‘‘इन्व्हेस्टमेंट चित्रपटाला जाहीर झालेलं सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक-रौप्यकमळ-स्वीकारायला आम्ही दिल्लीला गेलो. रंगमंचावर निर्माती म्हणून माझ्या नावाचा पुकारा झाला. पाठोपाठ दिग्दर्शकाच्या रौप्य कमळासाठी रत्नाकरच्या नावाचा. त्या समारंभातले आम्हा दोघांचे फोटो पाहताना वाटलं, एकत्र काम सुरू केल्याचं वर्तुळ आज पूर्ण झालं! नकळत्या वयात जोडीनं रंगभूमीच्या संसारात टाकलेली पावलं आज जोडीनं मार्गक्रमणा करीत इथवर येऊन पोहोचली.’’ सांगताहेत प्रतिभा मतकरी आपले पती लेखक, नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्याबरोबरच्या ५२ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
साल १९६१. तेव्हा मी रुईया कॉलेजला शिकत होते. माझं घरचं वातावरण अगदी मोकळं, स्वतंत्र, सुसंस्कृत असं होतं. वडील माधव मनोहर व्यासंगी टीकाकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवणारे व्युत्पन्न प्रशिक्षक होते. त्यांच्या शिकवण्याच्या विषयांवर आणि अध्यापनाच्या व्यवसायावर त्यांचं अतिशय प्रेम होतं. वृत्तीनं ते समाजवादी होते. काका प्रभाकर वैद्य कम्युनिस्ट, चुलत भाऊ पुरुषोत्तम वैद्य- नाशिकच्या पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक-हिंदू महासभावादी, आई शिशुविहार या माँटेसरी शाळा नि ट्रेनिंग कॉलेजची उपमुख्याध्यापिका, चुलत बहीण लीला-शिरोडकर ट्रेनिंग कॉलेजची मुख्याध्यापिका, सुशीला- बी.टी. कॉलेजची सुपरवायझर- अशी अध्यापनक्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींची न संपणारी यादी आमच्या घरात होती. आतेभाऊ नकलाकार सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय) याच्यासह. बा.भ. बोरकर, श्रीकृष्ण पोवळे, श्री.ना. पेंडसे, वसंत कानेटकर, ग.रा. कामत, धोंडो विठ्ठल देशपांम्डे, आत्माराम भेंडे अशा अनेक नाटक-साहित्य क्षेत्रातील रथी-महारथींचा घरी कायम राबता असे. चर्चा, वादविवाद यामुळे वातावरण गजबजलेलं. घरातील मोठी मुलगी म्हणून मी या सगळय़ाची साक्षीदार नि त्यामुळे स्वत:ला उगाचच मॅच्युअर समजणारी एक अपरिपक्व मुलगी! फडके-खांडेकर वाचणारी, साहित्यविश्वात-काव्यवाचनात रंगणारी, आणि बी.ए.चा अभ्यास करणारी. निर्णय मनानं घेणारी, बुद्धीनं नाही.
तर अशा बालिश वयात रत्नाकर भेटला. माझ्या अगदी उलट स्वभाव. मेहनती, काटेकोर. प्रत्येक गोष्ट ‘योग्य’ करणारा. दिसायचा अगदी किरकोळ. सावळासा-कमालीचा बारीक आणि चष्मिष्ट. पण साहित्यिक म्हणून एकदम प्रभावी! जेमतेम विशीतला पण तेव्हाही त्याच्या श्रुतिका रेडिओवरून सादर व्हायच्या, एकांकिका स्पर्धामधून मोठमोठे दिग्दर्शक त्याच्या एकांकिका सादर करून बक्षिसं मिळवायचे, मासिकांमधून त्याच्या कथाही छापून यायच्या. त्याच्याभोवती प्रसिद्धीचं वलय होतं, आणि त्याहीपेक्षा लिखाणातला सच्चेपणा, तळमळ भिडणारी होती. मी भारावून गेले आणि चक्क त्याला लग्नाबद्दल विचारलं!
