श्रुती तांबे

समाजशास्त्र. इतिहास. राज्यशास्त्र. अर्थशास्त्र.

समाज माणसांशी जुळलेल्या माणसांचा असतो, की सारख्याच प्रकारच्या वस्तूंशी जोडलेल्या माणसांचा?

पोट भरणं आणि स्वत:ला जिवंत ठेवणं या गोष्टींपलीकडे गेल्यावर माणूस या हिकमती प्राण्याने वस्तू तयार करायला सुरुवात केली. वस्तूंचा संचय हे मग मानवी जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. याविषयीचे ग्रथित पुरावे गेल्या २१०० वर्षांपासून असले तरी गेल्या ६०० वर्षांत मानवी आयुष्यात या वस्तूंच्या साम्राज्याचं महत्त्व अपरंपार वाढलं. त्यामुळे मानवी समाज म्हणजे सामाजिक संबंधांचं जाळं या सुलभ व्याख्येपासून आता आपण पार कचऱ्याची बेटं, कचऱ्याची जहाजं अशा थ्रो अवे सोसायटी या वर्णनापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.

चैन, विलास, सुखोपभोग ही काय आजची अपत्यं नाहीत, हे खरंच. परंतु आजच्या इतक्या उपभोगाच्या परी आणि त्याचं जगड्व्याळ रूप सद्य:काळात करोना आणि पैशाच्या अभावी हजारो लोक मरत असताना-अंगावर येत आहे. उपभोगाची व्याख्याच गमतीची आहे. गरजा भागवणं हाही उपभोग आणि चैनीच्या वस्तू येनकेनप्रकारेण मिळवणं हाही उपभोग. गेल्या शतकभरात जगातले कोटय़वधी लोक गरिबीत ढकलले गेले आणि कोटय़वधी लोक गरिबीतून मध्यमवर्गात प्रवेश करते झाले. युद्धं, चकमकी, पूर, दुष्काळ, चक्रीवादळांनी ही वरखाली होणारी प्रक्रिया अधिकाधिक धक्कादायक आणि नाटय़मयही बनत असते. उपभोगाशी संबंधित सर्वच सेवाउद्योगांच्या, त्यांच्या बाजारपेठांच्या महाप्रचंड विस्ताराकडे बघून वाटतं, की आता पुढची पायरी काय असेल? नुकतीच करोनाकाळात एका अमेरिकन खासगी कंपनीच्या अवकाशयानाच्या उड्डाणाची बातमी आणि ‘अंतराळप्रवासा’ची कल्पना उपभोगाच्या पूर्णत: नव्या अवताराचा केवळ अंदाज देऊ शकते.

माणूस मोठा की त्याच्या मालकीच्या वस्तू मोठय़ा असं पूर्वी म्हणत असत. गोपाळ गणेश आगरकरांनी बायकांनी सुटसुटीत पोशाख करून स्वैंपाक करावा, दागिने मिरवू नयेत, अशा सूत्रांवर वारंवार लिहिलं होतं. वस्तुविनिमयामागे सुटसुटीतपणा, जगण्यातली सोय यापेक्षा उपभोग, सुखविलास आणि त्याचे प्रदर्शन महत्त्वाचे ठरते. त्यातही इतरांवर छाप पाडणे, आपली पत, श्रीमंती दाखवून दबदबा निर्माण करणे हेच उद्देश अधिक महत्त्वाचे असतात, हे आगरकर बुद्धिप्रामाण्यवादाचा वापर करून सांगतात.

