सद्गुरुचा सहवास म्हणजे जो नि:संगाचा संग आहे. जीव तर जगाच्या आसक्तीत रूतलेला आणि अंत:करणावर मोहाचा वज्रलेप जडलेला असा आहे. अध्यात्म म्हणजे काय, अध्यात्माच्या वाटेवर चालणं म्हणजे काय, साधनेचा रोख काय, याबाबत स्पष्ट कल्पना नसते. उलट गोंधळ वाढावा अशीच परिस्थिती उभय बाजूंनी असते. अशा परिस्थितीतही  जो खरा जिज्ञासू आहे त्याला प्राथमिक पातळीवर ‘सत्संगा’ची संधी लाभते ती कुणा साधकाच्या रूपानं, कधी एखाद्या पुस्तकातील विचारांच्या रूपानं, कधी आयुष्यातल्याच एखाद्या प्रसंगानं. कशानंही का होईना, मन खडबडून जागं झालं की मग सत्संगाची वाट विस्तारत जाते. या सत्संगाची पूर्णता नि:संगाचा अर्थात सद्गुरूंचा संग लाभण्यातच असते. शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे सत्संगातून नि:संगत्व आणि नि:संगत्वातून निश्चल चित्त आणि निश्चल चित्तानं जीवन मुक्ती असा क्रम विकसित होत जातो. पण जरी ही वाटचाल एका वाक्यात आणि चार शब्दांत सांगितली असली तरी ती जन्मभर आणि अनेक जन्मीदेखील चालू राहू शकते! त्यामुळेच सद्गुरू हे करूणामूर्तीच असतात, या एका गोष्टीमुळे या प्रक्रियेत कधीच खंड पडत नाही. इतकंच नव्हे, तर सद्गुरूंचा संग लाभूनही देहबुद्धीचं पाऊल सतत घसरतच असतं! आणि इथंच तो करुणामूर्ती आहे म्हणूनच धडगत असते. स्वामी महाराज सांगतात :

तव पदरी असता त्राता, आडमार्गी पाऊल पडता।

सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता।।

निज बिरुदा आणुनि चित्ता।।

तू पतीतपावना दत्ता।।

वळे आता आम्हांवरता।।

करुणाघन तू गुरूनाथा।।

शांत हो श्रीगुरूदत्ता, मम चित्ता शमवी आता!!

हे सद्गुरो, तुझ्याजवळ असूनही आडमार्गावकडे आमची पावलं वळतात. देहबुद्धीचा जोर आत्मबुद्धी दडपून टाकू पाहतो. पण अशा आम्हालाही सांभाळणारा आणि पुन्हा त्याच प्रेमानं मार्गावर आणणारा तुझ्यासारखा त्राता अन्य कुणी नाही! याचे अनेक दाखले अनेक सद्गुरूचरित्रांत आहेत. एका सत्पुरुषाची त्यांच्या एका भक्तानं सांगितलेली आठवण अशीच हृदयस्पर्शी आहे. ते महाराज प्रवचन करीत आणि त्याआधी कुणीतरी मोठय़ा आवाजात दासबोधातील काही भागाचं पठण करी. प्रवचन बहुतेकवेळा दासबोधातल्या वाचलेल्या भागावरच असे. पठणाचं हे काम एक साधक दीर्घ काळ करीत होता. त्यानं नोकरीच्या ठिकाणी काही गैरव्यवहार केला. तो सिद्धही झाला आणि त्याला काही वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंगातून तो परतला. जगाची नजर बदलली होती. जगाच्या नजरेत पूर्वीचा तो भाव नव्हता की ती आपुलकी नव्हती. तो खाली मान घालून महाराजांकडे आला. नमस्कार केला. महाराज काही बोलले नाहीत. प्रवचनाची वेळ जवळ आली होती. महाराज उठले आणि त्याच्या हाती दासबोध ठेवत त्याला काही न बोलता व्यासपीठावर घेऊन गेले. समोरचा समुदाय आश्चर्यानं बघत होता. त्याचं मन किती उचंबळून आलं असेल आपण कल्पना करू शकता! त्या दिवशी त्यानं दासबोध खऱ्या अर्थानं वाचला किंवा वाचायला सुरुवात केली म्हणा ना! आधी जो भाग तो वाचत असे आणि त्यावर गुरुजी काय सांगतात ते ऐकत असे, त्या प्रक्रियेतला कोरडेपणा संपला आणि आज डोळेभरून दासबोधाचं दर्शन झालं आणि मन भरून सद्गुरूंच्या प्रेमाचा संस्कारही ग्रहण केला गेला!

– चैतन्य प्रेम