आजचा दिवस ‘ज्ञानेश्वरीमय’ आहे, याचं कारण ज्यांचं अवघं जीवन हे ‘ज्ञानेश्वरी’साठीच जणू समर्पित होतं, अशा शं. वा. ऊर्फ सोनोपंत अर्थात मामासाहेब दांडेकर यांचा २० मार्च हा जन्मदिन आहे. अनेक चरित्रांत हा दिवस २२ मार्च देण्यात आला आहे, पण त्यांच्या साधार चरित्रात तो २० मार्च १८९६ हाच आहे. असो. खरं पाहता जयंती वा पुण्यतिथी हे निमित्त असतं. ते निमित्त साधून अंतरंगात त्यांचा जीवनबोध जागवायचा असतो. मामासाहेबांचं ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘तुकाराम महाराजांच्या गाथे’वर इतकं प्रेम होतं की हे दोन ग्रंथ वाचल्याशिवाय मराठी माणसानं मरू नये, असं त्यांनी म्हणून ठेवलं आहे! महाराष्ट्रात जन्मल्यावर इतपत तरी करावं म्हणाले माणसानं! बरं हे वाचन म्हणजे नुसतं अक्षरवाचन नव्हे, बरं का. जे वाचतो त्यावर चिंतन घडलं पाहिजे, ते आचरणात यावं, अशी प्रामाणिक इच्छा पाहिजे. आजचा काळ कसा आहे आपण पहात आहोत ना? जो तो धर्माच्या नावावर बेलाशक अधर्मी कृत्यं करतो आहे आणि धर्मभेदानुसारच त्या अधर्मी कृत्यांचं समर्थन किंवा विरोध करीत आहे. याचं एकच कारण की धर्माचा जो मूळ पाया आहे, अध्यात्म, त्याचीच जाण उरलेली नाही. कारण धर्मातली तत्त्वं उच्च आहेत, पण ती आम्हाला पोथ्यांच्या पिंजऱ्यातच पाळायची आहेत. आचरणात ती उतरली पाहिजेत, ही इच्छाच नाही. तेव्हा ती आचरणात उतरण्यासाठी आधी निदान ती वाचली तर पाहिजेत! ज्यांना अध्यात्माच्या मार्गावरून खरी वाटचाल करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी सगळे पूर्वग्रह, पूर्वमतं, आपली क्षुद्रं मतं फेकून देऊन केवळ आणि केवळ साधनेसाठीच आपला जन्म आहे, या निश्यचानं या तत्त्वांच्या प्रकाशात आचरण सुधारण्याचा अभ्यास केलाच पाहिजे. त्यासाठी निदान महाराष्ट्रीय साधकांना तरी काही चिंता नाही इतकं विपुल संत साहित्य सहज उपलब्ध आहे.. आणि आधी सांगितल्याप्रमाणे हे नुसतं अक्षरवाचन नाही! या संदर्भात मामासाहेबच किर्तनात एक प्रसंग सांगत, तो उद्धृत करावासा वाटतो. एका माणसानं ‘ज्ञानेश्वरी’चं पारायण करायचा संकल्प सोडला. त्यासाठी रोज पाच पानं वाचावीत, असं त्यानं ठरवलं. त्यानुसार रोज पाच पानं वाचून तो खूण म्हणून एक मोरपीस ठेवत असे. असे काही दिवस गेले. त्याच्या एका मित्राला त्याची गंमत करण्याची लहर आली. या गृहस्थाचं दिवसभरातलं पारायण संपलं तेव्हा या मित्रानं त्याच्या नकळत मोरपिसाची ती खूण पाच पानं आधी आणून ठेवली. दुसऱ्या दिवशी या गृहस्थानं आदल्या दिवशीच वाचलेली पाच पानं पुन्हा वाचली. ती खूण कुणीतरी पाच पानं पुन्हा आधी आणल्याचं त्याला काही कळलं नाही. हा प्रकार पाच-सहा दिवस सुरू होता. म्हणजे तो गृहस्थ रोज तीच पाच पानं वाचत होता आणि खूण ठेवत होता, मग तो मित्र ती खूण पुन्हा पाच पानं मागे आणून ठेवत होता. शेवटी त्या मित्राला राहवलं नाही. त्यानं त्या गृहस्थाला विचारलं, ‘‘तुम्ही रोज ज्ञानेश्वरी वाचता. मग ती कशी वाटते?’’ या गृहस्थानं सांगितलं, ‘‘तशी चांगलीच आहे ज्ञानेश्वरी, पण रिपिटेशन फार आहे!’’ म्हणजे पुनरावृत्ती फार आहे! असंही वाचन नको. तेव्हा जे वाचायचं ते आत्मसातही झालं पाहिजे. त्यातलं काही आचरणात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्नही पाहिजे. पारायणाबरोबच परायणही व्हायला पाहिजे. आपणही आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून ‘ज्ञानेश्वरी’तल्या काही ओव्या तरी जरुर वाचाव्यात आणि त्यातली एकतरी ओवी अनुभवता यावी, यासाठी माउलींचीच प्रार्थना करावी.

चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com