॉल, क्रिकेट आवडत नाही, मला आवडतं आणि त्याच्या वेळा नेमक्या हिच्या कामाच्या वेळा असतात. मग काय क्लॅश होणारच.

 माझी नोकरी महत्त्वाची. खूप ‘डिमांडिंग’ आहे. तिनं नाही केली नोकरी तरी आम्ही करू अ‍ॅडजस्ट. मला नोकरी सांभाळून हिला घरकामात मदत करणं शक्य नाही.  

  मुलांची कारणं / उपदेश

  तू आम्हाला/ मलाच कामाला लावतेस. मित्रांच्या घरी बघ ते काहीच करत नाहीत.

 मित्र/मैत्रिणीची आई त्यांना काम सांगत नाही. तूच सांगतेस. कशाला करतेस नोकरी?  तूही सोडून दे.

 मला आता अभ्यास- परीक्षा-क्लास आहे. माझा वेळ जाईल काम करत बसलो तर.

 मी थकलोय, खेळून आलोय आत्ताच. चिल कर! नंतर करेन. (तो ‘नंतर’ उजाडत नाही.)

 बाहेरून मागव ना खायला. तुलाही तेवढाच आराम.

 सासू- आई यांची मतमतांतरं-

 आम्हीही केलं आयुष्यभर, त्यात नवीन काय?

 बाईच्या जातीला करायलाच हवं. त्यातून सुटका आहे का?

 कशाला कामवाल्यांच्या डोक्यावर ओता पैसे, त्यांचे नखरे सांभाळा? होईल त्रास, पण..

 घरचं ते घरचंच. घरच्या जेवणाची सर येणार आहे का स्वयंपाकिणीच्या हाताला?

त्या उरकतात कामं. आजकालच्या मुलींना घरापेक्षा नोकरी जास्त प्रिय असते.

ही सगळी मतमतांतरं ऐकल्यानंतर हाती काय येतं, तर घरच्या बाईलाच मुख्य जबाबदारी पार पाडायची आहे, हेच सत्यवचन! पूर्वी बाईवर फक्त घरची जबाबदारी होती, आता अनेकींना त्या बरोबरीनं नोकरी, करिअर किंवा व्यवसायही करायचा असतो. शिक्षणासाठी आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा वेळ घालवलेला असतो. नोकरीमुळे हाताशी पैसे येतो, त्याचा उपयोग घरासाठी होतो, आणि हो, स्वत:साठीही होतो. प्रत्येक वेळी नवऱ्याकडे हात पसरायची वेळ येत नाही. मुख्य म्हणजे तिच्यातल्या गुणवत्तेचा उपयोग आत्मविश्वास वाढवण्यातही होतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं स्वत:च्या पायावर उभं असलंच पाहिजे. अर्थात एखादीनं मनापासून ठरवलं, की मला पूर्णवेळ गृहिणी व्हायचं आहे, तर त्याचाही आदर करायला हवा. पण याचा अर्थ असा नाही, की तिनं २४ तास घरकामासाठी स्वत:ला जुंपून घ्यावं. तिलाही घरच्यांनी मदत करायलाच हवी.

 घरातल्या जेष्ठ मंडळींनाही काही प्रश्न –

 तुम्ही तुमचा संसार केलाय हे मान्यच आहे. मात्र नातंवंड अगदी लहान असताना, निदान पाच वर्षांपर्यंत  तुमच्या प्रेमाची सावली त्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करत असतं, तरीही, सुरुवातीपासूनच ‘तुम्ही तुमचं बघा’ हा तुमचा अ‍ॅटीटय़ूड असतो का?

 काळ बदलतो आहे. सुनेला अनेक व्यवधानं असू शकतात. आपण केला तसा संसार, तशाच पद्धतीनं केला पाहिजे, अशी तुमची अपेक्षा असते का?

 आहार, विहार, पेहराव यात बदल होणारच, हे लक्षात घेऊन त्याकडे दुर्लक्ष केलं जातं का? 

