ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी नामदेवांची जी तळमळ आहे, तशीच तळमळ श्रीगोंदवलेकर महाराज यांचे एक अनन्य शिष्य रामानंद महाराज ऊर्फ पांडुरंग बुवा यांच्या एका अजरामर भजनात आहे. त्या भजनानं माझंच नव्हे, तर अनेकांचं भावपोषण झालं आहे. आजही हे भजन परत परत म्हणताना किंवा ऐकताना नवनवा भावसंस्कार अंतकरणावर करतंच. जेव्हा गोंदवलेकर महाराज यांनी देह ठेवला तेव्हा महाराजांविना असलेलं गोंदवले अगदी ओकंबोकं झालं. कृष्ण जेव्हा मथुरेला गेला तेव्हा गोकुळ जसं उजाड झालं किंवा राम वनवासात गेले तेव्हा अयोध्या जशी वैराण भासू लागली तसं गोंदवले दिसू लागलं. कृष्णाविना त्या गोकुळात एक श्वास घेणंदेखील गोपींना, राधेला, यशोदा अन् नंदाला जड जात होतं किंवा रामाविना अयोध्या म्हणजे जशी भरताला नरकासारखी भासत होती, तसं अनन्य भक्तांना गोंदवले भासत होतं. त्या प्रेमार्त भावदशेचं हृदयंगम दर्शन या भजनात आहे. या भजनाचं ध्रुवपद आहे..

चतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा।

दीनाचा मायबाप कुणि मजला भेटवा॥

सद्गुरू हा जणू ब्रह्मस्वरूपाचं चतन्यच आहे! म्हणजे ते परमस्वरूप ज्या चतन्य शक्तीच्या, चतन्य तत्त्वाच्या आधारावर टिकून आहे ते तत्त्व सद्गुरू आहे. गुरुगीतेतही भगवान शंकर सांगतातच ना? की, गुरुविना अन्य काही ब्रह्म नाहीच, हेच त्रिवार सत्य आहे! तेच ब्रह्म जे सगुण रूपात, साकार रूपात महाराजांच्या रूपात प्रकट झालं होतं. ते मला पुन्हा कुणीतरी दाखवा हो! सद्गुरू हा नुसता व्यापक तत्त्वाशी जोडला गेला नसतो. ते व्यापकत्व त्याच्याच रूपात अवतरित झालं असतं. त्यामुळेच त्याच्याइतकी दयाशीलता, कारुण्य आणि शुद्ध अहैतुक प्रेम अन्यत्र कुठंही आढळत नाही. जो त्याच्याशी अनन्य आहे त्याचं तो सर्वस्व असतो आणि त्याचं सर्व तोच सांभाळतो, प्रतिपाळतो. ‘योगक्षेमं वहाम्यहम्,’ असं त्याचं अभिवचनच आहे. त्यामुळे तोच ‘त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु: सखा त्वमेव.. त्वमेव र्सव मम् देव देव!’ असा सर्व काही असतो. त्यामुळेच तो दीनाचा मायबाप आहे. तो मला दाखवा! मग कुणीतरी समजावणीच्या स्वरात म्हणतं, ‘‘बाबा रे, देह म्हंटला की त्याला काळाचे नियम लागू झाले. महाराज देहात प्रकटले होते त्यामुळे तो देह कधी ना कधी जाणारच होता. त्याचं दुख करू नकोस. तत्त्व रूपानं ते आजही आहेतच,’’ यावर हा अनन्य भक्त तळमळून म्हणतो..

तत्त्वाचे बोल फोल बडबडतां कितीतरी।

शमली का आग त्यानें अंतरींची कधींतरी।

मृगजळ हें झूट सारें फसवीतें वरिवरी।

नयनांचा तो विसावा नयनांला दाखवा॥१॥

चतन्यब्रह्म माझे कुणि मजला दाखवा!!

अहो, देह जातो, पण तत्त्व अमर असतं, या तत्त्वाच्या फोल गोष्टी मला सांगू नका! ही तात्त्विक बडबड कितीही ऐकली तरी त्यानं वियोगानं अंतकरणात भडकलेली जी आग आहे, ती कधी शमणं शक्य आहे का? तत्त्वाचंसुद्धा हे मृगजळच आहे हो. वरवरचं हे तात्त्विक ज्ञानाचं मृगजळ मला फसवत आलं होतं. पण आज माझ्या डोळ्यांना ज्यांच्या दर्शनानं विश्राम लाभत होता त्या महाराजांना एकवार कुणीतरी दाखवा हो! चतन्याचं अधिष्ठान असलेल्या माझ्या सद्गुरूंचं रूप मला पुन्हा एकवार न्याहाळू दे.. त्यांच्या सहवासात आनंदरसाचं सेवन करता येऊ दे.. त्या प्रेमभाव रसात मनसोक्त डुंबू दे!!