रत्नाकरनं मला होकार दिला. नाहीतरी त्याचा स्वभाव असा होता, की त्याला त्याच्या लिखाणामधून स्वत:हून प्रेमात पडायला सवड झाली नसतीच! मी ‘प्रेमविवाह करायचा’ या कल्पनेवरच खूश झाले. ताई-पप्पा (माझे आईवडील) पुरोगामी विचारांचे होते, त्यामुळे लग्नाला विरोध करणं त्यांच्या तत्त्वांत बसलंच नसतं. पप्पा आणि रत्नाकरमध्ये फक्त पुढील संवाद झाला-
पप्पा: प्रतिभाला स्वयंपाक येत नाही. माहीत आहे ना?
रत्नाकर : हो.
पप्पा: तिचे अनेक मित्र आहेत माहीत आहे ना?
रत्नाकर: हो.
पप्पा: तुमची जागेची अडचण असेल तर आम्ही जागा घेऊन देऊ का?
रत्नाकर: नको. आम्ही पाहतोच आहोत मोठी जागा.
बस्स इतकंच.
तेव्हा रत्नाकरनं कोणत्या विचारानं माझं व्यक्तिमत्त्व होतं तसं स्वीकारलं कोण जाणे, पण इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतर मला कळून चुकलंय, की खरोखरच त्याचा मूलभूत व्यक्तिस्वातंत्र्यावर प्रचंड विश्वास होता आणि अर्थातच, स्त्रीही एक व्यक्तीच असते, त्यामुळे स्त्रीस्वातंत्र्यावरही. कष्ट पडले, तरीही आजही त्याची ही धारणा त्यानं जागृत ठेवली आहे. अमलात आणली आहे. त्यानं मला कधी घराच्या रामरगाडय़ात हरवून जाऊ दिलं नाही. उलट, जेव्हा आम्हा दोघांपैकी एकानं तरी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जाऊन नाटकाचं तंत्र आत्मसात करावं असा विचार पुढं आला, तेव्हा स्वत: नोकरी करून घर चालवण्याची जबाबदारी उचलली आणि मला एन.एस. डी.ला पाठवलं. तेही, सुप्रिया जेमतेम दीड वर्षांची असताना! त्या काळात तर त्यानं सुप्रियाला बाप आणि आईचंही प्रेम दिलंच, पण पुढंही कायम मुलांचं शिक्षण, लग्न, करिअर या सगळय़ांत त्याचा सक्रिय सहभाग राहिला. आता आमची नातवंडंही मोठी झाली, पण आजही प्रत्येक लहानमोठय़ा निर्णयात रत्नाकर आमच्या मुलांसोबत असतोच. त्यांच्यात चर्चा घडतात. रत्नाकर योग्य-अयोग्याचं मार्गदर्शन करतो.
लग्नाच्या आधीपासूनच आम्ही ‘बालनाटय़’ ही संस्था सुरू केली होती. नाटकांत रमणं हा आमच्यातला समान दुवा निघाला. संसारिक कटकटींची भरती-आहोटी कुणाला चुकत नाही. पण त्यातूनही आमचा आनंद इतकी वर्षे कायम राहिला, साहचर्य अर्थपूर्ण झालं, ते नि:संशय या कलाप्रेमामुळेच. सुरुवातीपासूनच बालनाटय़ नि प्रायोगिक नाटकं करणं हा तसा आतबट्टय़ाचाच व्यवहार. पण रत्नाकरने नवं नाटक वाचून पूर्ण केलं, की त्या क्षणापासून आम्हा दोघांमध्ये हत्तीचं बळ येत असे. प्रत्येक नाटक पराकोटीचा वेगळेपणा घेऊन येई. ते रंगमंचावर सादर होण्यापर्यंतच्या दीड-दोन महिन्यांच्या प्रवासात आम्ही जणू झपाटलेले असायचो. मधुकर नाईक, शरद आणि दीनानाथ झुंजारराव, विद्या महाजनी (कमलिनी फडके), जयंत जोशी, अशोक कासुलवार, शशांक वैद्य आणि हरीश कदम या सर्वानी सुरुवातीपासून ते पुढे वर्षोनुवर्षे आम्हाला या ‘उद्योगा’त साथ दिली. नाटकांत भूमिका करण्यापासून ते तिकीट विक्रीपर्यंत आणि शाळाशाळांतून फिरून प्रयोग मिळवण्यापासून ते नेपथ्य उभारण्यापर्यंत सर्व कामं आम्ही एकाच उत्कटतेनं करायचो. तालमी करून थकल्यानंतर रात्री बारा साडे बाराला सगळय़ा टीमला आम्लेट पाव का होईना, पण करून खायला घालणं ही तर माझी रोजची जबाबदारी. (सर्वजण नोकरी सांभाळून)संध्याकाळच्या वेळात नाटकं करणारे, त्यामुळे तालमी संपायला एवढा उशीर हा ठरलेलाच! त्यातून तेव्हा रेस्टॉरंटस् कमी होती- होती तीही उशिरामुळे बंद झालेली असत. त्यातून खिशात पैसाही बेताचाच असे.
