चैतन्य प्रेम

श्रीकृष्णानं आपलं विराट विश्वरूपदर्शन घडवलं त्यानंतर अर्जुनाच्या मनात पराकोटीचा संकोचही उत्पन्न झाला. जो प्रत्यक्षात या चराचराचा स्वामी आहे, त्याला आपण सखा मानून बसलो. त्याच्याशी आजवर किती हास्यविनोदही केला.  कधी त्याचं मनही आपण दुखावलं असेल, या जाणिवेनं विस्तारलेला हा संकोच होता! इथं साईबाबांच्या चरित्राचा दाखला मात्र काय सांगतो? की श्रीकृष्ण आणि अर्जुनात जसं आधी मैत्र होतं आणि नंतर अर्जुनाला कृष्णाच्या परम ऐश्वर्याची जाणीव झाली, तशी साधकाची स्थिती नसते. सद्गुरूचा मोठेपणा आधी माहीत असतो, पण मग त्यांचा सहवास ही जर नित्याची बाब झाली, तर तो गृहीत धरला जाऊ  लागतो आणि मग स्वत:ला आपण त्यांच्या इतके जवळचे मानू लागतो की त्या भरात त्यांच्या ऐश्वर्याचं भान सुटतं. जसं अजन्मा भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं की, ‘‘हे अर्जुना, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. तुला ते आठवत नाहीत, पण मी ते जाणतो!’’ अगदी त्याचप्रमाणे साईबाबांनीही गेले किती जन्म ते श्यामाबरोबर आहेत हे अगदी स्पष्ट आकडय़ात सांगितलं होतं! तेव्हा साईबाबांचं अलौकिकत्व श्यामाला माहीत नव्हतं, असं नव्हे. प्रत्येक जन्मी साईबाबाही सद्गुरू रूपानं आपल्याबरोबर असतात, या त्यांच्या कृपेची जाण त्याला झाली नव्हती, असंही नव्हे. तरी अतिपरिचय आणि अतिजवळीकीनं सद्गुरूंचं शुद्ध निर्लेपित स्वरूप तो विसरला. या बोधाला व्यक्तिकेंद्रित मानू नका. उलट आम्हा साधकांना आयता बोध मिळावा आणि आम्ही सावध व्हावं यासाठी श्यामानं बेसावध होण्याचा कमीपणा स्वत:कडे घेतला, हे लक्षात घ्या! तर सांगायचा आणि समजून घ्यायचा मुद्दा असा की, जोवर देहभान आहे तोवर देवभावाची लय शक्य नाही आणि तोवर सद्गुरूंशी खरी जवळीक म्हणजेच ऐक्यता शक्य नाही. देहभाव कायम असताना ऐक्यतेचा भ्रम होणं ही गोष्ट मोठी घातक असते. गोंदवलेकर महाराज यांचे परमशिष्य ब्रह्मानंद बुवा गोंदवल्यात असतानाची गोष्ट. बुवांबद्दल महाराजांच्या माणसांनाही आत्यंतिक प्रेमादर होता. गंगूबाई आणि आणखी एखाद दोघी तेव्हा स्वयंपाक करीत. एकदा महाराजांनी गंगूबाईंना सांगितलं, ‘‘गंगूबाई तुम्ही जेवून घ्या.’’ गंगूबाईंचा विचार होता की, ब्रह्मानंद बुवांचं भोजन झाल्यावर मग आपण बसावं. तर त्या महाराजांना, ‘‘बसतेच महाराज,’’ असं म्हणाल्या. महाराजांनी नंतर दोन-तीनदा तेच सांगितलं. शेवटी गंगूबाई काय म्हणाल्या? की, ‘‘ब्रह्मानंदबुवा जेवले की मग बसते महाराज.’’ महाराज पटकन म्हणाले, ‘‘माझ्या सांगण्यापेक्षा बुवा मोठा झाला का?’’ गंगूबाई एकदम भानावर आल्या. सद्गुरूंच्या शब्दाला महत्त्व देण्यात किती सूक्ष्म गफलत होऊ  शकते, याचं हे उदाहरण आहे. एक लक्षात ठेवा, ‘मी सांगतो तेच ऐकावं,’ असा ‘मी’पणाचा भावच सद्गुरूंच्या ठायी नसतो. पण त्यांचं न ऐकण्यामागे आपल्याच मनाची सूक्ष्म अशी वासनाओढ असते म्हणून ते शिष्याला आज्ञापालनानं घडवू इच्छितात. त्यांच्या लहानसहान सांगण्यामागेही मोठा अर्थ असतो. कारण त्या प्रत्येक सांगण्याचं मूळ आमच्याच अंतरंगातील विराट वासनाजगतात असतं. गुरुजींच्या भजनात एक ओळ आहे, ‘अभी संग जिस का करमबस मिला है, हमेशा रहेगा नहीं संग ये तेरा!’ हा सद्गुरूसंग जर साधून घेतला नाही तर तोदेखील कायमचा टिकणारा नाही! त्या संगाचं खरं मोल कळलं तर खरी संयोगभक्ती कळू लागेल.