20 April 2019

News Flash

१६५. सर्वाधिक प्रेम

आपल्या अंतरंगात असलेला परमात्मा हा आपल्या इच्छेप्रमाणे आणि आपल्या इच्छित आकाराप्रमाणे नटणारा आहे

आपल्या अंतरंगात असलेला परमात्मा हा आपल्या इच्छेप्रमाणे आणि आपल्या इच्छित आकाराप्रमाणे नटणारा आहे, याची उकल आपण करीत आहोत. आता थोडा विचार केला की जाणवेल, आपल्या अंतरंगात अनेकानेक विचारतरंग, वासनातरंग, इच्छातरंग सतत निर्माण होत असतात. त्या तरंगांशी आपण एकरूप होतो आणि त्या इच्छांच्या पूर्तीच्या विचारानं भारून त्यासाठी प्रयत्नही करू लागतो. हे सर्व परमेश्वराच्या आधाराशिवाय शक्य आहे का? माझा देह आणि देहाच्या आतील सर्व अद्भुत रचना ही त्या परमेश्वरी शक्तीवरच कार्यरत आहे. मन, चित्त, बुद्धी आणि अस्तित्वाची जाणीव हे सारं  त्या अगम्य शक्तीकडून आलं आहे. त्या सर्वाचा वापर ‘मी’शी जखडून जन्मापासून सुरू आहे आणि त्यात तो परमात्मा बाधा आणत नाही! इतकंच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या अंत:करणात ज्या ज्या इच्छा निर्माण होतात त्यांना तो धुडकावत नाही. लहानपणी चांद्या गोळा करण्याचा छंद असेल, तर त्या गोळा करण्यासाठी, जपण्यासाठी लागणारी सर्व शक्ती तोच पुरवतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ज्या ज्या इच्छा मग भले त्या फुटकळ असतील किंवा घातकही असतील, उत्पन्न होतात, त्यांना तो तत्काळ विरोध करीत नाही. पण घातक अशा इच्छांच्या जोडीला एक सावध असा सूरही आतून उमटवल्याशिवाय राहात नाही! म्हणूनच तर, जाणीवपूर्वक चुकीचं वागणाऱ्याला आपण चुकीचं वागत आहोत, ही जाणीवही आतून होत असते! तर माझ्या इच्छांशी तोही जणू एकरूप होतो आणि त्या इच्छांमधला फोलपणा मला आतून समजेपर्यंत वाट पाहात असतो! तो अधिक स्पष्ट समजावा यासाठी सद्गुरूपर्यंत नेण्याची सर्व प्रक्रिया पार पाडत असतो. हे सारं तो का करतो? तर, बाबामहाराज आर्वीकर यांच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘तो जगदात्मा दयाळू आहे, आणि त्याचं आपल्यावर सर्वाधिक प्रेम आहे! ’’ आपलं आपल्यावर सर्वाधिक प्रेम नसतं का? आपण सतत आपल्याला जपत नसतो का? आपण सदैव आपलं हित, आपली इच्छा यांची जपणूक करू पाहात नसतो का? आपल्या देहाला आणि मनाला सुख मिळावं,  हाच आपल्या प्रत्येक कृतीमागचा हेतू नसतो का? तेव्हा हे जे स्वत:वर आपण अखंड प्रेम करत असतो त्यामागची शक्तीही त्याचीच आहे. तेव्हा त्या परमेश्वराचं स्मरण करायला, त्याची आठवण ठेवायला बाबामहाराज सांगत आहेत. ते म्हणतात त्याचा उत्तरार्ध मात्र फार फार महत्त्वाचा आहे. तो कोणता? तर मुळात त्यांचं वचन असं की, ‘‘तुमच्या आत राहून तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या आकाराने नटणारा नटनागर श्रीहरी सतत आठवा आणि त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा.’’ तेव्हा त्या परमेश्वरानंच तर आजवर आपल्याला जपलं आहे, हे लक्षात घेऊन, त्याचं आपल्यावरचं हे सर्वाधिक प्रेम लक्षात घेऊन आता काय करायचं आहे? तर, ‘‘त्या जगदात्मा दयाळू परमात्म्याचे आपल्यावर असलेले सर्वाधिक प्रेम स्मरणात ठेवून त्याच्यावर तसेच प्रेम करा..’’ त्या परमात्म्यावर तसंच प्रेम करायला बाबामहाराज सांगत आहेत! आता हे तसंच म्हणजे कसं? तर तो जसा आपल्या इच्छांशी सदैव एकरूप झाला, तसं आता आपल्याला त्याच्या इच्छांशी सदैव एकरूप व्हायचं आहे! ही त्या प्रेमाची सुरुवात आणि पूर्णताही आहे!

चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

First Published on August 24, 2018 3:02 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 44