दिल्लीहून मी परत आले, ती दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळवून. आल्याआल्या मी ‘बालनाटय़’साठी ‘धडपडे बडबडे मारकुटे आणि मंडळी’ हे रत्नाकरनं लिहिलेलं बालनाटय़ दिग्दर्शितही केलं. तसंच त्याचं ‘एकटा जीव सदाशिव’ हे प्रौढांचं नाटक बॉम्बे पोर्ट ट्रस्टसाठी बसवलं. पण म्हणतात ना, काही लोक कामं करू शकतात, नि काही करवून घेऊ शकतात- त्यापैकी माझी जात पहिली असावी- कामं करणाऱ्यांची स्टेजवर अभिनय करण्यापासून बॅकस्टेजच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळणं आवडायचं. याउलट रत्नाकर नट चांगला असूनही नेपथ्य, प्रकाशयोजना वेशभूषा, रंगभूषा हे सर्व कसं असावं याची रीतसर ड्रॉईंग्ज, स्केचेस इ. करून स्वत: गाण्यांना चाली लावून एक आखीव-रेखीव नाटय़प्रयोग उभा करण्यात तो जास्त रमायचा. त्याला जणू संपूर्ण नाटक डोळय़ांसमोर बारकाव्यांनिशी दिसायचं. आम्हा सर्वाच्या मदतीनं तो ते प्रत्यक्षात आणायचा. शून्यातून सृष्टी उभं करू शकणारं असं त्याचं नेतृत्व असे.
मी ‘बालनाटय़’ची निर्माती तर होतेच, पण त्या जोडीला आमच्या नाटकांतून रत्नाकरने एक अभिनेत्री म्हणून मला भूमिकांची जी विविधता दिली, तिला तोड नाही. मी, दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, वसंत सोमण, मीनल जोशी (परांजपे) अशी त्याची काही भरवशाची नटमंडळी होती, ज्यांच्यावर तो डोळे झाकून प्रौढांच्या नि मुलांच्या अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांची भिस्त टाकत असे. या सर्वात माझी भूमिका बसवणं त्याला फार कष्टदायक असे. याला कारण माझाच असहकार! छोटय़ाशाही कारणामुळे मला तालमीत हसू फुटे. बरं, एकदा हसून मी थांबत नसे, प्रत्येक तालमीत आदल्या वेळी हसलेलं ते वाक्य आलं, की मी हसायचेच. अगदी कितीही प्रयत्न केले, तरी मला हसू अनावरच होई. रत्नाकर शेवटी हतबुद्ध व्हायचा. शिवाय वेगळं काही करून पाहायचं, तर मी ‘मला जमतच नाहीये- अगदी अशक्य आहे’ असं सगळय़ा चमूसमोर जाहीर करून टाकायचे. रत्नाकरला मला खूप चुचकारून काम करून घ्यावं लागे. ‘आरण्यक’ या त्याच्या महाभारतातल्या शेवटच्या पर्वावर आधारित मुक्तछंदातल्या नाटकात माझ्या वाटय़ाला गांधारीची अप्रतिम भूमिका आली होती. त्यात शेवटाकडे मी विदुर व कुंतीच्या आग्रहाखातर डोळय़ांवरची पट्टी काढते नि प्रथमच डोळय़ांवर आलेल्या प्रकाशामुळे दिपून जाऊन किंकाळी फोडते, असं दृष्य होतं. ‘किंकाळी फोडणं मला अशक्य आहे’ असा हेका मी खूप काळ धरला. पण शेवटी रत्नाकरमधला जिद्दी दिग्दर्शक जिंकला नि या गांधारीने मला रसिकांचा मोठा आदर मिळवून दिला. एकंदरीतच, रत्नाकरमधल्या दिग्दर्शकाने आपलं ध्येय साध्य करण्याआड कुणालाही येऊ दिलं नाही, म्हणूनच त्याची नाटकं कायम वेगळा ठसा उमटवणारी ठरली. ती प्रेक्षकानुनयी झाली नाहीत, नि कायम प्रत्येक नटाला त्याच्या अभिनयाच्या मर्यादा तोडायला लावून त्यांनी वेगळी उंची दिली.
