संध्याकाळची वेळ. अनंत घडामोडींनी भरलेला दिवस सरत असल्याचा आणि नीरव शांत रात्र  जवळ येऊन ठेपल्याचा संकेत देणारी वेळ.  अर्थात सत्पुरुषांच्या सहवासात असताना काळवेळेचं हे भान कुणाला राहणार? पुण्याच्या वासुदेव निवासात  श्रीगुळवणी महाराज यांचं रूप न्याहाळण्यात आणि त्यांचं बोलणं ऐकण्यात दंग असलेल्या भक्तांचीही तीच स्थिती झाली होती. तोच अचानक महाराज उठले आणि म्हणाले, ‘‘चला! कोणकोण येतंय माझ्याबरोबर फिरायला?’’ महाराज संध्याकाळचा फेरफटका मारायला निघत आहेत, हे उमजताच एकच लगबग सुरू झाली. त्यांच्याबरोबर जायची इच्छा असलेले पटकन तयार होत त्यांच्यापाशी आले, तर काहीजण महाराजांचा कोट, काठी, टोपी घेऊन आले. खोलीत ही लगबग सुरू असतानाच जिन्यातही काहीसा गोंधळ उडाला होता. कुणीतरी डाफरत असल्याचे आवाज कानावर पडत होते. काहीच क्षणात एका लहानग्या पोराला धरून दोन-तीन भक्त खोलीत आले आणि महाराजांसमोर त्याला ढकलत म्हणाले, ‘‘महाराज हा पहा चप्पलचोर! चपला चोरताना पकडलंय याला..’’ हे ऐकताच अनेकांच्या नजरेत घृणा तरळली. कोणी म्हणालं, पोलिसांच्या ताब्यात द्या याला. म्हणजे वठणीवर येईल. जो तो त्याला शिक्षा करण्याचा आणि त्यायोगे ‘सुधारण्या’चा उपाय सुचवू लागला. महाराज मात्र अगदी शांत होते आणि त्याच्याकडे स्निग्ध नजरेनं पाहात होते. महाराज बोलू लागताच गलका थांबला. महाराज म्हणाले, ‘‘अशा चपला चोरू नयेत बाळ! बऱ्याच जणांच्या चपला चोरीला गेल्या आहेत. तुला चपला हव्या असतील, तर मी देतो, पण अशी चोरी करू नकोस!’’ मग महाराज त्यालाच धरून आणणाऱ्या एका भक्ताकडे वळून म्हणाले, ‘‘आताच बाजारात याला घेऊन जा आणि चांगल्या चपला घेऊन द्या!’’ दुसऱ्या दिवशी तो भक्त सकाळी आला. चपलांसाठी त्यानं खर्च केलेले पाच रुपये पंचाण्ण्यव पैसे महाराजांनी तात्काळ दिले. थोडय़ाच वेळात कालचाच तो चप्पल चोरणारा मुलगाही आला. साधेसेच, पण नेटके कपडे त्यानं घातले होते. सगळेजण त्याच्याचकडे रोखून पाहात होते. तो खाली मान घालूनच आला, महाराजांच्या पाया पडला आणि खालमानेनंच निघून गेला. महाराजांनी त्याला ओळखल्याचं चेहऱ्यावर दिसूही दिलं नव्हतं. तो जाताच काहीजण म्हणाले, ‘‘काल चपला चोरायला आला होता, आज बघा कसा भक्त बनून आला आहे!’’ महाराज म्हणाले, ‘‘मुलगा काही खरा वाईट नाही. असाच येत राहिला तर ईश्वर त्याच्यावर कृपा करील.’’ नंतरही तो मुलगा येतच राहिला. एका उत्सवात तर त्यानं स्वयंसेवक म्हणूनही काम केलं. उघडपणे जो चपला चोरत होता, तो सत्संगामुळे अगदी पादुकांपर्यंत सहज पोहोचला.. पण पादुकांपाशी असलेले आणि वरकरणी कुठलीही चोरी न करणारे आपण कसे आहोत? खरंतर अतिशय गरज पडल्याने साध्याशा चपलांचा लोभ त्याच्या मनाला शिवला असावा, पण त्यापेक्षाही अनेक क्षुद्र इच्छा घेऊनच तर आपण सत्पुरुषांकडे जातो आणि त्यांच्या कृपेचा वापर त्या लहानसहान गोष्टींसाठी व्हावा म्हणून मनोमन प्रार्थनाही करीत असतो, तळमळत असतो. पुन्हा हे सारं भक्ताचं रूप पांघरूनच ही सारी धडपड करीत असतो. महाराजांनी जशी त्याला ओळखल्याचे भाव चेहऱ्यावर आणले नाहीत, तसेच आपल्याला ओळखूनही ते तसं दाखवत नाहीत आणि सेवेची संधी देतच राहातात!