संयोग म्हणजे ऐक्यतेला पोषक अशी सहवासाची संधी. हा सहवास किंवा संग आहे सद्तत्त्वाशी एकरूप अशा सद्गुरूचा. परम माधुर्य आणि परम ऐश्वर्य; हे त्या सद्गुरूंचे दोन प्रमुख विशेष. प्रथम परम ऐश्वर्य म्हणजे काय याचा विचार करू. त्या ऐश्वर्याचा प्रत्यय येतो तो त्यांच्या निरिच्छतेतून! त्यांना या भौतिकातल्या कशाचीही इच्छाच नसते. लक्षात ठेवा, जिथं भौतिकाच्या प्राप्तीची कणमात्र इच्छा बाकी आहे तिथं अपूर्णता आहेच आहे! इच्छा असणं हे अतृप्तीचंच लक्षण आहे. म्हणजे ज्या गोष्टीची इच्छा आहे, ती गोष्ट आपल्यापाशी नसल्याची अतृप्तीही आहेच. त्या गोष्टीच्या प्राप्तीनं समाधानात पूर्णत्व येईल, हा भ्रम त्यातूनच उपजला आहे. तेव्हा भौतिकातलं ज्याला काहीच नको आहे आणि जे आहे त्यातच जो समाधानी आहे तोच खरा ऐश्वर्यवान आहे. कारण तो जाणतो की, त्याला जर काही भौतिक गरज उद्भवलीच तर ती परमात्मा पाहून घेईल! इतकं त्याचं जीवन परमात्म समíपत असतं. जेव्हा थोडय़ाशा गोष्टींना आपण माझेपणानं कवटाळून बसतो ना तेव्हा उरलेल्या विराट चराचरावरचं माझेपण आपण गमावून बसतो. गुरुजींचं एक सूत्र आहे, ‘नहीं चाहता था, तो मिलता सभी था। अगर चाहता हूँ तो मिलता नही कुछ। कहूँ कैसे किससे कि चाहत बुरी है, नहीं चाह कुछ भी तो कुछ दुख नहीं है!’ आणखी एक सूत्र आहे की, ‘न मागता सर्व काही मिळतं, धण मागितल्यावर कधी कधी भीकसुद्धा मिळत नाही!’ तेव्हा या जगात काहीच नकोय, काहीच मिळवावं अशी आस नाही, अशी ज्याची स्थिती आहे त्याच्या आंतरिक ऐश्वर्याची कुणाला कल्पना यावी? परमात्म्याशी तो सदैव एकरूप असल्यानं त्याची जणू चराचरावर सत्ता असते! भौतिकदृष्टय़ा अत्यंत प्रतिकूल भासत असलेल्या परिस्थितीतही तो अत्यंत आत्मतृप्त, निर्भय, नि:शंक असतो. केवळ परमात्म ऐक्यालाच त्याचा अग्रक्रम असतो आणि जीवनात तो अग्रक्रम देण्याची ज्या शिष्याची इच्छा नसते, त्या शिष्याबाबतही तो उदासीन होऊ शकतो! हे झालं परम ऐश्वर्य. आता परम माधुर्य म्हणजे काय? तर त्यांचं संपूर्ण अस्तित्वच मधुर असतं! शंकराचार्याचं ते ‘मधुराष्टक’ आहे ना? त्यात कृष्णाला ‘मधुराधिपती’ म्हटलंय! गोकुळ कृष्णाचं आहे म्हणून गोकुळातली प्रत्येक गोष्ट मधुर आहे. गोपगोपी मधुर आहेत, धेनु म्हणजे गायीगुरं मधुर आहेत, वेणु मधुर आहे, त्याची वचनं म्हणजे बोलणं मधुर आहे, ‘वसनं’ म्हणजे वस्त्रप्रावरणंही मधुर आहेत.. ‘मधुराधिपते अखिलं मधुरम्’! माधुर्याचा अधिपती असलेल्या कृष्णाशी संबंधित जे जे काही आहे ते ते मधुरच आहे, तर त्याप्रमाणे सद्गुरूंशी संबंधित जे जे काही आहे ते ते मधुर ठरतं, कारण ते स्वत: मधुर आहेत. म्हणजे त्यांच्या वागण्याबोलण्यात, वावरण्यात, पाहण्यात प्रत्येक कृतीत एवढा गोडवा असतो की, माणूस त्यांचाच होऊन जातो. तो त्यांना आपलं मानू लागतो आणि इथंच ‘अतिपरिचयात अवज्ञा’ हे मोठं धोक्याचं वळण लागतं! कारण माधुर्याच्या प्रभावात, ‘आपलेपणा’च्या नादात तो त्यांचं परम ऐश्वर्य विसरतो! ‘अमुक एका भक्ताला मी सांगतो म्हणून मूल होईल, असा आशीर्वाद द्या, नाही तर मी तुमचा त्याग करीन,’ हे साईबाबांना सांगण्यापर्यंत त्यांचा निकटचा शिष्य श्यामा याची एकदा मजल गेली होती! माधुर्याच्या प्रभावात ऐश्वर्याचा म्हणजे सद्गुरू खरे आहेत कोण, या वास्तवाचा विसर पडतो, तो असा. केवळ साईबाबांची कृपा की त्यांनी धरलेला हात काही सोडला नाही!