नाटय़संसारातला रत्नाकर नि नवरा म्हणून रत्नाकर ही रूपं माझ्यासाठी कायमच भिन्न राहिली आहेत. घरी त्याचा मला भरपूर सासुरवास असतो आणि कलाकृती निर्माण करताना खंबीर आधार. घरात २४ तास टीका करण्यासाठी रत्नाकरकडे माझ्यासारखा ‘परमनंट’ विषय नाही. ‘प्रतिभाचे रोजचे संवाद एकापुढे एक लावले तर अप्रतिम फार्स तयार होईल.’ हे त्याचं मत ‘हे वाच’, ‘ते शोधून दे’, ‘अमक्याला फोन कर’, ‘तमक्याकडे जाऊन ये’ अशा तो दिवसभर ऑर्डरी सोडत असतो, आणि ते करताना माझ्या चुका काढत असतो. दिवसरात्र माझाच विचार करणं, हे या टीकेमागचं प्रमुख कारण आहे, असं मुलं म्हणतात. बऱ्याच अंशी ते खरंही आहे.
आम्हा दोघांसाठीही नाटकापेक्षा मोठं काहीही नाही. सण-समारंभ हे आम्ही जमतील तेव्हा आनंदानं साजरे करतो, पण प्राधान्य असतं, ते नाटकांच्या तालमी, प्रयोग यांनाच. आमची दोनही मुलं याच वातावरणात वाढली, त्यामुळे त्यांचीही मनोधारणा अशीच झाली आहे. गणेशच्या जन्माच्या वेळी तर गंमत झाली. दिवस भरल्यामुळे मी शिवाजी पार्कच्या पुरंदरे नर्सिग होममध्ये अॅडमिट होते. समोर बालमोहन शाळा. तिथे दुसऱ्या दिवशी आमच्या ‘इंद्राचं आसन नारदाची शेंडी’ नाटकाचा पहिला प्रयोग होता. मग काय तळमजल्यावर तिकीट विक्रीसाठी आमचा माणूस बसलेला, नि समोरून पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून मी थोडय़ा थोडय़ा वेळानं बुकिंग विचारतेय असं दृश्य. आजपर्यंत माझी चेष्टा करतात सगळे या किश्श्यावरून! एकदा ‘ढग ढगोजीचा पाणी प्रताप’ या बालनाटय़ाच्या तालमीत सुप्रियाचा हात फ्रॅक्चर झाला. साधारण दुपारची वेळ होती. मी तिला डॉक्टरकडे नेलं, हाताला प्लॅस्टर घातलं नि आम्ही दोघी पुन्हा तालमीला हजर झालो. घरी जाऊन निदान त्या दिवशी तरी विश्रांती घ्यावी का, अशी काहीच चर्चा आमच्यात झाल्याचं आठवत नाही. रात्रीपर्यंत सुप्रियानं तालीम केली (तिची त्या नाटकात ढगाची प्रमुख भूमिका होती.) नंतरच्या सर्व तालमीही हाताच्या प्लॅस्टरसह केल्या. प्रयोगाच्या दिवशी हाताला गरज होती त्यापेक्षा थोडं आधीच-सकाळी प्लॅस्टर काढून ती दुपारच्या प्रयोगाला उभी राहिली. आम्हा तिघांनाही हेच योग्य वाटलं. ‘अश्वमेध’ या दैनंदिन मालिकेच्या शूटिंगदरम्यान रत्नाकरला पाठदुखीचा त्रास होत होता. अनेक दिवस त्यानं जवळजवळ आडवं झोपून दिग्दर्शन केलं. पण एकही दिवस चित्रीकरणाला तो गैरहजर राहिला नाही. नाटकाचा पहिला प्रयोग झाला, की त्यानंतरचं त्याच भारलेल्या वातावरणातलं ‘सेलिब्रेशन’ हा आम्हा चौघांनाही कायमच लग्नामुंजीपेक्षा जास्त मोठा सोहळा वाटत आला. नाटक हाच आमचा जगण्याचा हेतू असावा.
