साधकानं सतत सतर्क आणि दक्ष राहायला हवं, असं स्वामी विवेकानंद सांगत, असं तुरीयानंदांच्या बोधातून आपण पाहिलं. ही सतर्कता आणि दक्षता म्हणजे दुसऱ्यानं त्रास दिला तरी आपण त्याचं वाईट न करण्यापुरती किंवा सहन करण्यापुरती असली पाहिजे काय, असा प्रश्नही मनात उसळतो. अन्याय सहन करणं हादेखील गुन्हा आहे, अशी काही वाक्यंही आपल्याला आठवतात. अध्यात्मापुरतं बोलायचं, तर संत-सत्पुरुषांनी लोकांकडून अवमान, अपमान, उपेक्षा आणि त्रास काय कमी का भोगला? आपण साधू नाही आणि त्यांच्यासारखी सहज सहनशक्तीही आपल्यात नाही. त्यामुळे आपण काही त्यांच्यासारखं शांत आणि प्रसन्न राहू शकणार नाही. पण जो त्रास आपल्या वाटय़ाला येत आहे, त्याचं थोडं परीक्षण तरी करू शकू? बरेचदा दुसऱ्याचं वाईट बोलणं, अपमान किंवा उपेक्षेचं बोलणं, याचाच त्रास आपल्याला सर्वाधिक होतो, असं जाणवेल. तेव्हा निंदेची नावड आणि स्तुतीची अपेक्षा आपल्या मनात सुप्तपणे असल्यामुळेच त्या बोलण्याचा आपल्याला त्रास होतो. मग त्या बोलण्याला आपण सवयीनंच तत्काळ उत्तर देतो. प्रत्यक्षात ‘मना बोलणे नीच सोशीत जावे,’ हा समर्थाचा सल्लाही काय सांगतो? की नीच पातळीवर, निम्न पातळीवरची टीका जे करतात त्यांच्या त्या टीकेला प्रत्युत्तर देणाऱ्यालाही त्याच पातळीवर उतरावं लागतं. मग त्या पातळीवर उतरून आपल्या मनाला आपण अधिकच अशांत, अस्थिर करायचं का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणी अन्याय करीत असेल, तर त्यासाठी समाजमान्य असे अनेक उपाय आहेत. ते योजून मनानं मात्र निर्लिप्त राहण्याचा अभ्यास केला पाहिजे. जर आपल्या प्रत्युत्तरानं एखाद्याच्या  चुकीच्या वागण्या-बोलण्यात बदल होणार असेल, तर मग तसं प्रत्युत्तर देण्यात काही हरकत नाही. पण जर त्याच्यात बदल होणं अशक्य आहे, हे दिसत असेल, तर मग उगाच शब्दाला शब्द देऊन आपण निर्थक व्याप वाढवण्यात आणि अंतरंगातील सकारात्मकतेला नख लावण्यात काय अर्थ? तेव्हा दुसरा व्यक्तिगत पातळीवर आपल्याशी कसाही वागला तरी आपण त्याच्याशी वाईट न वागण्याचा जो सल्ला स्वामीजी देतात त्यामागचा हेतू आपला वेळ आणि शक्ती चुकीच्या माणसासाठी वाया घालवू नये, हाच असतो. स्वामीजी सांगतात, जीवन हा काही पोरखेळ नव्हे! पोरखेळ कसा असतो? मनात आलं की पोर खेळायला लागतं, मनात आलं की खेळ टाकून जातं. खेळातले नियम कधी पाळतं, कधी तोडतं, कधी हुज्जत घालतं तर कधी फसवाफसवीत रमतं. जीवन तसं जगायचं आहे का? जीवनाची किती अमूल्य संधी परमेश्वरानं आपल्याला दिली आहे, त्याचं भान कधीच का येणार नाही? माणसाचा देह दिला आहे, अनंत शक्तींनी युक्त असं मन, बुद्धी दिली आहे. त्या सर्वाचा वापर करून उन्नत जगण्याची संधी आपण वाया घालवणार का, असाच स्वामी विवेकानंद यांचा प्रश्न आहे. या सृष्टीत जन्म आणि मरणाचा खेळ अव्याहत सुरू आहे. माणसाच्या अंतरंगातही क्षणोक्षणी अनंत वासनांचा जन्म होत आहे नि मृत्यूही होत आहे. पण जीवनाचा प्रवाह काही थांबलेला नाही. इच्छांचा प्रवाहही आटलेला नाही. इच्छा हेच बंधन असेल, तर निरिच्छ होण्याचा अभ्यास म्हणजेच त्या इच्छांच्या जन्म-मृत्यूच्या चक्रापलीकडे जाणं! आणि त्यासाठी जे सद् आहे. सदोदित आहे आणि सत्य आहे त्याच्याशी विचारानं एकरूप होणं, हाच उपाय आहे!

– चैतन्य प्रेम