१९९० नंतर भारतातला उच्चमध्यमवर्ग विस्तारला. त्याचबरोबर अनेक कुटुंबांचा गरिबीतून वर येऊन कनिष्ठ मध्यमवर्गात शिरकाव झाला. या नव्या मध्यमवर्गाच्या अन्नधान्यापासून ते चपला, सायकली, मोटारसायकली- शहरी घरं इथपर्यंतच्या गरजांमुळे भारत हा एक भलीमोठी बाजारपेठ म्हणून उभा राहिला. मूलभूत गरजांपलीकडच्या ग्राहकोपयोगी वस्तूंचा बाजार विस्तारला. मात्र या विस्तारलेल्या मध्यमवर्गाला विस्मृतीची लागण तर झालेली नाही? केवळ तीन दशकांपूर्वी हा आजचा उच्चमध्यमवर्गीय ज्या आर्थिक, सामाजिक गटात मोडत होता, त्याच गटात आजही कोटय़वधी लोक आहेत, हे तो गट विसरलाय की त्याच्या माणूसपणावर त्याचं ग्राहकपण हावी झालं आहे? एकोणिसाव्या शतकातल्या विचारवंतांनी मूलभूत गरजा आणि चैनीच्या गोष्टी यातल्या भेदांवर बरंच लिखाण केलं होतं. आपल्याकडे १९८० पर्यंत रोटी, कपडा और मकान या गरजा आणि गरिबी हटाव ही घोषणा होती. नंतर मात्र या मूलभूत गरजांची चर्चा सार्वजनिक विश्वातून मागे पडली. मग आपल्याच समाजातले भुकेकंगालांचे लोंढे नजरेआड करून श्रीमंती मिरवणं हेच महत्त्वाचं होऊ लागलं.

प्रबोधनकाळातल्या इटलीत वैभव दाखवण्याचे मार्ग देवाच्या नावाने प्रासाद उभारणे, श्रेष्ठ चित्रकारांकडून चित्रे रंगवून घेणे, रेशमी वस्त्रांवर सोन्याचे जरीकाम याचे वेड सीमेला पोहोचले तेव्हा गिरालामो सावानारोला या धर्मोपदेशकाने भपकेबाज वस्तूंची होळी १४९७ साली फ्लोरेन्समध्ये केल्याचा उल्लेख सापडतो. १७व्या शतकात चीनमध्ये अफू, कापूस, रेशमाच्या निर्यातीतून मिळालेल्या संपत्तीमुळे तिथले व्यापारी/ मोठे जमीनदार विलासी आयुष्य जगत होते. असंच इंग्लंड आणि युरोपातल्या इतर देशांतही घडत होतं. त्या त्या समाजातल्या मूठभर श्रीमंतांना हे विलासी आयुष्य शक्य होतं ते केवळ गुलाम म्हणून काम करणाऱ्या, कोणतेही मानवी हक्क नसणाऱ्या असंख्य कामगारांमुळे. या दोन वर्गामध्ये असलेली प्रचंड दरी फ्रेंच आणि इंग्रजी साहित्यातून दिसते. आजही बिनचेहऱ्याचे जगभर कोपऱ्याकोपऱ्यांमधले कामगार नावीन्यपूर्ण, फॅशनेबल गोष्टी कवडीमोल मजुरीच्या बदल्यात निर्माण करताना दिसतात.

