श्रुती तांबे (समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र. )

.. तसा साधाच वाटणारा हा प्रश्न मानवजातीबद्दल आणि तिच्या अस्तित्वाबद्दल गांभीर्यानं समाजशास्त्रज्ञांना पडू लागला, त्यामागची कारणंही गंभीर आहेत.. हे गांभीर्य प्रत्यक्ष जगताना जाणवतही नाही, हे तर अधिकच पेचात पाडणारं..

मानवी संस्कृतीच्या सहस्रकांच्या प्रवासात दशक हे एककच किरकोळ ठरतं. हजारो वर्षांचं मानवी सामूहिक जगणं म्हणजे तगण्यासाठी, टिकून राहण्यासाठी केलेले अथक प्रयत्न. त्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मानवी जीवनाविषयी काही प्रश्न पडणं, ते मांडणं आणि काही प्रश्नांची उत्तरं सामूहिकपणे देण्याचा प्रयत्न करणं हाच मानवाच्या सामाजिक जगण्याचा अर्थ. अर्थात कधी प्रश्नच एकांगी असतात; कधी प्रश्न अगदी योग्य असला, तरी त्याची मांडणी चुकते; तर कधी वर्चस्ववादी गट आपलं म्हणणं हेच खरं उत्तर म्हणून संपूर्ण समाजाला विशिष्ट दिशेला फरपटत नेतो- अशा नाना तऱ्हा.

पृथ्वी जगेल की नष्ट होईल? महाप्रलय होईल की दुष्काळामुळे वैराण झालेल्या भूमीवर लाखो जीव तहानेनं मरतील? विषारी पावसात पिकं करपतील, रोग येतील की अख्खी मानवजातच दुसऱ्या ग्रहावर जाईल? हे प्रश्न गेल्या तीन दशकांत समाजशास्त्रज्ञांच्या सिद्धांतांत पाश्चात्त्य जगातील ऱ्हासाविषयीच्या भविष्यसूचनाचा अपरिहार्य भाग आहेत. ३५ वर्षांपूर्वी उल्रिश बेक यांच्या ‘जोखीमयुक्त समाज’ या सिद्धांतात नैसर्गिक आणि मानवनिर्मित जोखमींमुळे व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनावर कोणते परिणाम होत आहेत, याचं वर्णन केलेलं आढळतं.

प्रश्नांचा हा सिलसिला नवा नसला, तरी आज पृथ्वीचं अस्तित्वच एका नव्या (की अंतिम?) वळणावर असताना मानवी अस्तित्त्वाचा अर्थ कोणता आणि त्याचे दीर्घकालीन प्रयोजन काय, याची तड लावण्याची गरज जाणवत आहे. तंत्रज्ञानाचे एकेक करत अनेक मोठे टप्पे ओलांडायला मानवी समूहांनी काही हजार वर्ष घेतली. परंतु अलीकडच्या केवळ अर्धशतकाच्या काळात तंत्रज्ञानाच्या शोधांचा वेग इतका वाढला आहे, की एका शोधाचा अर्थ लागेपर्यंत दुसऱ्या शोधानं मानवी जगण्याची रीतच बदलून टाकावी, असं घडत आहे.

गेल्या अर्धशतकात अनेक शोधांचे मोठे टप्पे मानवी प्रजातीने गाठले खरे; पण त्यात थोडीफार आर्थिक प्रगती घडतानाच तात्विक, नीतिशास्त्रीय, मानवी मूल्यचौकटीबाबतच्या निर्णयांचं, सीमारेषांचं भान मात्र हरवलं आहे. दुसऱ्या महायुद्धाआधी घडलेल्या अमानुष क्रौर्याप्रमाणेच नंतरच्या काळातही दमन, अनियंत्रित हिंसा, किळसवाणं क्रौर्य म्हणूनच पुन्हापुन्हा उजळ माथ्यानं परतत आहे. वरवर जरी असं वाटत असलं की, मानवजात आता निसर्गाच्या लहरीवर अवलंबून नाही किंवा रानटी प्रथा, समजुती यामुळे होणाऱ्या हत्या थांबल्या आहेत; साथीच्या रोगांनी एका फटक्यात लाखो लोक मरण पावणं ही गोष्ट वैद्यकीय तंत्रज्ञानानं थांबवता येत आहे. किंवा गुलामी, माणसांची खरेदी विक्री अशा प्रथा आता अत्याधुनिक जगतात अस्तंगत झाल्या आहेत तरी वास्तवात मात्र आजही मानवी आयुष्य विविध प्रकारच्या बेडय़ांनी बद्ध आहे. वंश, जात, आर्थिक वर्ग, लिंगभाव, धर्म, प्रदेश या सर्वच बेडय़ा आज कधी नव्हे इतक्या मनामनात बळकट झालेल्या दिसत आहेत- पण सुप्त रूपात.

