मनच हातात आलं नाही, तर सद्गुरू तरी काय करील, असं उमदीकर महाराज विचारतात. आता कुणाला वाटेल, मन ताब्यात येणं स्वबळावर का शक्य आहे? साधकानंच जर मन ताब्यात आणायचं असेल आणि नंतर सद्गुरू त्याला मोक्षपथाला नेणार असतील, तर काहीच साधणार नाही, हेच खरं. तेव्हा साधक स्वबळावर मन ताब्यात आणू शकणार नाही, हे बरोबर. पण ते मन ताब्यात येण्यासाठीच तर सद्गुरू बोध आहे! त्या बोधानुरूप जगू लागलो, तरच मनातली भ्रम आणि अज्ञानाची पुटं नष्ट होतील. कारण कोणाचं मन कुठे गुंतून हतबल आहे, हे केवळ सद्गुरूच जाणतात. माउली सांगतात त्याप्रमाणे, मोठमोठी लाकडं पोखरणारा भुंगा कमळाच्या पाकळ्यात अडकला की मात्र त्या नाजूक पाकळ्या चिरून बाहेर पडत नाही. तो त्यातच बंदी होऊन जातो. तसं साधकाचं एरवी कठोर असणारं मन कुठं हळवेपणानं गुंतून हतबल होईल, हे कळणारही नाही. त्यामुळे काटेरी झुडपात अडकलेलं रेशमी वस्त्रं अलगद प्रत्येक काटय़ांतून सोडवावं त्याप्रमाणे सद्गुरू शिष्याला प्रत्येक मोहविषयाच्या काटय़ातून अलगद बाहेर काढतच असतात. त्यासाठी त्यांच्या बोधानुरूप मनाचं मुंडण करण्याची प्रामाणिक इच्छा मात्र असली पाहिजे. ती असेल, तर कृती सुरू होईल. तेव्हा आधी मन मुंडा, मग परब्रह्म धुंडा, हा सल्ला प्रत्येक साधकाला आहे. जर जीवनाचा खरा हेतू काय, हा शोध घ्यायचा असेल, तर संकुचित दलदलीत अडकलेलं मन त्यातून बाहेर काढावंच लागेल. ते सोपं नाही, पण अशक्यही नाही. प्रयत्न सुरू असताना अचानक निर्धार सुटेल. मनाचं पाऊल घसरेल. पण तरीही परत परत तो बोध बिंबवत प्रयत्नांची कास धरलीच पाहिजे. मनाच्या मुंडणाबरोबरच उमदीकर महाराज दंभाचा त्याग करायला सांगतात. हा दंभ मात्र फार सूक्ष्मपणे त्यांनी मांडला आहे. महाराजांच्या मूळ पत्राचा अर्थ स्पष्ष्ट होईल, असं त्याचं सुलभ रूपांतर तुळपुळे आणि हरिदास यांनी केलं आहे. त्या पत्राचा आशय असा की, ‘‘सर्वानी नेम आणि भक्ती वाढवावी. मनुष्य जसा भक्तीचा थाट करील तसे ईश्वर त्याचे कल्याण करील. खऱ्या भावाने, कृत्रिमपणा न ठेवता भक्ती वाढवावी. कृत्रिमपणा म्हणजे अंत:करणात वीट, कंटाळा असणे, पण वरून मात्र खरा उत्साह असल्याचं भासवून औपचारिक भक्ती करणे. या कृत्रिमपणामुळे मनुष्य आपला आपण वैरी होतो आणि भक्ती करूनही करंटेपणा भोगतो. त्यास भक्तीचा लाभ आणि आनंद मिळत नाही. भोगलेल्या विषयांच्या आनंदाचं स्मरण झालं की अंत:करणात आनंद होतो आणि मनुष्य त्याच्या चिंतनात रमतो. तो आनंद आपण लोकांना कळू देत नाही. वर वैराग्य दाखवतो. तसा आनंद ईश्वराच्या स्मरणाने अंत:करणात उत्पन्न व्हावा आणि भक्तीच श्रेष्ठ आहे या अनुभवानं तसा आनंद अंत:करणात जडून जावा आणि दृढ व्हावा, अशा भावानं भक्ती करावी. म्हणजे देव कोण आणि भक्त कोण, याचा निवाडा होतो. तेव्हा सर्वानी भक्ती वाढविण्याकडे लक्ष द्यावे.’’ दंभ म्हणजे आपण ढोंग मानतो. दंभ करणाऱ्याला माहीत असतं की आपण भक्तीचं खोटं प्रदर्शन मांडून दुसऱ्याला फसवत आहोत. इथं उकललेला दंभ फार सूक्ष्म आहे. ज्याच्यात तो आहे त्याला त्या दंभाची आणि त्यापायी होणाऱ्या आत्मघाताची जाणीवच नाही. आपण भक्ती करीत आहोत, असं तो मानत आहे. या भक्तीला दंभाचं अस्तर आहे आणि अनेकदा भक्तीच्या वस्त्रापेक्षा या अस्तराचंच वजन जास्त आहे!

– चैतन्य प्रेम