पॅरिसमधल्या जगप्रसिद्ध आर्केड्स या १९व्या शतकातील आधुनिक बाजाराविषयी लिहिताना वॉल्टर बेंजामिन म्हणतात : ‘आधुनिकता म्हणजे गरजांपलीकडचं वस्तूकरण’. डौलदार जगण्याची भूक, निकड, गरज, आणि नवनव्या वैचित्र्यपूर्ण गोष्टींची, सुखोपभोगांची आस यातला फरक अनेक तत्त्वज्ञांनी स्पष्ट केला आहे. जॉन केनेथ गालब्रेथ हे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात अमेरिकन सरकारचे अर्थसल्लागार. युद्ध संपल्यावर अर्थरचनेचा गाडा रुळांवर आणण्यासाठी तेव्हा तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. अनेकांनी विविध उपाय सुचवले. परंतु त्यांच्या अ‍ॅफ्लुअंट सोसायटी या ग्रंथात वस्तुउपभोग हीच आर्थिक वाढ आणि अमेरिकन समाजाच्या प्रगतीची किल्ली म्हणून त्यांनी आग्रहानं मांडली. अनेक अभ्यासकांच्या मते ती विचारसरणीच आजही जगभरच्या धोरणकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहे. या धोरणात गृहीत असलेली धारणा अशी की, लोकांनी भरपूर काम करावं, गरजा भागवून मग नावीन्यपूर्ण व चैनीच्या वस्तू घ्याव्यात, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा अधिकाधिक विस्तार साधता येईल. यातूनच जगभर मास सोसायटी आणि कन्झ्युमर सोसायटीचा जन्म झाला. ढिगाने निर्माण झालेल्या एकसाची टेबलंखुच्र्यापासून ते विवाह सोहळ्यांपर्यंत आणि सिंथेटिक कपडय़ांपासून ते टीव्हीवरच्या जाहिरातींपर्यंत साधर्म्य असणारे समाज १९६० नंतरचे. अमेरिकन समाजाविषयीची द चॅलेंज ऑफ अ‍ॅफ्लुअन्स, अ‍ॅफ्लुएंझा, कन्झ्युमिंग लाइफ ही पुस्तकं जिज्ञासूंनी जरूर पाहावीत. नंतरच्या काळात वाढलेल्या पराकोटीच्या भोगलोलुपतेतले धोके दाखवणारी अमेरिकन शिक्षिकेनं तयार केलेली लघुचित्रपटाची मालिका-‘स्टोरी ऑफ स्टफ’ ही या संदर्भात जाणीवपूर्वक पाहावी.

भारतासह तिसऱ्या जगात मात्र या वापराचा उपभोगाचा जणू विस्फोट झाला, तो १९९० नंतरच्या अलीकडच्या बाजारवादावर आधारित जागतिकीकरणाच्या लाटेत. मग आपल्याकडेही सुक्या कचऱ्याची विल्हेवाट नावाची नवीच समस्या उभी राहिली- श्रीमंतीतून येणारी नवी समस्या. आज एकीकडे वस्तूंच्या फेकलेल्या ढिगाऱ्यांतून उत्सर्जित होणारे वायू, अचानक होणाऱ्या हवामान बदलांचा आणि पृथ्वीचे भविष्य याविषयीचे सिद्धांत मानवाच्या वस्तूकरणाविषयी आणि मानवाच्या वस्तूंच्या हव्यासाविषयी एका दिशेने मांडणी करत आहेत. दुसरीकडे खूप काम, खूप पैसा, नव्या वस्तूंची खरेदी आणि त्यासाठी अधिक पैसा-अधिक काम ही विचारसरणी गालब्रेथच्या अमेरिकेपुरती मर्यादित न राहता मूलभूत गरजाही न भागलेले जगभरातील लोक ती अंगीकारत आहेत. तिसरीकडे सौ चूहे खा के बिल्ली हाज चली न्यायाने अतिप्रगत देशांतील काही लोक आता स्लो फूड, स्लो रीडिंग, मिनिमॅलिस्टिक लिव्हिंग याकडे वळत आहेत. जगभरचे मूठभर का होईना पण हजारो लोक शाश्वत विकास, शाश्वत जीवनमूल्ये यांची वाट चोखाळत आहेत.

