20 September 2018

News Flash

१६६. जशास तसं!

जन्मापासून स्वत:ची जपणूक करण्याची जाण आपल्या अंतरंगात उपजत आहे

जन्मापासून स्वत:ची जपणूक करण्याची जाण आपल्या अंतरंगात उपजत आहे आणि त्या जपणुकीसाठीची शक्तीही आपल्यात उपजत आहे. ही जाण देणारी बौद्धिक क्षमता आणि जपणुकीसाठीची देहिक क्षमता त्या परमेश्वरी शक्तीच्याच आधारे आपल्यात आहेत. हाच त्याच्या प्रेमाचाही प्रत्यय आहे. आता आपली खरी योग्यता, पात्रता नसताना किंबहुना प्रत्यक्ष जगण्यात त्याच्या अगदी विपरीत वर्तन होत असतानाही तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, याचं कारण तो जगदात्मा आहे आणि दयाळूही आहे! तर अशा त्या परमात्म्यावर तसंच प्रेम करायला बाबामहाराज आर्वीकर सांगत आहेत आणि हा तसंच शब्द मोठा चकवा देणारा आहे. कारण त्याचा अर्थ पटकन लक्षात येत नाही. परमेश्वर प्रेम करतो, मग आपणही त्याच्यावर प्रेम करावं, असाच त्याचा अर्थ वाटतो. पण हे प्रेम म्हणजे काय? रोज त्याची पूजाअर्चा करणं? त्याला अत्तरानं माखणं? त्याचा उत्सव थाटात करणं? पंचपक्वान्नांचा नैवेद्य करणं? उपास-तापास, पारायणं, व्रतवैकल्य करणं? आपण असंच गृहित धरतो, पण प्रत्यक्षात तसंच प्रेम म्हणजे तो जसं आपल्यावर विनाअट प्रेम करीत आहे, तसंच आपणही त्याच्यावर अपेक्षारहित प्रेम करणं, असं बाबामहाराज सुचवत आहेत. खरंतर प्रेमात अपेक्षा नसतेच. स्वत:चंच जिथं पूर्ण विस्मरण आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याचंच स्मरण असतं, तिथं अपेक्षा येणारच कुठून? एकदा एक विरहदग्ध तरुणी  प्रियकराला भेटायला धावतच निघाली होती. त्याचवेळी एक भक्त खुदासाठी नमाज अदा करण्याच्या तयारीत होता. तोच त्या तरुणीचा धक्का त्याला लागला. तिला ते जाणवलंच नाही. ती तशीच धावत निघून गेली. भक्ताचं मन संतापानं भरून गेलं. ती याच वाटेनं परत येईल तेव्हा तिला थोडं खडसावलंच पाहिजे, या विचारानं तो अस्वस्थ होऊन तिची वाट पाहू लागला. काही वेळानं ती म्लान मनानं परतताना त्याला दिसली. तो कठोरपणे म्हणाला, ‘‘मी इथं खुदाचं स्मरण करण्यासाठी नमाज करत होतो, तोच तू सरळ धक्का देऊन गेलीस! तुला काही वाटतं की नाही?’’ तिनं थोडं आश्चर्यानं पाहिलं आणि म्हणाली, ‘‘मला क्षमा करा. तुम्ही म्हणता तसं घडल्याचंसुद्धा मला कळलं नाही. कारण मी ज्याच्या प्रेमात बुडाले होते त्याच्या स्मरणापुढे मला काहीच समजत नव्हतं..’’ मग थोडं थांबून म्हणाली, ‘‘पण एक सांगू का? वाईट वाटून घेऊ नका. पण तुम्ही त्याच्या स्मरणात तसे बुडाले नव्हता म्हणून तुम्हाला तो धक्का उमगला. इतकंच नाही मी येईपर्यंत तुम्ही संतापानं बसून होतात!’’ त्या भक्ताला आपली चूक उमगली. आता कुणाला वाटेल की हा अतिरेकच झाला! प्रेमात बुडून जाणं म्हणजे बाहेरचं भान इतकं हरपणं आहे का? तर ही कथा एक तत्त्व शिकण्यापुरती पहा. ते तत्त्व असं की, खऱ्या प्रेमात ‘मी’चं भान ओसरतं आणि ‘तू’चं पूर्णभान सदोदित टिकतं! तेव्हा त्या परमात्म्यावर असं निरपेक्ष सदोदितचं प्रेम हवं. एका वाचकानं म्हटलं आहे की, हे सारं वाचताना आपण खूप कमी पडत आहोत, असं वाटू लागतं. तसंच या जन्मी तरी हे जमेल का, याबद्दल शंकाच येते. तर एक स्पष्ट करायला हवं. जेव्हा दहा पावलं पुढे दृष्टी जाते तेव्हा निदान एखादं पाऊल पुढे टाकता येतं!  त्यामुळे हे वाचताना, हे आपल्याला जमणारच नाही, असा भाव मनात येऊ न देता, हे ध्येय आहे, हे लक्षात घेऊन त्या ध्येयाच्या प्रकाशात चालवाट सुरू करू. ध्येयपूर्तीइतकाच त्या ध्येयाच्या दिशेनं चालण्यातही आनंद असतो!

HOT DEALS
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15444 MRP ₹ 16999 -9%
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 25799 MRP ₹ 30700 -16%
    ₹3750 Cashback

– चैतन्य प्रेम

First Published on August 27, 2018 12:21 am

Web Title: chintandhara loksatta philosophy 45