माणसानं स्वत:च्या सोयीसाठी पैसा जन्माला घातला आणि आता तोच पैसा माणसाला जन्मभर नाचवत आहे. हा पैसा चंचल आहे आणि तो ज्याच्या हाती खेळतो त्याचं चांचल्य वाढवणाराही ठरला आहे. पण आपण जे पद पाहतो आहोत, त्यातला जगात भरून असलेला ‘पैसा’ हा परमेश्वरच आहे! आणि तो स्थूल जगातल्या पैशासारखा चंचल नाही. तो शाश्वत आहे आणि त्याची जो प्राप्ती करून घेईल त्यालाही शाश्वत समाधान देणारा आहे. म्हणून कवि म्हणतो, ‘‘गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका।। ’’ मग हा परमेश्वररूपी पैसा जगात कसा भरून आहे, हे सांगताना कवि म्हणतो, ‘‘पैका जलस्थलांतरी भरला।  पैका व्यापी दृश्य जगाला। भूगर्भावृत्त खनिज दडाला। झुकवितो लोका। गडय़ांनो ऐका, परमेश जगाचा पैका!’’ हा परमेश्वर कसा आहे? तर तो जळीस्थळीकाष्ठीपाषाणी भरून आहे. प्रल्हादाला समुद्रात बुडवले, पर्वतावरून फेकले, आगीत टाकले तरी त्या प्रत्येक ठिकाणी परमेश्वरच मला वाचवतो आहे, हेच त्याचं सांगणं होतं. तरीही हिरण्यकशपूनं बेभान होऊन विचारलं, ‘या खांबात तुझा तो देव आहे काय?’’ प्रल्हाद ‘हो’ म्हणाला आणि त्या पाषाणातूनच नृसिंह प्रकटला! हिरण्यकशपूनं आपल्याच लहानग्या मुलाच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही. उलट त्यानं हा देवभक्तीचा मार्ग सोडावा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला भीती घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तरीही ते मूल बधेना तेव्हा त्यानं चिडून विचारलं, या खांबातही तो आहे का? आपणही आपल्याच सद्बुद्धीवर विश्वास ठेवत नाही. ती सूक्ष्म बुद्धी प्रत्येकात असते आणि ‘प्रतिकूलते’च्या प्रत्येक वळणावर ती प्रत्येकाला आतून जागं करीत असते. तरीही तिच्या सांगण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. चराचरात भरून असलेल्या त्या परम तत्त्वाकडे ही सूक्ष्म बुद्धी लक्ष वेधत असते. ते परम तत्त्व परम स्वतंत्र आहे, आनंदानं पूर्ण आहे, भेदरहित आहे, आत्मस्थित आहे. जे देवधर्माच्या स्थूल चौकटीला मानत नाहीत, असे सर्जनशील कलावंत असोत, विचारवंत असोत किंवा समाजसेवक असोत.. त्या सर्वाना ओढ याच स्वातंत्र्याची, आनंदयुक्त समाजाची, भेदरहिततेची आणि आत्मप्रतिष्ठेची नसते काय? तेव्हा एका अर्थी अवघं जगच याच तत्त्वाच्या दिशेनं वाटचाल करीत आहे आणि त्याच तत्त्वानं जीवन जगू पाहात आहे. जो खऱ्या अर्थानं साधनेच्या मार्गानं चालू लागला आहे, त्याची बाहेरची वाटचाल खुंटल्यागत भासते. अंतर्यात्रा मात्र सुरू झाली असते. तो चराचरात भरलेल्या परमात्म्याच्या दर्शनासाठी व्याकूळ होत असतो. या परमेश्वररूपी पैशानं दृश्य जगाला व्यापलं आहे, म्हणून तो जगातही त्याचा शोध घेत असतो आणि हाच परमेश्वररूपी पैसा भूगर्भात खनिज रूपानं आहे, म्हणून तो भूगर्भातही त्याचा शोध घेत असतो. अर्थात आपल्या अंतरंगात त्याचा शोध सुरू होतो. जमिन खणत जावी आणि मग एकेक खनिजं हाती लागावीत, तसं अंतरंग खणून काढलं जाऊ लागतं. काय आहे आतले विचार, काय आहेत आतल्या भावना यांचं निरीक्षण सुरू होतं. पण जगात असो की अंतरंगात असो.. स्वमर्जीनं काही त्याचा शोध शक्य नाही. त्यासाठी झुकलंच पाहिजे! अर्थात ताठा सोडून दिला पाहिजे. जो असं झुकतो, त्यालाच तो गवसतो.

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com