संतांच्या गाथेतील गवळणी या रचनेकडे सर्वसामान्य माणूसच नव्हे, तर काही साधकही शृंगारिक अर्थानंच पाहतात. या गवळणीत राधा आणि अन्य गोपींचं कृष्णावरील अनन्य प्रेम प्रकट झालं आहे.

काही अभंग, काही गवळणी मनाच्या तळाशी खोल विसावल्या असतात. त्यांच्या अर्थाकडे आपलं पटकन लक्ष वेधलं जातंच असं नाही. ‘अभंगधारा’ हे सदर लिहिताना अशा काही अभंगांचे गूढार्थ सद्गुरूंनी उकलून दाखवले. ते सदर संपलं तरी अभंगांचे गूढार्थ शोधायची सवय काही सुटली नाही. आणि असा एक अभंग पुन्हा हृदयाला भिडला.. लहानपणीही तो किती तरी वेळा ऐकला होता.. पण त्याचा अर्थ कधीच जाणवला नव्हता.. ही एकनाथ महाराजांची अत्यंत प्रसिद्ध गवळण आहे.. ‘वारियानें कुंडल हाले। डोळे मोडित राधा चाले!!’ गाण्याच्या रूपात ती ध्वनिमुद्रित करताना दुसरा चरण गाळलेला आहे. त्यामुळे नाथांच्या गाथेतून मूळ गवळण प्रथम वाचू..

वारियानें कुंडल हाले।

डोळे मोडित राधा चाले॥ धृ.॥

राधेला पाहुनी भुलले हरी।

बल दोहितो आपुले घरीं ॥१॥

फणस गंभीर कर्दळी दाट।

हातीं घेऊन सारंगपाट ॥२॥

हरिला पाहुनी भुलली चित्ता।

मंदिरीं घुसळी डेरा रिता ॥३॥

मन मिळालेसें मना।

एका भुललें जनार्दना ॥४॥

ही गवळण म्हणजे शृंगारिक संकेतांनी भरलेली आहे, असं मानलं जातं. एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या कृष्ण आणि राधेची तन्मय स्थिती यात वर्णिली आहे, असं मानलं जातं.

राधा रस्त्यानं निघाली आहे. डोईवर दुधा-दह्य़ाच्या घागरी आहेत आणि वारं सुटलं आहे. या वाऱ्यानं राधेच्या कानातली कुंडलं हालत आहेत आणि त्यांची किणकिण ऐकू येत आहे. ती किणकिण ऐकण्यात ती गुंग आहे, की कृष्णविचारात दंग आहे, हे कळायला मार्ग नाही. काही जण ‘कुंडल’च्या ऐवजी ‘कुंतल’ हा शब्द गृहीत धरतात. मग अर्थ असा सांगतात की, वाऱ्यानं बटा हालत आहेत आणि त्या डोळ्यांवर येत आहेत. तर बटा डोळ्यांवर येत असल्यानं म्हणा किंवा कुंडलांची किणकिण ऐकून म्हणा राधेचे डोळे अर्धवट मिटलेले आहेत.. आणि तशीच ती रस्त्यानं जात आहे. या राधेला पाहून कान्हाही भुलला आहे. तो गायीच्या ऐवजी बलांचंच दूध काढण्याचा प्रयत्न करतोय. मग राधेचीही अवस्था काही वेगळी नाही. ती ताकाचा रिकामा डेराच घुसळत बसली आहे.

दुसऱ्या चरणात घनदाट जंगलाचं वर्णन आहे आणि चौथ्या चरणात जनार्दन स्वामींशी एकनाथ महाराज हे तसे एकरूप झाल्याचं वर्णन आहे.

आता या गवळणीकडे शृंगारिक म्हणूनच अनेकांनी पाहिलं आहे. पण या गवळणीचे दोन गूढार्थ आहेत. हे सद्गुरू आणि त्याच्या अनन्य भक्ताचं शब्दचित्र आहे आणि दुसरा अर्थ म्हणजे सद्गुरू कृपेनं साधणाऱ्या कुंडलिनी जागृतीचं हे चित्रण आहे! या दृष्टीनं नाथांचीच प्रार्थना करून या गवळणीचा अर्थ आता लावू.