पोट भरणाऱ्या साध्या समाजापासून ते ‘थ्रो अवे’ संस्कृतीतल्या समाजांपर्यंतच्या मानवी समाजाच्या प्रवासाची कहाणी बघायची, तर उदाहरण घेता येईल ते खेळण्यांचं. मुलांना खेळणी विकत आणून द्यायची गरजच नसते, असं सगळे मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ सांगत असूनही ‘खेळणी’ या कृत्रिम गरजेवर संपूर्ण जग अक्षरश: अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतं. ही अलीकडच्या दोन-तीन शतकांत वेगाने निर्माण केलेली गरज आहे. पण आज नवपालकांसाठी खेळणी विकत घेणं हा त्यांनी मनापासून स्वीकारलेला आधुनिक पालकत्व सिद्ध करण्याचा भाग आहे. जगभर लेगोसारख्या महाकाय कंपन्यांची मक्तेदारी आहे. अर्थात बहुसंख्य खेळणी चीनमधल्या कामगारांच्या मानवी हक्क हनन करणाऱ्या  कारखान्यांत तयार होतात. बंदुका, पिस्तुलं, रणगाडे, कार्स, तोफा, युद्धनौका, गौरवर्णीय कमनीय बांध्याच्या बार्बी ही लोकप्रिय खेळणी आहेत. बार्बी हा शब्द तर आता बाहुलीसारखं सर्वनाम झालाय. गावाकडच्या जत्रांमधले चार-पाच फुटी जेसीबी, ट्रक ग्रामीण भागातल्या दलित, आदिवासी, बहुजन मुलांची मोठेपणीच्या भूमिकांची उजळणी करून घेत असतात. मोठाल्या हायवेच्या कामांवर हीच मुलं उद्या कामगार म्हणून खोदाई, सपाटीकरणाची कामं करणार असतात. वेब्लेड, व्हिडीयो गेम, प्ले स्टेशन्स ते सिम्युलेशन झोन हा प्रवास लहान मुलांना लहानपणीच माणूस बनण्याआधीच ग्राहक बनण्याचं शिक्षण देतो. खेळण्यांच्या किती तरी कंपन्यांच्या मूळ कंपनीची गुंतवणूक पार शस्त्रास्त्र उद्योगापासून ते रसायन उद्योगापर्यंत आहे.

खिडक्या-दारांचे पडदे, विविध समारंभांसाठीचे विविध प्रकारचे कपडे- व्यायामाचे, रात्री झोपतानाचे, पोहण्यासाठीचे, कामाच्या ठिकाणी वापरण्याचे किंवा घरगुती कपडय़ांची बाजारपेठ वाढते आहे. पण तिचा संबंध भूक निर्देशांकाशी लावता येईनासा झाला आहे. अमेरिकेप्रमाणेच आज भारतीय समाजातील उच्चवर्ग हा थ्रो अवे सोसायटी झाला आहे. जसा युरोप-अमेरिकेतील पाणी- बाटल्यांपासून ते कचकडय़ाच्या फेकलेल्या वस्तूंपर्यंतचा कचरा ‘कार्बन फूटप्रिंट दंडा’तली पळवाट म्हणून जहाजं भरभरून भारतात, आफ्रिकेतल्या देशांमध्ये आणून टाकला जातो आहे. ग्राहक समाजाची ही पुढची अवस्था. मग पुण्या-मुंबईचा कचरा रिचवायला नवनवी डम्पिंग ग्राऊंड्स शोधली जात आहेत.

ऋण काढून सण करू नये म्हणणारी जुनी कृषिव्यवस्था आणि शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि क्रेडिट कार्ड हीच प्रगतीची गुरुकिल्ली मानणारी जागतिक अर्थरीत असा मोठा पल्ला भारतीय समाजानंही अल्पावधीत ओलांडला आहे. शहरी तरुण पिढी ही क्रेडिट कार्डावरच स्वप्नं विकत घेते आणि ती भागवता येईल, असे पर्याय भौतिक दुनियेत मिळतील ना, या चिंतेत जगते, असं दिसतं आहे. जाहिरातींच्या लोंढय़ात वाहातच निर्णय करणारा ग्राहक एवढंच आज एकविसाव्या शतकातल्या माणसाचं स्वरूप उरलं आहे. नव्हे, तो माणूस या कोटीऐवजी ग्राहक या कोटीपर्यंत अवनत झालेला आहे.

मानवी अस्तित्वाचं प्रेय आणि श्रेय हे केवळ वस्तुसंचय आहे की काय हे वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसाचं माणूसपण पैसे खर्च करू शकण्यात आहे की तात्कालिकाच्या पलीकडचा नीतिशास्त्रीय, सौंदर्यशास्त्रीय विचार आणि विवेक जपण्यात आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधणं हेच महत्त्वाचं आहे.

shruti.tambe@gmail.com