संस्था सुरू केली, तेव्हा समवयस्क मंडळी खूप होती. पण हळूहळू संस्थेचा वटवृक्ष झाला आणि आमचं घर सदस्यांच्या पुढच्या पिढय़ांनीही गजबजत राहिलं. वर्षांनुवर्षे आमच्या घराला गुरुकुलाचा दर्जा मिळाला. कायम घरी दहाबारा माणसांचा राबता नि कमीत कमी चार-पाच तरी मुलं वस्तीला असत. आजसुद्धा कोणताही प्रोजेक्ट सुरू केला, की संबंधित माणसं दिवस-रात्र आमच्या घरी असतात. आमचं घर अगदी नैसर्गिकपणे गोडाऊन, राहण्या-जेवण्याचं हॉटेल, मनोरंजनाचं थिएटर, रिहर्सल हॉल सगळं सगळं होऊन जातं. पूर्वी सासूबाई, दीर, जाऊ असं आमचं एकत्र कुटुंब होतं. तरीही नाटकाचा हा गोतावळा कसा जमत गेला, नि आमच्या साध्या मध्यमवर्गीय घरात कसा काय सामावला, कोण जाणे!
माझी हातात असेल ते करत राहण्याची वृत्ती आहे. तेही, सहज जमत असेल तरच. त्यामुळे मी ‘सुरुंग’ नाटकात काशीनाथ घाणेकरबरोबर नायिकेची भूमिका करूनही नंतर व्यावसायिक रंगभूमीवर टिकून राहण्यासाठी विशेष कष्ट घेतले नाहीत. त्यामुळे मी अभिनेत्री म्हणून माझा मोठा ठसा उमटवू शकले नाही, याची माझ्यापेक्षा जास्त खंत रत्नाकरला आहे. माझ्या वयाच्या कोणत्याही अभिनेत्रीची एखादी उत्तम भूमिका पाहताना, ‘‘बघ जरा चिकाटी ठेवली असतीस, तर आज हिच्या जागी तू असतीस!’’ असे उद्गार त्याच्या तोंडून न चुकता बाहेर पडतातच.
अर्थात, माझ्या या काहीसं मागे राहण्याचा आमच्या संस्थांना फायदा झाला. रत्नाकरनं रंगभूमीला प्रयोगशाळा मानून कायम वेगवेगळे प्रयोग केले. महत्त्वाकांक्षी नाटकं लिहिली. त्यांची सर्व शक्तीनिशी निर्मिती करण्यासाठी मी कायम हजर राहिले. ३०-३५ वर्षे आमचं काम अखंड चालू राहिलं. या कामाच्या जोडीला देशभर मी रंगभूमी शिक्षणाच्या कार्यशाळाही घेऊ शकले. पण माझ्या या स्वभावाचा एक फायदा झाला. संस्थेतले आबालवृद्ध आपल्या अडीअडचणी रत्नाकरपेक्षा माझ्याकडे जास्त बोलून दाखवत. पुढेपुढे संस्थेची नाटकं कमी होऊन जेव्हा रत्नाकरच्या व्यावसायिक नाटकं आणि पुस्तकांचा व्याप वाढला, तेव्हाही नाटय़निर्माते, पुस्तक प्रकाशक यांच्याशी मीच बोलणी करायची पद्धत पडून गेली. रत्नाकरच्या परफेक्टनिस्ट स्वभावाला सहजपणे हट्टीपणाचं लेबल लावणारी ही मंडळी बहुतेक माझ्या त्या मानानं मृदु स्वभावासोबत जास्त सहजपणे बोलू वागू शकली असावीत.