 जेष्ठ मंडळींचा विचार होतो का? –

  ते तुमची मुलं सांभाळत असतील, तर आजी-आजोबांनी सांभाळलंच पाहिजे, असा अ‍ॅटीटय़ूड न ठेवता, तेही वयपरत्वे थकलेले आहेत हे गृहीत धरून, वेगळय़ा मदतनीसांची गरज पटवून दिली जाते का?

 त्यांची मतं मागच्या पिढीतील आहेत, ती सहज बदलणार नाहीत, हे गृहीत धरून त्यावर वाद न घालता. काही गोष्टी एकदाच ठामपणे, कटूता येणार नाही अशा पद्धतीनं सांगितल्या जातात का?

   यातल्या अनेक गोष्टी अनेकींनी केल्याही असतील. काही यशस्वी झाल्या असतील, काही नाही. पण आजही घरकामामुळे होणारा मानसिक, भावनिक आणि शारीरिक त्रास बाईलाच सहन करावा लागतो आहे. शिवाय तिच्या अनेक क्षेत्रातल्या उंच झेपेलाही त्यामुळे अनेकदा मर्यादा येते. अनेकदा ती मिळालेली संधी नाकारते किंवा तेवढी गुणवत्ता प्राप्त करण्यासाठीचा आवकाश तिच्याकडे नसतो.

  पुढची पिढी, विशेषत: करिअर करणाऱ्या आज विशी-पंचविशीत असलेल्या मुली, घरकामाची जबाबदारी कितपत अंगावर घेतील याबद्दल साशंकताच आहेच आणि त्यांच्यावर ते पूर्णत: लादणं हा त्यांच्यातल्या महत्त्वाकांक्षेवर मर्यादा आणण्यासारखंच आहे. ‘चपाती गोल नाही झाली तरी चालेल.’ असं लेकीला  सांगणाऱ्या वडिलांमुळे विनिता सिंग ३०० कोटी रुपयांचा ‘शुगर कॉस्मेटिक्स’चा बिझनेस उभारू शकली. घरच्यांचं असं पाठबळ बाईसाठी आकांक्षांचं आकाश खुलं करतं. यासाठीच कुटुंबातील प्रत्येकानं सामंजस्यानं एकमेकांचा आधार होणं गरजेचं. काहींना ही कामाची विभागणी व्यवस्थित करणं आता जमू लागलं आहे. त्यांचीही काही उदाहरणं-

 ‘माझा नवरा मासे-चिकन इतकं छान करतो, की मांसहारी जेवणाच्या दिवशी मी स्वयंपाकघरात जातच नाही.’ ‘मी सकाळीच जाते ऑफिसला. भांडीवाली बाई उशिरा येते, मग ती गेल्यावर ‘हे’ सगळी भांडी जागेवर लावून ठेवतात. एक काम कमी होतं माझं रोजचं.’

 ‘मला ऑफिसमधून यायला रात्री उशीर होतो. रात्री येऊन गरम चपात्या करून देणं मला शक्य नाही. स्वयंपाकीण लावूया किंवा शेजारच्या चांगल्या पोळी-भाजी केंद्रातून आणूया.’ इतकं स्पष्ट बोलणं अनेकींना जमू लागलं आहे. मात्र त्यातून काही वेळा गैरसमज, नात्यातला दुरावा आणि काही वेळा तर वाद -भांडणं- घटस्फोट हेही. हे टाळायला हवं. ते टाळणं परस्पर सामंजस्यानंच होणार आहे. 

 घरची बाई आनंदी आणि समाधानी असेल तर घर हसरं असतं म्हणतात. पण इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता कुठे थोडा थोडा बदल होतो आहे.  ‘I need a wife’ असं ट्विंकल म्हणाली, कारण बायकोच घर सांभाळते हे गृहीतक तिनंही स्वीकारलं आहे! पण या बायकोलाही ‘ब्रेक’ हवाय आता. त्यामुळे कुटुंबीयांनी एकत्र येत सामंजस्यानं कामाची वाटणी करून खऱ्या अर्थानं एकत्र संसार केला तर? त्यामुळे पुढे जात म्हणायला हवं, ‘We need a sensible Family.’

