समोर बसलेल्या साधकांकडे एकवार नजर टाकून सत्पुरुषानं विचारलं, ‘‘मुळात मला एक सांगा. तुम्ही सर्वजण सत्संगाला कोणत्या भावनेनं येता? का येता? नुसतं काही काळ मनाची करमणूक म्हणून? मनाला थोडा वेळ बरं वाटावं म्हणून? आई जशी मुलाला बागेत खेळायला घेऊन जाते आणि तिथं मुलाकडे लक्ष देता देता आपल्या मैत्रिणींशीही सांसारिक गप्पा मारण्यात रमते.. तसं तुम्ही देहानं केवळ सत्संगाला बसून मनात मात्र प्रापंचिक विचारच करता का? इतर साधकांच्या वागण्यातील चुकांकडेच जास्त लक्ष देता का? इतरांपेक्षा आपण अधिक चांगले आहोत, असं मानता का? सत्संग म्हणजे स्वत:ला विसरण्याचा अभ्यास. स्वत:ला घडविण्याचा अभ्यास. आपली मूर्ती घडवण्याचं काम सद्गुरूला देण्याची इच्छा त्यातून बळावली पाहिजे. अलीकडे ते आर्थिक गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन करणारी व्याख्यानं असतात ना? त्यांना सतत जर एखादा माणूस जात असला, पण गुंतवणूक काही कुठेच करीत नसला, तर काही उपयोग आहे का? अगदी त्याचप्रमाणे सत्संगात जे ऐकलं ते जीवनात उतरवण्याचा अभ्यास केला नाही, तर नुसत्या सत्संगाला शारीरिक उपस्थिती लावून काय उपयोग?’’ तरीही एकानं विचारलंच की, ‘‘पण स्वत:ला विसरण्यासाठी मन तर काळजीमुक्त झालं पाहिजे? कुणाला नोकरीची चिंता आहे, कुणाला आर्थिक स्थिती चांगली होण्याची चिंता आहे, कुणाला मुलाच्या लग्नाची चिंता आहे..’’ सत्पुरुषानं गंभीरपणे विचारलं, ‘‘आईच्या पोटात तुम्ही होतात तेव्हा तुम्ही कधी खाण्यापिण्याची चिंता केलीत का? नव्हे, तुमचा जन्म कसा होईल, जन्मताना काही त्रास तर होणार नाही ना, याची चिंता केलीत का? जर तेव्हा चिंता नव्हती आणि तरीही सारं काही ठीक झालं, तर आता चिंता न करता, प्रयत्न करून सारं काही ठीक होईल, असं मनाला का वाटत नाही? प्रयत्न सुरू करण्याआधी चिंता, प्रयत्न करताना चिंता आणि प्रयत्न करून झाल्यावरही चिंता, असंच का जगत राहायचं आहे? प्रयत्न करा, आटोकाट प्रयत्न करा, पण ‘काय होईल,’ या चिंतेनं मनाला कुरतडत बसू नका! उलट त्या क्षणी आत्महिताचा विचार करा, चिंतन करा, मनन करा. भले या क्षणी त्या उच्च तत्त्वविचाराचा आणि जगण्याचा थेट संबंध दिसत नसेल, तरीही तो तत्त्वविचार नित्यनियमानं वाचा, ग्रहण करा, मनात रुजवा आणि अमलात आणण्याचा अभ्यास करा. या देशावर कुणी कुणी कधी कधी राज्य केलं, याच्या सनावळ्या शाळेत असताना तुम्ही लक्षात ठेवत होतातच ना? त्या सनावळ्यांचा आणि जगण्याचा काही प्रत्यक्ष संबंध होता का? तरीही अभ्यासाचा भाग म्हणून त्याला महत्त्व दिलं जात होतंच ना? मग हा तर जीवनाचा भाग आहे! जगणं समृद्ध करण्यासाठी, सार्थक करण्यासाठी आवश्यक भाग आहे. मग त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? सामान्य पदवीसाठी किती वेळ देता? रात्र-रात्रं जागून मन लावून अभ्यास करता. मग आत्मकल्याणासाठी किती वेळ देता? किती मन लावून अभ्यास करता? तेव्हा जगताना क्षणोक्षणी बोधाचं स्फुरण अंत:करणात झालं पाहिजे. प्रथम ते होणार नाही. मनात वाईट विचारच येतील. काही हरकत नाही. बेलाशक ते येऊ देत. त्यांना बळानं दडपण्याचाही प्रयत्न करू नका. ते येतील तसेच जातील. सुविचारांकडे मात्र जाणीवपूर्वक लक्ष द्या. ते येतील, पण मनातून जाणार नाहीत, याची काळजी घ्या. मग तेच रक्तात मिसळतील आणि तुमचं भावनिक पोषण करतील. त्यानंच सत्संग सार्थकी लागेल.’’

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com