भक्ताच्या साधनेला सद्गुरूंच्या कृपाशक्तीची जोड लाभते तेव्हाच खऱ्या अर्थानं सर्व भ्रम, मोहाचे दोर तुटतात आणि खऱ्या अर्थानं जागृत झालेले अष्टसात्त्विक भाव एका भगवंताकडेच वळतात. अशा वेळी भक्ताची जी दशा होते ती वर्णिताना नाथ म्हणतात, ‘‘हरिला पाहुनी भुलली चित्ता। मंदिरीं घुसळी डेरा रिता ।। ’’ त्या राधेला सर्वत्र एक हरीच दिसतो आहे आणि त्यामुळे कोणत्याही कामात तिचं जणू चित्तच नाही. ती आपल्या घरात ताकाचा डेरा घुसळत आहे, पण तो रिकामा आहे! कुंडलिनी जागृत होते आणि रिकाम्या डेऱ्यात म्हणजेच पोकळ सुषुम्नेत ऊध्र्वगामी घुसळण सुरू होते, हा एक अर्थ आहेच.. पण भक्तीच्या अंगानं असलेला अर्थही फार हृदयस्पर्शी आहे. आजवर जिवाची काय सवय होती? की अमुक केलं तर अमुक मिळालंच पाहिजे, हीच मनाची स्वाभाविक घडण होती. आता मात्र कर्तव्यं तेवढी होतात, पण फळाची अपेक्षाही मनाला शिवत नाही. आधी डेरा घुसळताना लोण्याकडे मन चिकटलं असे, आता मात्र जी जी र्कम वाटय़ाला आली आहेत ती करताना मन मात्र फलाशेनं भरलेलं नाही, ते रिकामं आहे! रिकामा डेरा घुसळताना लोण्याची इच्छाच नाही, त्याप्रमाणे रित्या मनानं केवळ कर्तव्यंर्कम करताना फलाशेची इच्छा नाहीच आणि कर्तेपणाच्या प्रसिद्धीचीही इच्छा नाही! जे काही आपल्याकडून घडतं ते केवळ सद्गुरू इच्छेनं आणि कृपेनंच, अशी त्या भक्ताची प्रामाणिक धारणा असते. जेव्हा अशी एकरूपता येते तेव्हाच खरं ऐक्य घडतं. त्या ऐक्याचंच वर्णन करताना नाथ म्हणतात, ‘‘मन मिळालेलें मना। एका भुललें जनार्दना ।।’’  एकदा भगवान कृष्ण गोकुळातल्या प्रेमार्त गोप-गोपींच्या आठवणींनी भावविभोर झाले. डोळ्यातून आसवं ओघळू लागली. उद्धवानं त्याचवेळी प्रवेश केला आणि साक्षात कृष्णाच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याला नवल वाटलं. त्यानं हळव्या मनानं कारण विचारलं. कृष्ण म्हणाले, ‘‘गोकुळातल्या गोपींची माझ्या विरहामुळे जी दग्ध दशा झाली आहे ती आठवून मीही रडू लागतो!’’ उद्धव म्हणाले, ‘‘ हे प्रभू त्या अज्ञ गोपींना आपण समजवत का नाही?’’ त्या अवस्थेतही प्रभूंना हसू आलं आणि ते म्हणाले, ‘‘उद्धवा, हे काम तुझ्यासारखा ज्ञानीच करू शकतो. तेव्हा ते तूच कर..’’ प्रभुंच्या सांगण्यावरून मोठय़ा ताठय़ात उद्धव गोकुळात गेले, तर त्यांना वाटलं की आपण एखाद्या उजाड आणि वैराण अशा प्रदेशात आलो आहोत! गोप-गोपीच नव्हे तर गायवासरांच्या डोळ्यांतूनही आसवांच्या रूपानं कृष्णविरहाचीच वेदना पाझरत होती.. झाडांची पानंही उदास सळसळत होती.. कान्ह्य़ाला बालपणी दही-लोणी खाऊ दिलं नाही, उलट बांधून ठेवलं, हे आठवून नंद-यशोदाही प्रत्येक क्षणी स्मरणदाह सोसत होते.. आणि राधा? कृष्णाला दिलेल्या वचनापायी तिनं श्वासोच्छवास तेवढा सुरू ठेवला होता! अशा अवस्थेतही उद्धवानं भरल्या मनानं बोलण्याचा प्रयत्न केला की, ‘‘तुम्ही मनाला समजवा!’’ त्यावर गोपी म्हणाल्या, ‘‘कुठल्या मनाला समजावू? एकच मन होतं आमच्यापाशी.. तेही तो कृष्ण सोबत घेऊन गेला आहे! आता दुसरं मनच नाही ज्याला काही समजवावं..’’ मोठय़ा ताठय़ात गोकुळी गेलेला उद्धव मथुरेला परतला तो जणू प्रेमप्रवाहात वाहात आल्यागत. येताच कृष्णाचे चरण धरत म्हणाला, ‘‘हे प्रभो! माझ्या ज्ञानाची किंमत मला कळली. एकच प्रार्थना आहे.. पुढचा जन्म जर मला येणारच असेल तर तो गोकुळातल्या गवताचाच येवो.. निदान त्या गोपींचे प्रेमचरण माझ्यावर पडतील आणि मी पावन होईन!’’

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com