जन्माला आलेला प्रत्येक जीव आज ना उद्या मृत्यू पावणारच, हे वास्तव कुणाला माहीत का नाही? पण तरीही गंभीर दुखणं किंवा आजार वाटय़ाला आला तर मृत्यूची भीती गडद होते. त्याचबरोबर आपल्या जवळच्या माणसांपैकी कुणाच्या वाटय़ाला असं देहदु:खं आलं, तरीही मृत्यूची भीती मनात उत्पन्न होते. इतकंच नाही, तर आपण जी काही साधना करीत असतो तिच्याबद्दलही मनात साशंकता निर्माण होते. म्हणजे आपण एवढं जपबिप करतो, तरी आपल्या वाटय़ाला हे दु:खं का आलं, या प्रश्नाचा काटा मनाला सलू लागतो. एक गोष्ट अगदी खरी की अगदी जवळच्या माणसाच्या मृत्यूनं जो वियोग होतो तो स्वीकारणं सोपं नसतंच. कारण जवळची व्यक्ती आपल्या भावविश्वाचाही भाग असते. अनंत आठवणी त्या व्यक्तीशी जोडल्या असतात. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनं मन हळवं होणं हे माणूसपणाला धरूनच असतं. पण तरीही मृत्यूवास्तव स्वीकारावंच लागतं ना? आणि काही मृत्यू असतात ना, तेसुद्धा आपल्या चित्तावर संस्कार करतात. मरण कसं स्वीकारता येतं आणि त्यात सद्गुरू शिष्याला कसं जपत असतात, हे त्यातून उमगतं. असाच एक मृत्यू मला जवळून पाहता आला. माझी आजी म्हणजे आईची आई ही अखेरचे काही महिने आजारी होती. आजार असा की शरीरात तीव्र वेदना होत्या, पण त्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हत्या. त्यामुळे शरीर वेदना सोसत असूनही मनाला त्याची जाणीवच नव्हती. बाकीच्या व्यवहारात आणि बोलण्यात खंड पडला नव्हता. पण ध्यान आणि अर्धवट जागृत अशा काहीशा अवस्थेत ती होती. अनेकदा ती भ्रमिष्टच वाटायची. पण या अंताची सुरुवात झाली तो दिवस मला आठवतो. ताई दामले या तिच्या सद्गुरू. तर मी तिच्या खोलीत गेलो तर त्यांची तसबीर तिनं टेबलावर काढून ठेवली होती आणि त्यांना गजरा घातला होता. मी म्हटलं, ‘‘आज काय विशेष गं?’’ तर म्हणाली, ‘‘त्या आज आल्या होत्या (ताईंनी देह ठेवून बरीच र्वष झाली आहेत बरं) म्हणाल्या, मी आत्ता तुला दिसत्ये तशी नेहमी दिसणार नाही. कारण मी सूक्ष्मात आहे ना? पण काळजी करू नकोस. मी तुझ्याबरोबर सदैव आहे!’’ मग रोज ती अनंत गोष्टी सांगायची. अनंत ठिकाणी जाऊन आलेली असायची. कधी गोंदवलं, कधी सज्जनगड तर कधी मथुरा. कृष्णाशीही रोज भांडायची आणि काय भांडली, ते सांगायची. माझ्या घरी तिला यायचं होतं आणि ते साधणार नाही, हे जाणवून मला वाईट वाटलं. तर लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या घराचं साग्रसंगीत वर्णन केलं आणि तिथं मी तिचं कसं आदरातिथ्य केलं, तेही सांगितलं. म्हणजे हीसुद्धा इच्छा ध्यानात पूर्ण झाली होती. एवढय़ा सगळ्या देहव्यापात तिचा माळेवरचा दोन हजारांचा जप पूर्ण व्हायचा आणि मानसिक जप अखंड चालायचा. आता तिच्या जगण्याची शक्यता मावळत आहे, हे लक्षात आल्यावर मी दिवसवार पाहू लागलो! ‘पुढच्या आठवडय़ात रामनवमी आहे, चांगला दिवस आहे,’ असा विचार केला. तर नवमी गेली. मग अमका दिवस चांगला आहे, असा विचार करू लागलो. असे विचार मनात येत होते तेव्हा आध्यात्मिक सत्पुरुष घरत भाऊ म्हणून होते ते मी काहीही सांगितलं नसताना म्हणाले, ‘‘आजीसाठी तुम्ही दिवस पाहू नका! ती जाईल तो कोणताही दिवस अत्यंत शुभच असेल!’’ मग म्हणाले, ‘‘कशी कृपा आहे पहा, सगळं देहदु:खं संपवलं जात आहे, पण तिला ते जाणवू दिलं जात नाही. जीवनाची अशी अखेर खरी कृतार्थ!’’

– चैतन्य प्रेम

नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
chaturang article loksatta
‘भय’ भूती : वारसा हक्काने मिळालेली भीती
mukhtar ansari umar ansari
“कट रचून विषप्रयोग केला”, मुख्तार अन्सारीच्या मुलाचे गंभीर आरोप; म्हणाला “तीन दिवसांपूर्वी त्यांनी…”