प्रपंचात राहून परमार्थ साधू इच्छिणाऱ्या साधकासाठी पू. बाबा बेलसरे यांनी सांगितलेली दहा बोधमण्यांची माळ आपण जाणून घेत आहोत. आतापर्यंत सात मणी आपण पाहिले, आता आठवा मणी सांगतो की, ‘‘आपल्या साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकूनखील वादविवाद करू नये, कारण दोन्ही फार पवित्र असतात.’’ आज गुरूपौर्णिमेच्या मुहूर्ताला सद्गुरू या विषयाला स्पर्श करणारा हा बोधमणी आपल्या समोर आला आहे हा मोठा योगच आहे! त्यामुळे या बोधमण्याच्या निमित्तानं आपण सद्गुरूचिंतन करण्याची संधी साधणार आहोत. आता जेव्हा जेव्हा ‘सद्गुरू’ असा उल्लेख केला जातो, तेव्हा तो खरा सद्गुरूच अभिप्रेत असतो. बाजारू नव्हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे.

तर साधनाबद्दल आणि सद्गुरूबद्दल चुकूनही वादविवाद करू नये कारण दोन्ही गोष्टी फार पवित्र असतात, असं पू. बाबा सांगतात. त्या सांगण्यामागील अनेकानेक पातळ्यांचा विचार केला पाहिजे. विशेष म्हणजे, पू. बाबांनी साधनेचा प्रथम उल्लेख केला आहे! या साधनेबद्दल चुकूनही वादविवाद करायचा नाही, याचं काय कारण असावं?

ते कारण जाणण्याआधी मूलभूत प्रश्नाचं उत्तर जाणलं पाहिजे. तो प्रश्न म्हणजे साधना म्हणजे नेमकी काय असते, ती का करायची असते आणि तिचं पर्यवसान कशात असतं? कोणत्याही गोष्टीच्या हेतूला फार महत्त्व असतं. नव्हे, तो हेतूच कृतीसाठीचा प्रेरक असतो. साधनामार्गाकडे माणूस प्रथम वळतो त्यामागे प्रापंचिक जीवनातील अडीअडचणीच प्रथम कारण ठरतात. थोडक्यात आपलं रोजचं जगणं सुखावह व्हावं, जगण्यातील त्रास, कटकटी संपाव्यात, हा हेतू असतो. तेव्हा या कटकटींपासून मनाला मुक्ती हवी असते. खरं अध्यात्मही हेच सांगतं की मृत्यूनंतर मुक्ती किंवा मोक्ष साधायचा नाही, तर जगतानाच मुक्ती साध्य करून घ्यायची आहे. ही मुक्ती कशानं लाभेल? जेव्हा आपल्या मनाचं अशाश्वतातलं अडकत राहणं थांबेल तेव्हाच ते शक्य आहे! अशाश्वतात वाईट काय आहे? तर अशाश्वतात वाईट काही नाही, त्या अशाश्वताला आपण शाश्वत मानतो आणि त्याच्या आधारावर शाश्वत सुख मिळवण्यासाठी धडपडतो, हे वाईट आहे! जेव्हा अशाश्वताला आपण अशाश्वत म्हणून ओळखू शकू तेव्हा त्या अशाश्वतासह जीवनव्यवहार करतानाही आपण त्यात अडकणार नाही. त्या आधारावर मनात उत्पन्न होणाऱ्या अपेक्षांपासून मुक्त होत जाऊ. तेव्हा जीवनाचं, जीवनातील अशाश्वततेचं खरं स्वरूप जाणून घेऊन त्यापलीकडे शाश्वत असं काय आहे, हे जाणणं, हाच साधनेचा हेतू आहे. त्यासाठीचे सर्व प्रयत्न म्हणजे जीवनसाधना. तेव्हा साधनेचा हा खरा अर्थ आहे, ही खरी व्याप्ती आहे.

ती साधना ज्याच्याकडून प्राप्त होते तो सद्गुरू. त्या सद्गुरूच्या बोधाशिवाय जीवनाचं, जीवनातल्या अशाश्वततेचं खरं स्वरूप ओळखता येत नाही. अशाश्वताला शाश्वत मानण्याची अविवेकी वृत्ती पालटत नाही. विवेक बाणत नाही. ‘रामचरितमानस’मध्ये तुलसीदासजी सांगतात की, ‘‘बिनु सतसंग बिबेक न होई!’ सत्संगाशिवाय म्हणजे अखंड सत्याशीच जो एकरूप आहे अशा सद्गुरूच्या संगाशिवाय अंत:करणात विवेक जागृत होत नाही! खऱ्या सद्गुरूच्या सहवासानं आणि बोधानं विवेक जागा झाल्याशिवाय अविवेकी सवयी सुटत नाहीत.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com