कृष्णानं यशोदामाईकडे एकदा हट्ट धरला की मला मडक्यातलं लोणी खायचं आहे. दह्य़ा-लोण्यावरचं त्याचं प्रेम यशोदेला माहीत होतंच. पण ते मर्यादेत राहावं, या हेतूनं ती त्याचा हट्ट कधी कधी जुमानत नसे. त्या दिवशीही बाल कान्हा असाच दह्य़ासाठी हटून बसला असताना यशोदा त्याचा हट्ट जुमानत नव्हती. योगायोगानं एक गोपी तिथं आली होती. कान्ह्य़ाचा आर्जवी आग्रह आणि यशोदेचा कठोर नकार पाहून तिच्या मनात कालवाकालव झाली. तिला वाटलं, ‘कान्हा माझ्या घरी आला तर त्याला मी हवं तेवढं दही-लोणी खाऊ घालीन! पण हे त्याला सांगावं कसं? कारण यशोदा ही नंदराजाची पत्नी म्हणजे गोकुळाची राणीच. तिचा मुलगा आपल्यासारख्या गरीब गोपीच्या घरी का पाऊल टाकणार आहे?’ पण शेवटी बालरूपात असला, तरी परमात्माच तो. त्यानं त्या गोपीच्या मनातला शुद्ध प्रेमभाव ओळखला होता. रोज घरी ती जेव्हा दही लावत असे, ताक घुसळून लोणी काढत असे तेव्हा ते मडक्यात भरून ठेवताना तिला कान्ह्य़ाची तीव्र आठवण येत असे. तिला वाटे, ‘कान्ह्य़ानंच माझ्या घरी यावं आणि हे दही-लोणी मनसोक्त खावं.’ पण हे घडावं कसं? हीच स्थिती गोकुळातल्या अनेक घरांत होती. त्या प्रेमभावातच दह्य़ाची मडकी आढय़ाला टांगून ठेवली जात. कान्हा येऊन बालसवंगडय़ांसह ती मडकी फोडत असे. त्यासाठी एकमेकांच्या देहाचीच शिडी करावी लागे. बालगोपाळांचा तो मनोरा किती मनोहारी दिसे! मग मडकी फुटत. अंगावर दह्य़ाचा जणू अविरत अभिषेक होई. त्यातलंच दही चाटूनपुसून खाताना बालगोपाळ आनंदून जात. घरातल्या या ‘चोरी’नं गोपींना धन्य वाटे, पण या लीलेत आणखी रंग भरे जेव्हा कान्ह्य़ाच्या तक्रारींसाठी या गोपी यशोदेकडे जात. ‘‘तुझ्या कान्ह्य़ानं आमच्या घरी दहीदुधाची चोरी केली,’’ असं सांगत. हेतू हा की, यशोदेचा कठोरपणा कमी व्हावा! कान्ह्य़ाला घरी मनसोक्त दही-लोणी खाता यावं. पण होई वेगळंच. यशोदा कान्ह्य़ाला कधी उखळीला बांधे, कधी शिदोरी न देताच गायीगुरांमागे पाठवे, कधी दिवसभर दही-दूध-लोणी दृष्टीसही पडू देत नसे. मग मथुरेच्या बाजारात निघालेल्या गोपींची दह्य़ा-लोण्याची मडकी कान्हा आणि त्याचे सवंगडी दुरूनच दगडाचा नेम साधून फोडत. मग तक्रारींना जोर चढे. कित्येक हजार वर्षांपूर्वी याच भूमीत घडलेल्या या गोष्टी! ‘दहीहंडी’च्या प्रथेमागे त्या लीलांची आठवण जपण्याचाच हेतू असावा. पण आज ‘दहीहंडी’ मोठी आणि उंचच उंच होत चालली असताना ती आठवण मात्र धूसर होत चालली आहे. दणदणाटी कण्र्यापुढे कान्ह्य़ाच्या बासरीचा सूरही जणू विरून गेला आहे. पण म्हणून मूळ लीला आणि त्यातलं रूपक साधकाला विसरून कसं चालेल? मथुरेचा बाजार म्हणजे कंसाचा बाजार. भौतिकाचा बाजार. दही-लोण्याची मडकी म्हणजे शुद्ध प्रेमभाव. तो जगाकडे वाहून जाणं परमात्म्याला कसं रुचेल? मग ती ‘मडकी’ तो फोडून टाकणारच! देहाची शिडी करीत ‘दहीहंडी’ फोडण्याचं रूपकही तसंच. हंडी सर्वात उंचावर असते. जणू आपलं मस्तक! जगात गुंतलेल्या बुद्धीचं ते ‘मडकं’ फोडून टाकण्यासाठी देहाचीच शिडी करावी लागते. अर्थात देह हाच साधनेसाठीचं माध्यम आहे. त्या देहाच्याच आधारे साधना करून आपल्यातलं मन, चित्त, बुद्धी, अहंरूपी मडकं फोडावं लागतं. कारण त्यात साठलेलं प्रेमरूपी दही-लोणी त्या परमात्म्याचंच तर असतं!

– चैतन्य प्रेम