जन्मापासून आपण अखंड जगत आहोत, तरीही कसं जगावं, हे आपल्याला नीटसं कळलेलंच नसतं. आपण आपल्या मनाच्या ओढींनुसार प्रतिक्रियाबद्ध जगत असतो. म्हणजे आपण पुढच्या क्षणी नेमकं काय करणार आहोत, हे खरंतर आपल्याला माहीत नसतं. दुसऱ्याच्या वागण्यावर प्रतिक्रिया देत आपण जगत असतो. कधी ती प्रतिक्रिया सुखप्रद ठरते, कधी ती दु:खप्रद ठरते. कधी कधी आपण मनातला राग, विरोध दडपून ‘शांत’पणाचा बुरखा पांघरून प्रतिक्रिया देत असतो. कधी अवास्तव क्रोधानं भारून जात असतो. त्यामुळे बरेचदा आपण बोलू नये ते बोलतो, वागू नये तसं वागतो आणि नंतर त्या वागण्या-बोलण्याच्या परिणामांच्या भीतीनं दबून वावरत असतो. तेव्हा जन्मापासून आपण माणसांच्या गोतावळ्यात जगत असलो, तरी आपल्या आयुष्यातील माणसांशी आपला व्यवहार नेमका कसा असावा, त्यांच्याविषयीची कर्तव्यं तर पार पाडायची, पण त्यांच्यात मोहानं किंवा आसक्तीनं गुंतायचं नाही, हे कसं साधायचं, हे आपल्याला उमगत नाही. आपल्या मनात खोलवर रुजलेल्या आसक्तीचा आपल्याला पत्ताच नसतो. त्यामुळे दुसऱ्यावर ‘प्रेम’ करताना आपण किती एकांगी हट्टाग्रही आणि आसक्त होत जातो, हेच आपल्याला समजत नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याचा ‘द्वेष’ करतानाही हा एकांगीपणा आणि दुराग्रह कसा खोलवर रूजत असतो, हेही उमगत नाही. आपल्या अशा वागण्यानं नवनवी कर्मफळं आपण निर्माण करीत असतो. तेव्हा आध्यात्मिक जीवन कसं जगावं, हा तर फार पुढचा प्रश्न झाला. मुळात जे ऐहिक जीवन आपल्याला लाभलं आहे, ते कसं जगावं, हे आधी शिकावं लागतं. ते जीवन जगताना आवश्यक असलेला निरासक्त भाव, अलिप्त पण समन्वयशील वृत्ती कशी अंतरंगात जपावी, हे शिकावं लागतं. सद्गुरूंच्या आधारे ऐहिक जीवनाचाही पाठ प्रथम मिळतो आणि मग त्या ऐहिक जीवनातूनच जो परमार्थ साधायचा आहे, त्या पारमार्थिक जीवनाचं सूत्रही हळुहळू त्या नित्याच्या जगण्यातूनच प्रकाशमान होऊ लागतं. जीवनाचं बाह्य़रूप तसंच राहातं, पण आंतरिक रूप अत्यंत प्रगल्भ, आनंदयुक्त आणि समत्वानं परिपूर्ण असं होऊन जातं. श्रीतुकाराम महाराजही म्हणतात ना? ‘‘आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदचि अंग, आनंदासी!’’ डोह म्हणजे जीवनाचं बाह्य़रूप. आधी हे जीवन एखाद्या डबक्यासारखंही होतं. संकुचित, स्वार्थपरायण. सगळा प्रवाहीपणा आटून गेला होता. पण सद्गुरूकृपा झाली आणि जीवनाचा हाच डोह आनंदानं भरून गेला. ज्या डोहात पूर्वी केवळ दु:ख, असूया, द्वेष, मत्सर, अस्थिरताच भरून होती, तोच डोह आनंदमय झाला. डोहाचा सागर झाला नाही, पण त्यातल्या लाटा, त्यातले तरंग हे आनंदमयच झाले. आनंदाशिवाय जगण्याला दुसरं अंगच उरलं नाही! दु:खं हे सुखाचं दुसरं अंग आहे. तसं आनंदाला काही दुसरं अंग नाहीच. तेव्हा जीवनाचं बाह्य़रूप, दृश्यरूप जसं आहे तसंच राखून आंतरिक श्रीमंती जर वाढत असेल, तर ती केवळ सद्गुरूसंगानंच वाढेल. आणि हा संग म्हणजे नुसतं देहानं त्यांच्याजवळ राहणं नव्हे! हा आंतरिक संग आहे. त्यांच्याशी जेव्हा आंतरिक सहवास होऊ लागेल, त्यांचा बोध अंतरंगात ठसून आपल्या जगण्याचं जेव्हा सतत निरीक्षण-परीक्षण होऊ लागेल, त्यांच्याशी जेव्हा वैचारिक, भावनिक समरसता स्थापित होईल तेव्हाच खरा संग सुरू होईल.

चैतन्य प्रेम