समर्थाच्या सांगण्यानुसार जो संतसंगात असतो, तोच सुखी असतो, हे नमूद करून उमदीकर महाराज या संतसंगानं साधकाला आणखी पुढचं पाऊल कोणतं टाकता येतं, ते सांगतात. हे पाऊल म्हणजे ‘श्रेष्ठ कार्य’! समर्थाचं वचन आहे, ‘‘श्रेष्ठ कार्य करी तो श्रेष्ठ। कनिष्ठ कार्य करी तो कनिष्ठ।।’’ आता कोणतंच कार्य कमी दर्जाचं नसतं आणि ‘चळवळीचं सामर्थ्य’ कसं निर्माण करावं, हे ज्या समर्थानी मांडलं त्यांनी कोणत्याही कार्याला कनिष्ठ, तुच्छ लेखलेलं नाही. मग इथं जे कार्य सांगितलं आहे, ते कोणतं? तर लोकांच्या निंदा-स्तुतीत, त्यांच्या बोलण्याच्या प्रभावात न अडकण्याबाबतचं मार्गदर्शन सुरू असल्यानं हे कार्य वाणीशीच संबंधित आहे. मग वाणीचं श्रेष्ठ कार्य कोणतं? तर नामस्मरण! आणि वाणीचं कनिष्ठ कार्य कोणतं? तर अशाश्वत, नश्वर अशा ‘मी’ आणि ‘माझे’बद्दल आसक्तीयुक्त बोलणं आणि दुसऱ्याबद्दल तुच्छतादर्शक बोलणं. ज्या मुखानं नाम घ्यायचं त्याच मुखानं दुसऱ्याची निंदानालस्ती करणं, शिवीगाळ करणं म्हणजे मुखानंच शौच होण्यासारखं आहे, असं रूपक तुकाराम महाराज यांनी वापरलं आहे. तेव्हा मुखानं नामस्मरण हेच श्रेष्ठ कार्य आहे. आता हे नामस्मरण म्हणजे तरी काय हो? एखादा माणूस पाच-पाच तास नाम घेत असेल, पण त्या्च्या चित्तातली जगाची आसक्ती तसूभरही कमी होत नसेल, तर त्याचं नामस्मरण खरंतर झालेलंच नाही! नाम खोलवर जाणं म्हणजे जगाचा प्रभाव, जगाकडूनच्या अपेक्षा, जगाची आसक्ती कमी होत जाणं. तेव्हा नुसतं मांडी घालून कित्येक तास नामाला बसणं, ध्यानाला बसणं हे ‘श्रेष्ठ कार्य’ नव्हे! देहानं बैठक मारायची नाही, मनाचीही बैठक तयार झाली पाहिजे. पक्की झाली पाहिजे. मनाची बैठक ज्यायोगे पक्की होईल, ते कार्य श्रेष्ठ आहे आणि मनाची बैठक ज्यायोगे ठिसूळच होत राहील, ते सर्व कार्य कनिष्ठ आहे. मग हे साधण्यासाठीचा उपाय उमदीकर महाराज समर्थाच्याच वचनाच्या आधारे सांगतात. तो म्हणजे, ‘नेम धरावा निकट, बाष्फळपणाची वटवट, करूचि नये।’ नेम धरावा निकट! ‘नेम’चे दोन अर्थ आहेत. पहिला नेम म्हणजे एखाद्या गोष्टीचा वेध घेऊन तिला अचूक टिपण्यासाठीची कृती. इथं लांबचा नेम धरायचा नाही, जगावर नव्हे, स्वत:वरच नेम धरायचा आहे! स्वत:लाच सुधारायचा नेम धरायचा आहे. दुसरा नेम म्हणजे नित्यनियमानं केली जाणारी एखादी उपासना. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत की, ‘‘नित्यनेम म्हणजे नित्याचा नेम.’’ अर्थात जो नित्य आहे, त्याच्या स्मरणात एकरूप करणारा नेम. तेव्हा जे नित्य आहे त्याचाच विचार करावा, त्याचंच स्मरण, चिंतन करावं. तो नेम साधण्यासाठी ‘बाष्फळपणाची वटवट करूचि नये!’ कोणत्याही प्रकारचं बाष्फळ बोलणं पूर्णपणे टाळावं. ते टाळणं सोपं नाही. कारण आपल्याला जन्मापासून बाष्फळ बोलण्याचीच सवय आणि आवड आहे. त्यामुळे एखाद्या गंभीर विषयावरच्या गप्पा गंभीरपणे सुरू होतात आणि शेवटी बाष्फळपणातच घसरत जातात. अगदी नित्याचं उदाहरण म्हणजे ‘राजकारण’. तेव्हा आपल्या बोलण्याचं आणि मनातल्या बोलण्याचं अधेमधे परीक्षण करीत गेलं पाहिजे. कोणत्याही सवंग विषयाला आपण सवंगपणे बळी पडत नाही ना, हे तपासलं पाहिजे. उलट असे विषय सुरू झाला तर अगदी सावधपणे आणि कटाक्षानं त्यापासून दूर राहिलं पाहिजे. मतदानात मत अवश्य टाकावं, उठसूठ मतं व्यक्त करीत वेळ वाया घालवू नये.

chaitanyprem@gmail.com