योग्य की अयोग्य कोण जाणे, पण आम्ही दोघांनीही पैशाला कधीच प्राधान्य दिलं नाही. गरज असेल तेव्हा आणि गरज असेल तितका पैसा उभा राहतो, अशी आमची श्रद्धा आहे. आजवर तरी तिला तडा जाईल असं काही घडलेलं नाही. नाही म्हणायला एकदा फारच कठीण वेळ आली. तातडीनं पैसे हवे होते. नाहीतर प्रयोग रद्द झाला असता. मी माझ्या हातातल्या सोन्याच्या चार बांगडय़ा विकल्या. बऱ्याच दिवसांनी सासूबाईंच्या लक्षात आलं-माझ्या हातात बांगडय़ा नाहीत. त्यांनी विचारल्यावर मी घडलं ते सांगून टाकलं. त्या काहीच बोलल्या नाहीत. उलट रत्नाकरच्या मागे लागून त्यांनी पुन्हा माझ्यासाठी बांगडय़ा करवून घेतल्या.
पण तरीही, अचानक ‘गहिरे पाणी’सारखी चित्रमालिका सुरू करताना किंवा ‘इन्व्हेस्टमेंट’सारखा चित्रपट बनवण्याची उडी घेताना भविष्याचा अंदाज नव्हता. धाकधूक होती, पण रत्नाकरमधल्या कलावंतावर मी नेहमीच ठाम विश्वास दाखवला, आणि त्यानं माझ्या ‘राइझिंग टू द ऑकेजन’ या स्वभावावर! ‘प्रतिभा गेलीय सबमिशनसाठी- ती गेलीय म्हणजे काम होणार!’ किंवा, ‘म्युनिसिपल स्कूलने अचानक शूटिंगला जागा नाकारलीय- प्रतिभा बोलतेय दुसऱ्या शाळेच्या लोकांशी ती नक्की मार्ग काढेलच!’ असे रत्नाकरचे उद्गार!
पण अडचणींशी लढायची जिद्द ठेवली, तरी एक सल मात्र मनात घर करून राहिलीच. बालरंगभूमी सामाजिक अनास्थेची. आम्ही कष्टानं पदरमोड करून दर्जेदार नाटकं घडवली, शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांना स्वस्त दरात ती दाखवली. तिकीटविक्री, पोस्टर्स लावणं, रंगमंच उभा करणं यांचाही भार उचलला, पण पंचवीस वर्षे हे अव्याहत चालू ठेवूनही त्याचं चीज झालं नाही. आम्ही जाऊन प्रयोग करत होतो, म्हणून प्रयोग होत होते. पण कधी कुणी विचारलं नाही, की यंदा कुठलं नाटक करणार? आमच्या शाळेत कधी प्रयोग करणार? स्वत:च्या मनोरंजनावर सहज पैसा उधळणाऱ्या प्रौढांना असं कधी वाटलंच नाही, की मुलांना घडवणारी त्यांचं मनोरंजन करता करता त्यांच्यावर संस्कार करणारी बालरंगभूमी जगवणं हे आपलं काम आहे! हशा-टाळय़ा नि चित्कारांना बालनाटय़ाचा आनंद मनमुराद लुटणारी मुलं पाहणं एवढीच काय ती आमची पुंजी राहिली. ती किती काळ पुरवणार?
खरोखरीची पुंजी- म्हणजे पैशांचे हिशोब ठेवायला मात्र मी जवळजवळ नालायक. याउलट रत्नाकरचं गणित पक्कं, शिक्षण कॉमर्सचं, बँकेत २२ वर्षे नोकरी. पण आमच्या संस्थेचे नि घरातले पैशांचे सर्व व्यवहार माझ्या ताब्यात! हे कसं घडलं, आम्हा दोघांनाच काय, पण आसपासच्या सर्वानाच मोठं कोडं आहे. पण हे असं आहे खरं!
तसा विचार केला तर लक्षात येतं, की याच नाही, तर सर्वच बाबतींत रत्नाकर माझ्यावर अवलंबून आहे. अगदी परावलंबी म्हणावा, इतकं त्याला मनापासून वाटतं, की बहुतेक गोष्टी आपल्या जोडीदारासोबतच अर्थपूर्ण आहेत, अन्यथा अर्थहीन. आताशा मी अनेकदा घराबाहेर पडायचा कंटाळा करते. मग तोही महिनोन्महिने एकही नाटक वा चित्रपट पाहात नाही. क्वचित मुलांबरोबर जातो, पण मी येत नाही, याबद्दलची नाराजी कायम असते.