गेल्या अर्धशतकात साम्राज्यवाद संपून अनेक देश स्वतंत्र झाले. या नवस्वतंत्र देशांनी शेती, उद्योग, सेवाक्षेत्र, मानवी हक्कजतन या क्षेत्रात भरीव कामगिरीही केली आहे. मध्यमवर्ग काहीसा विस्तारला आहे. यापैकी बहुतेक देशांत आज जागतिक बाजारपेठेच्या शाखा फोफावलेल्या दिसतात. मॉल भरून वाहात आहेत. ई-कॉमर्स, शेअरबाजार अशा रूपात जागतिक मध्यमवर्गाचे व्यवहार या गरीब देशांतही वाढत आहेत. सुखाचा एक आभासी गोडवा सर्वत्र भरून राहिला आहे. नववर्षांच्या उत्सवी चकचकाटात मॉल, रिसॉर्ट, हायवे भरून वाहात असतानाच अस्तित्त्व टिकवण्याची लढाई हरवलेले, भूमिहीन, बेरोजगार, शेतजमिनींची अल्पशी भरपाई मिळालेले लक्षावधी लोक मध्यमवर्गाच्या स्मृतिभ्रंशाच्या वावटळीत जणू हरवले आहेत. आदिवासी म्हणतात, ‘वाघा-जंगलाची भीती आम्हाला कधी वाटत नाही. पण शहरात जाण्याची आणि शहर जंगलात येण्याचं भय वाटत राहातं’. मॉलमधली जेमतेम किमान वेतन मिळवणारी विक्रेती मुलगी मेकअप, ग्रुमिंगचे धडे अंगी बाणवून सुपरवायझरनी पढवलेले शुभेच्छा संदेश आठ तास देत राहाते. त्याच वेळी आईला फोनवर मार्गशीर्षांतला गुरुवारचा उपवास आणि व्रत मनोभावे करत असण्याची खात्रीही देत असते. आपल्या उठवलेल्या झोपडीच्या जागी उभा राहिलेला उड्डाणपुलाचा मोठा पिलर पाहात अशक्त बाप अर्धशिक्षित तरुण मुलाचं भविष्य चांगलं असेल अशी आशा बाळगत राहातो.

या सगळ्यात मानवी जीवनाचं श्रेय आणि प्रेय काय हा प्रश्न पुन्हा पुन्हा पुढे येतो. आधुनिकतेनं मूठभरांना स्वातंत्र्य दिलं आणि स्वातंत्र्य म्हणजे काय ते ठरवण्याची सत्ताही बहाल केली. सत्ताधारी आपलं प्रभुत्व टिकवण्यासाठी कधी ज्ञान, कधी पाशवी बळ तर कधी समान शत्रू दाखवण्याची क्ऌप्ती वापरत असतात. युद्धं, उन्माद, हिंसा, दंगली आणि त्यांचं सतत जागतं ठेवलेलं भय यामुळे सत्ताधारी लक्षावधी लोकांना आज्ञाधारक व्हायला भाग पाडतात. मग कधी कुटुंब, कधी जात-वंश-धर्म-प्रदेश-राष्ट्र, कधी परंपरा यांपुढे चिकित्सा रद्दबातल ठरते.

संपूर्ण विसावं शतक नवे प्रश्न विचारणं, नवी समीकरणं तयार करणं आणि उत्तर मिळाल्यावर पुन्हा चिकित्सा करणं यालाच वैचारिक – सामाजिक प्रगती म्हणतात असं आपण ऐकत राहिलो. त्यातूनच आधुनिकता, लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य हाती लागेल हे स्वप्न आपल्या डोळ्यांसमोर होतं. प्रत्यक्षात मात्र भारतासारख्या शेकडो नवस्वतंत्र देशांत प्रगती आणि विकासाच्या स्वप्नाचा पाठपुरावा करताना प्रश्न न विचारण्याचं आज्ञाधारकत्त्व  अधिकाधिक बिंबवलं गेलं. विज्ञानवादी तर्काच्या एकांगी झारीतून हजारो अभियंते- तंत्रज्ञ- शास्त्रज्ञ- शिक्षक- डॉक्टर- वास्तुविशारद घडले खरे; परंतु त्यांच्यात प्रज्ञा- शील- करुणा- मत्री औषधालाही नव्हती. यंत्र घडवताना आणि सतत यंत्रांसोबत काम करता-करता प्रगतीच्या सामूहिक स्वप्नानं झपाटलेले नवस्वतंत्र देशांतले लक्षावधी नागरिक यांत्रिक होत गेले. त्यासोबतच एक सामूहिक बधिरपणाही पसरला. इतका, की रक्तपात हळूहळू मनोरंजन वाटण्याइतपत सहज भासू लागला. अशा सर्व समाजांत यांत्रिकीकरणानंतरची अवस्था सनिकीकरणाची येते. यात एकेका व्यक्तीची-एकेका कुटुंबाची प्रगती झाली खरी. धरणं, महामार्ग, पूल, रेल्वेमार्गाचं जाळं यांतून व्यापार-उदीम, उद्योगधंदे, नवी मूल्यं पसरली. परंतु, त्यासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या, अतिपाण्यानं जमिनी खारपड झाल्या, जी कांदळवनं नष्ट झाली त्यांचा आवाजही आला नाही. त्याचसोबत अनेक गोष्टी हरपल्या. अनेक जातीची फुलपाखरं आणि त्यांच्यामुळे फळणारी फुलं आणि पिकं जशी गेली, तसंच हरणांसोबत, पक्ष्यांसोबत सहअस्तित्त्वाच्या संस्कृतीचं संचितही गेलं. उरुग्वेमधला द्रष्टा लेखक एडुआडरे गलियानो वसाहतवादाच्या केवळ आर्थिक किंवा राजकीय परिणामांविषयी बोलत नाही, तर समुद्रकाठावरची चमचमती वाळू, पाचूसारखी बेटं, अंधारलेली विस्तीर्ण जंगलं आणि त्या आश्रयाला राहाणाऱ्या समुदायांच्या मौखिक कहाण्या, मूल्यव्यवस्था विकास आणि प्रगतीच्या नावाखाली कशा लुटल्या गेल्या याचं सार्थ वर्णन करतो.

