प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो; त्यासाठी काही सवयींना आणि जगण्याच्या पद्धतीला कसं वळण लावण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे, हे आपण पाहिलं. हा अभ्यास सुरू झाला की, मन अविचाराकडून सद्विचाराकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे वाटचाल करू लागेल. पण तो सुविचार, ती सकारात्मकता पक्की होण्यासाठी दुसरा मणी आहे, तो म्हणजे – ‘आठवडय़ातून एक दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगती करावी!’ थोडक्यात, स्वअभ्यासाला सत्संगतीची जोड द्यायची आहे. कारण असत्कडून  सत्कडे जाताना संगतही सत्चीच हवी! जे जे शाश्वत आहे, सत्य आहे त्याच्या प्राप्तीचं मूल्य मनात रुजवण्याचा अभ्यास करीत असू तर संगतीलाही महत्त्व आहे. जे अशाश्वत आहे, जे भ्रम आणि मोह वाढविणारं आहे, त्याचीच ओढ ज्याला आहे, अशा व्यक्तींचा सहवास मग आपल्या त्या अभ्यासाच्या आड आल्याशिवाय राहणार नाही. बरं, काही वेळा असा सहवास अटळ असतो. तो जसा काही काळापुरता असू शकतो तसाच अनेक वर्षांचा किंवा जन्मभराचाही असू शकतो! काही काळाचा सहवास म्हणजे, एखाद्या कौटुंबिक वा परिचितांच्या समारंभात आपल्याला सहभागी व्हावं लागणार आहे. तिथं केवळ भौतिकाचीच चर्चा, परिनदा आणि वायफळ गप्पा होतील, अशी आपली कल्पना आहे. ज्या वेळी शक्य आहे त्या वेळी अशा कार्यक्रमात सहभागी होणं काही जण टाळतात. त्यासाठी मुलांच्या परीक्षा, प्रकृतीच्या तक्रारी सांगितल्या जातात. वृद्ध माणसांना तर, ‘वयपरत्वे आता मला कुठे पूर्वीसारखं जाणं जमत नाही’, हे सांगायची मोठी सोय भगवंतानंच करून ठेवली आहे. पण तरीही दरवेळी असं करणं साधेलच असं नाही आणि योग्यही नाही. तर अशा ठिकाणी अवश्य जावं आणि तिथं आपलं ध्येयाचं अनुसंधान टिकतं का, याचा अभ्यास करावा! अगदी वरकरणी खावं-प्यावं, वायफळ वाटतील अशा गप्पाही माराव्यात, पण मनात ध्येयस्मरण सुटू देऊ नये. असा सहवास काही वर्षांचा असतो म्हणजे, आपल्याला शेजार कसा मिळेल, हे काही आपल्याला माहीत नसतं. शेजार जर असा आपल्या अभ्यासाला बाधक लाभला तरी तो अटळ असल्यानं स्वीकारला पाहिजे. त्यातून मनाचा तक्रारी करण्याचा स्वभाव किती पालटता येतो, हे पाहण्याची संधी लाभली आहे, असं मानून आपल्या स्वभावाला मुरड घालण्याचा, प्रतिकूल भासणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार करण्याचा अभ्यास करीत गेलं पाहिजे. जन्मभरही असा सहवास वाटय़ाला येऊ शकतो, याचा अर्थ असा की, जीवनाचा जोडीदारच आपल्या अभ्यासाच्या विरोधात असू शकतो. तेव्हाही आणि संवादानं, चच्रेनं त्याचं वा तिचं मन अनुकूल होत नसेल, तर कर्तव्यकर्म न सोडता मनातून आपल्या ध्येयाबद्दलचा पक्केपणा तपासण्याची ही संधी आहे, असं मानून मनातून स्मरणाचा अभ्यास वाढवीत न्यावा. हे झालं अटळ सहवासांबद्दल. पण कित्येकदा आपण गरज नसताना, अकारण मनाच्या ओढीला भुलून ज्या असत् संगामध्ये गुंततो त्याचाच अग्रक्रमानं विचार केला पाहिजे. त्या विचारातून जे निष्कर्ष गवसतील त्यानुरूप आपली जीवनदृष्टी सुधारून घेतली पाहिजे. पण हे सारं साधण्यासाठीच पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेल्या दहा बोधमण्यांच्या माळेतला दुसरा मणी सांगतो : ‘आठवडय़ातून एक दिवस तरी संतांची किंवा साधकाची संगती करावी’. कारण अथक साधनेनं जे साधलं जातं ते शुद्ध सत्संगानं अनायास साधलं जातं, असा निर्वाळा बहुतेक सर्वच सत्पुरुषांनी दिला आहे.

– चैतन्य प्रेम