भगवंतावर आणि अगदी अध्यात्म मार्गावरदेखील सुरुवातीला माणसाचा पूर्ण विश्वास नसतो. तरीही भौतिकातल्या एखाद्या कारणाच्या निमित्तानं तो सत्पुरुषाच्या संपर्कात येतो. जो खरा सत्पुरुष असतो तो कोणत्याही निमित्तानं का होईना, जो त्याच्याकडे आला आहे त्याला मनुष्यजन्माच्या खऱ्या ध्येयाची जाणीव करून दिल्याशिवाय राहात नाही. भौतिकातल्या अडचणीनं गांजलेल्या माणसाला तो आधी भक्ती, उपासना करायला सांगतो. आता जपानं किंवा पारायणानं संकटं दूर होतात, असं नव्हे, पण भौतिकातल्या प्रयत्नांना जेव्हा सूक्ष्माकडे नेणाऱ्या साधनेची जोड लाभते, तेव्हा संकटाला सामोरं जाण्याची मनाची शक्ती वाढली असते. सत्पुरुष ज्याला जे पचेल, तीच साधना सांगतात. सगुणाच्या भक्तीचीही जोड प्रसंगी देतात. आता कुणाला वाटेल की, मूर्तीत काय आहे एवढं? शेवटी ती मातीची किंवा दगडाची किंवा फारच झालं तर धातूचीच असते ना? पण मूर्ती हे एक प्रतीक आहे आणि आपलं समस्त जगणं हे खरं तर सगुणमय आणि प्रतीकांनीच भरलेलं आहे, हे आपल्याला पटकन उमगत नाही. मूर्तीला भक्तीभावानं न्याहाळण्यात आपल्याला देवभोळेपणा वाटतो किंवा अज्ञानीपणा वाटतो. मात्र आपल्या प्रिय व्यक्तींची वा आप्तांची छायाचित्र प्रेमभरानं न्याहाळताना आपल्याला तो देहभोळेपणा वाटत नाही! तर आपलं सगळं जगणंच सगुणमय असतं. देहभावानंच इतरांना पाहिलं जात असल्यानं सगुण जगाच्या प्रभावातून आपल्याला सोडविण्यासाठी सगुण भगवंताची भक्तीच अनिवार्य असते. तर सत्पुरुषांच्या सहवासात ती सगुणभक्तीच साधत असते. काटय़ानं काटा काढावा आणि अखेरीस दोन्ही काटे टाकून द्यावेत, त्याप्रमाणे सगुण जगाची आपल्या अंतरंगातली ‘भक्ती’ अर्थात ओढ शोषून घेण्यासाठी सगुण भगवंताच्या भक्तीत सत्पुरुष आपल्याला स्थिर करतात आणि त्यायोगे निर्गुणाकडे अर्थात गुणातीत स्थितीकडे वळवतात. अनेक ठिकाणी विखुरलेलं आपलं मन एका ठिकाणी गोळा करण्यासाठी, जगात अनेकांच्या ‘भक्ती’त अडकलेल्या आपल्या मनाला एकाच्याच भक्तीची सवय लावू पाहतात. खरं तर जगाच्या प्रभावासकट आपण सत्पुरुषाच्या सहवासात येतो, पण त्याचा प्रभावही अमीट असतो. कारण तो त्याच्या निर्हेतुक प्रेमाचा प्रभाव असतो. पू. बाबाही सांगतात की, ‘‘संताच्या नि:स्वार्थी प्रेमाने माणूस पूर्णपणे वश होतो आणि त्या संताच्या सेवेमध्ये आपले आयुष्य घालवतो.’’ आता हे ‘वश होणं’ म्हणजे काय? कुणाला वाटेल, असं एखाद्या संताच्या प्रभावाखाली येऊन, त्याला वश होऊन माणसानं आपलं जीवन त्या संताच्या मर्जीनुसार घालवणं चुकीचं नाही का? तर जो खरा संत आहे, म्हणजेच ज्याचं मन परम तत्त्वाशी एकरूप आहे, त्याच्या बोधानुसार जगण्यात आपलंच हित असतं आणि याचा अनुभव आल्याशिवाय राहात नाही. माणसानं स्वत:ची बुद्धी वापरून निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा असते आणि तसं वरकरणी वाटण्यात गैर काहीच नाही, पण माणसाची बुद्धी नेहमीच त्याच्या हितानुसार निर्णय घेण्याइतपत सक्षम असते का? भ्रम, मोह आणि आसक्तीमुळे मनाच्या ओढीनुसार बुद्धी निर्णय घेत नाही का? त्यामुळे अनेकदा अशा मोहासक्त बुद्धीचे निर्णय अखेरीस माझं आणि दुसऱ्याचंही अहित साधत नाहीत का? तेव्हा ज्याची बुद्धी शुद्ध, स्वतंत्र आणि निरपेक्ष आहे, त्याच्या बुद्धीनुसार जगण्याचा अभ्यास सुरू करण्यात गैर काय?

चैतन्य प्रेम