सद्गुरूच सर्वस्व आहे आणि जीवनातील सर्व भयाचं निवारण करणारा आहे, असं सांगून पुढे म्हटलं आहे की, ‘‘दंडधर्ता तू परिपाता.’’ या सद्गुरूंनी दंड धारण केला आहे. आता हा जो दण्ड आहे तो संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहे. म्हणजे या भौतिक प्रपंचाशी ज्याचा काही संबंध नाही, त्याचं हे प्रतीक आहे. ज्याचा प्रपंचाशी दृढ संबंध असतो, तो प्रपंचातल्या समस्यांचा निर्लिप्त मनानं विचार करू शकत नाही आणि त्यामुळे बरेचदा त्या समस्यांवर त्याला सुचणारे उपाय हे मोह आणि भ्रमलेपितच असतात. सद्गुरू भौतिक संसारात अवश्य वावरत असतात, पण त्यांच्या मनाला हा संसार चिकटत नाही. अर्थात या संसाराची आसक्ती चिकटत नाही. त्यामुळे साधकाच्या भ्रम आणि मोहग्रस्त मनाला काय योग्य आणि काय अयोग्य हे तेच स्पष्ट सांगतात. साधकाला ते जसं दंडित करतात त्याचप्रमाणे हाच दंड ते त्याच्यावर येणाऱ्या संकटांवरही उगारतात. त्याचं परिपालन करतात. त्यामुळे स्वामीजी सांगतात की, ‘‘तुजवांचुनि न दुजी वार्ता॥ तू आर्ता आश्रय दत्ता॥’’ तुझ्यावाचून काही बोलावं, असं नाही. तुझ्याशिवाय संकटात अन्य कुणाला वर्दी द्यावी, असं कुणीच नाही. जो आर्त आहे त्याला तत्काळ आश्रय देणारा असा तू आहेस. आता ही आर्त म्हणजे आ-रत म्हणजे पूर्णपणे जो त्यांच्यात रममाण आहे तो, असा खरा अर्थ आहे. जो असं सर्वस्वानं त्यांच्यावरच अवलंबून आहे, त्याला तोच पूर्ण आश्रय देतो. म्हणजेच त्याच्यासाठी जे श्रेयस आहे ते सर्व साधून देतो! आता या घडीला काही साधक खऱ्या अर्थानं आर्त म्हणजे पूर्णपणे त्यांच्यातच रममाण झालेला नाही. त्यामुळे भौतिकातील संकटांनीच तो आर्त आहे! ही संकटं सद्गुरूंच्या कृपेनं, त्यांच्या आधारावर दूर व्हावीत, अशी आर्तता त्याच्यात आहे. म्हणजे तो भौतिकातच अधिक रममाण आहे, रत आहे. पण तरीही या तुच्छ जिवाला ज्या सद्गुरूनं आधार दिला आहे त्याचं ब्रीद दीनांचा नाथ, हेच आहे ना? जिवांचा तारणहार हेच आहे ना? त्यामुळे हे सद्गुरो, तू कितीही समजावलंस तरी आमचं वागणं सुधारत नाही. परिस्थितीच्या फटक्यांनीही सावध होत नाही. कळूनही वळत नाही. दुसऱ्या कडव्यात म्हटलं आहे की, हे देवा, हे सद्गुरो, तू दंडण केलंस, तरीही आम्ही तुझेच गुण गाऊ आणि तुझ्याच चरणीं माथा नमवू. पण तरीही तू रुष्ट राहिलास तर मग आम्ही कुणाचा धावा करावा? दुसरा कोणीही आम्हाला सोडवू शकणार नाही! (अपराधास्तव हे गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था। तरि आम्ही गाउनि गाथा, तव चरणीं नमवू माथा। तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करू धावा। सोडविता दुसरा तेव्हां। कोण दत्ता आम्हां त्राता।।) म्हणजे आपल्याच चुकांमुळे सद्गुरू रुष्ट झाले किंवा परिस्थिती प्रतिकूल झाली, तरी साधकानं साधनेवरचा विश्वास सोडायचा नाही. सद्गुरू बोधानुरूप वाटचाल सुरू ठेवण्यावरचं लक्ष ढळू द्यायचं नाही. पण हे गुरुराया, आम्ही हे करूनही जर तू रुष्टच राहिलास, तर आम्ही काय करावं?

काव्याचं तिसरं कडवं असं आहे :

तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी।

पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी।

गच्छत: स्खलनं क्वापि।

असें मानुनी नच हो कोपी।

निजकृपालेशा ओपी।

आम्हावरि तूं भगवंता।।

शांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आता!!

– चैतन्य प्रेम