परिस्थिती बदलण्याबाबत बाईनं विचार केलाय का? हे काही प्रश्न तिनं स्वत:ला विचारले आहेत का?

 मी आहे म्हणून तर घर चाललंय, असं खरंच आहे का?

 मी घरातली कामं केली नाहीत तर माझी घरातली किंमत वा महत्त्व कमी होईल, घरावरचा माझा ताबा जाईल.. असं खरंच वाटतं का?

 घरच्यांच्या सहकार्यासाठी भांडण, आक्रस्ताळेपणा, असहकार्य, अबोला या गोष्टींचा वापर न करता सामंजस्यानं काही गोष्टी केल्या आहेत का?

 नोकरी, करिअर करत असल्यास लग्नाआधीच घरच्या सर्वाना आपल्या नोकरी- व्यवसायाची कल्पना दिली होती का? कामाचं स्वरूप, वेळेचं गणित साांगितलं होतं का? घरकामासाठी मदत लागेल अशी विनंती वजा गरज व्यक्त केली होती का?  माझ्या पगारातला किंवा घरखर्चातला अमुक हिस्सा मी कामवालींसाठी किंवा मदतनीस यांच्यासाठीच ठेवणार, असं  ठामपणे घरच्यांना सांगितलं आहे का?

 कामवाल्या पैसे मागतात, दांडय़ा मारतात, स्वच्छ नसतात. पण कोण कामवाली कशी आहे, हे एखाद्या महिन्यातच कळतं. मात्र एकदा चांगली कामवाली मिळाल्यावर ती टिकवण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतात. थोडी तडजोड, थोडी उदारता आणि मुख्य म्हणजे खूप सारं प्रेम आणि काळजी तिला दिली तर त्याही आपल्यासाठी जीव टाकतात. किती जणी  ती कामवाली आहे, या पलीकडे तिला पाहतात?

 मुलांना लहानपणापासूनच कामाची ओळख करून दिली गेली आहे का? बाई नोकरी करणारी असो वा नसो. मुलगा असो वा मुलगी, त्यांना घरकाम आलंच पाहिजे. उपाशी राहणार नाहीत इतपत जेवणही बनवता आलं पाहिजे. उठल्यावर स्वत:चं अंथरुण आवरणं, जेवल्यावर आपलं ताट धुवून घासायला ठेवणं, आपले कपडे आपण आवरणं  शिकवलं आहे का? बरोबरीनं मदतीला घेतलं आहे का?

 मुलांच्या पौगंडावस्थेत पालकांशी त्याचं नातं कसं आहे यावर खूप गोष्टी ठरत असतात. वयाच्या या नाजूक काळात त्यांना समजून घेतलं तर मुलंही आपल्याला समजून घेतात. हा अनुभव घेतला आहे का? 

 आईला मुलांनी गृहीत न धरता तिच्या कामाचा त्यांना आदर वाटला पाहिजे, तुमच्या कष्टाची जाणीव असली पाहिजे, यासाठी करत असलेल्या बाहेरच्या आणि घरच्या  कामांबद्दल त्यांच्याशी जाणीवपूर्वक बोललं जातं का?

 नवरा आला मदतीला, तर त्यानं केलेल्या मदतीचं कौतुक केलं जातं का? की तू पसाराच जास्त करतोस म्हणून नावं ठेवली जातात? ही नावं ठेवणं पुढच्या सगळय़ा मदत मिळण्याच्या संधींवर फुल्या मारणं असतं, हे लक्षात येतं का? 

 निदान सुट्टीच्या दिवशी आपण एकत्र स्वयंपाक करू वा तू एखादी डिश बनव, असा नियम घरातल्या पुरुषमंडळींसाठी असतो का?

 घरातल्या प्रत्येकानं बाई करत असलेल्या प्रत्येक कामाकडे जाणिवपूर्वक पाहिलं, तर त्यामागे घराची काळजी, प्रेमच दिसेल. तिलाही थोडा आराम, स्वत:साठी वेळ मिळेल, हे आई म्हणून मुलांना शिकवलं गेलंय का?