साम्राज्यवादाच्या विजयी कहाणीत फसवणुकीचा काळा इतिहास असतोच. नवतंत्रज्ञान, व्यापारी भांडवल आणि कार्यक्षम शस्त्रं यांआधारे निम्म्यापेक्षा जास्त जग युरोपीय सत्तांनी मुठीत ठेवलं. आता सत्तर वर्षांपूर्वी ती राजकीय सत्ता संपली असली तरी जाणीव आणि नेणिवेतली ‘साधनीभूत तार्किकता’ मात्र गेलेली नाही. या साधनीभूत तार्किकतेमुळे पाश्चात्त्य जगाचं नाझीकरण आणि सनिकीकरण होऊ शकलं. युरोपीय ज्ञानोदयातून मिळालेली उत्तमोत्तम मूल्यं त्या वावटळीत नष्ट झाली होती. आज नववसाहतवाद आणि नवसाम्राज्यवादाची नवी जटिल रूपं दर दिवशी पुढे येत आहेत. आताची साधनीभूत तार्किकता अशी आहे की एकीकडे नफ्याची हाव आणि दुसरीकडे नव्यानं उत्पादित केलेल्या परंपरांचा बाजार यामुळे आभासी सुखकारक गोडव्याची बधिरता सर्वत्र व्यापून आहे.

विस्तीर्ण नदीपात्र दिसलं की धरण, मोकळी गवताळ कुरणं दिसली की टाऊनशिप, शहराच्या मधोमध मोठी हिरवाई दिसली की व्यापारी संस्था उभारण्याचे मनसुबे, हिरवे डोंगर दिसले की त्याखालचे खनिजसाठे दिसणारी अमर्याद नफाकेंद्री मानसिकता मात्र मागे पाय रोवून उरलेली आहे. कार्यक्षमतेच्या एकसपाट, एकांगी स्वप्नांनी झपाटून धावणारे शेकडो देश जीडीपीचा चषक पटकावण्यासाठी धापा टाकत आहेत. अशा वेळी, आंदोलकांची फुटलेली डोकी, रांगेत उभं राहून जीव गेलेले लोक, उपजीविकेची साधनं, घरं बुडालेले धरणग्रस्त यांना अदृश्यच केलं जातं. आणि ते दिसले तरी ते शत्रूच आहेत, अशी खात्री पटवली जाते.

एकविसाव्या शतकातल्या दीर्घ पल्ल्याच्या वैचारिक आणि जाणिवेच्या पातळीवरच्या लढाईचं सार हेच असेल की, साधनीभूत तार्किकतेतून मिळालेलं व्यक्तिस्वातंत्र्य, नफाकेंद्री सामूहिक स्वप्न हवं आहे, की नव्यानं घडवलेली समुदायकेंद्री प्रज्ञा-शील-करुणा-मत्री यावर आधारलेली श्रेयाची कल्पना मूर्त करायची आहे. अन्यथा, साधनीभूत तार्किकतेतून नफा, अधिक नफा, आणि यांत्रिकीकरण-बधिरीकरण ही दिशा संभवते. त्यासाठी अपरिहार्यपणे संपूर्ण समाजाचं आज्ञाधारक सनिकात रूपांतर करून सनिकीकरणातून हिंसा, अधिक हिंसा हाच अटळ परिणाम संभवतो.

लेखिका ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त

समाजशास्त्राचे अध्यापन करतात.

ईमेल : shruti.tambe@gmail.com