रत्नाकरच्या कलाकृतींमध्ये रमणं, हा माझा मोठा आनंद आहे. त्याच्या एखाद्या व्यावसायिक नाटकाचा शिवाजी मंदिरला प्रयोग असेल, तर ‘निर्मात्याला भेटायचंय’ किंवा ‘एका नटीची अॅव्हलेबिलिटी विचारायचीय’ अशी फुसकी कारणं रत्नाकरला सांगून मी प्रयोगाला हजेरी लावते. मुलांनाही हे ‘गुपित’ ठाऊक आहे. मी जरा चार-दोन कामं करून येतं, ‘म्हटलं, की ‘काय मग, – शिवाजीला जाऊन येणार असशील!’ अशी मल्लीनाथी मला ऐकून घ्यावी लागते. घर आवरताना एखादी रत्नाकरच्या नाटकाची चित्रफीत हाती लागली, तर ती लगेच लावून मी अख्खीच्या अख्खी कधी पाहाते, माझं मलाही कळत नाही!
आताशा एकाच घरात आमची दोन स्वतंत्र राज्यं चालू असतात. चिंता सारख्याच, पण आम्ही स्वतंत्रपणे त्या दिवसभर सोडवत असतो. दोघं दोन्ही मुलांशी फोनवर वेगवेगळय़ा वेळी स्वतंत्रपणे बोलतो. प्रश्न तेच-मुलांना दोनदोनदा उत्तरं द्यावी लागतात. रत्नाकर दिवसभर खूप चिंतन, वाचन आणि लेखन करतो नि ठरवून थोडी विश्रांती घेतो. आणि मी कामं जशी समोर येतील तशा प्रमाणात आवरते, कमीजास्त दमते मात्र ठरावीक अशी विश्रांती मला ठाऊक नाही. ब्रेकफास्ट आम्ही एकत्र घेतो. पण त्यापुढचा रात्रीच्या जेवणापर्यंत दोघांचाही दिनक्रम वेगवेगळा, पण असं असूनही आत्ताच आम्ही एक मोठं काम एकत्र केलं-‘इन्व्हेस्टमेंट’ चित्रपटाची निर्मिती. रत्नाकरनं नेहमीप्रमाणे माझ्यावर निर्माती म्हणून विश्वास टाकला. रत्नाकरचं अनेक वर्षांचं चित्रपट दिग्दर्शनाचं स्वप्न साकार केलंच पाहिजे, या जिद्दीनं मी दोन्ही मुलांच्या सहकार्यानं सत्तरी ओलांडल्यावरही कंबर कसली-सुदैवानं साथीला अनेकजण पुढे आले, आणि रत्नाकरनंही या वयात पहिलाच चित्रपट जागतिक चित्रपटाच्या दर्जाचा तयार करून आम्हा सर्वाचा विश्वास सार्थ ठरवला. ‘इन्व्हेस्टमेंट’ला जाहीर झालेलं सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक-रौप्यकमळ-स्वीकारायला आम्ही दिल्लीला गेलो. रंगमंचावर निर्माती म्हणून माझ्या नावाचा पुकारा झाला. पाठोपाठ दिग्दर्शकाच्या रौप्यकमळासाठी रत्नाकरच्या नावाचा. आयोजकांनी आधी तालमीत ठरवून दिल्याप्रमाणे शिस्तीत आम्ही राष्ट्रपतींकडून ते सन्मान स्वीकारले. त्याच रात्री, आयोजकांनी विशेष तत्परतेनं त्या समारंभातले आम्हा दोघांचे फोटो आमच्या हवाली केले. ते पाहताना वाटलं, एकत्र काम सुरू केल्याचं वर्तुळ आज पूर्ण झालं! नकळत्या वयात जोडीनं रंगभूमीच्या संसारात टाकलेली पावलं आज जोडीनं मार्गक्रमणा करीत इथवर येऊन पोहोचली!
फार फार कृतार्थ वाटलं..
झाली फुले कळ्यांची! – सहप्रवासाचं वर्तुळ
‘‘इन्व्हेस्टमेंट चित्रपटाला जाहीर झालेलं सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक-रौप्यकमळ-स्वीकारायला आम्ही दिल्लीला गेलो. रंगमंचावर निर्माती म्हणून माझ्या नावाचा पुकारा झाला.
आणखी वाचा
First published on: 26-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer dramatists director ratnakar matkari 52 years life journey with wife pratibha matkari