कर्तेपणाच्या भावनेतून अर्थात ‘मी कर्ता आहे,’ या दृढ धारणेतूनच कर्म होतं आणि कर्माचं भलबुरं फळही वाटय़ाला येतं. परमार्थाच्या मार्गावर आल्यावर कर्तेपण विसरायचं असतं. म्हणजेच कर्तव्यकर्म करून कर्तेपण आपल्याकडे न घेता ते परम चैतन्यशक्तीचंच आहे, हे ओळखायचं असतं. त्याचवेळी हेही खरं, की व्यवहारातली सामान्य र्कम ही त्याच चैतन्यशक्तीच्या जोरावर होतात, हे खरं, पण संकुचित, ‘मी’केंद्रित, स्वार्थमय क्षुद्र र्कम चैतन्य शक्तीच्याच आधारावर किंवा जोरावर होत असली, तरी ती काही चैतन्य शक्तीच्या प्रेरणेनं होत नाहीत! त्या कर्मामागची प्रेरणा ‘मी’च असतो आणि त्यामुळे हा ‘मी’च अनंत जन्मं त्या कर्माची फळं भोगत असतो. डॉ. श्रीकृष्ण देशमुख ऊर्फ पू. काका या कर्तेपणाची आणखी एक छटा मांडतात. ते म्हणतात की, ‘‘परमार्थाची वाटचाल करताना ‘मी कर्ता नाही,’ हे वाक्य सर्वानी पाठ केलेले असते, परंतु ते खोलवर रुजले नसल्याने वारंवार सांगावे लागते. ‘आत्मरूप मी कर्ता नाही तर जीवरूप मी कर्ता आहे,’ हा फरक लक्षात ठेवणे आवश्यक आहे. पण त्यासाठी जीव कशाला म्हणतात आणि आत्मा कशाला म्हणतात हे ही जाणून घेणे गरजेचे आहे. ’’ या बोधातला पहिला भाग हा आपल्या ‘सवयीच्या परमार्थावर’ नेमकं बोट ठेवतो. ‘मी कर्ता नाही,’ हे वाक्य आपण अगदी घोटवून घोकून ठेवतो, पण ते मनापासून मानत मात्र नाही. त्यामुळेच परत परत ते वाक्य स्वत:ला सांगावं लागतं. पण मग प्रश्न असा पडतो, की कर्ता जर मी नाही, तर कर्म कोण करत आहे? म्हणून पू. काका सांगतात की, आत्मरूप असा जो मी आहे तो कर्ता नाही, तर जीवरूप मी कर्ता आहे. आता जर आत्मरूप गवसलं असेल तर ‘आत्मरूप मी’ असा काही उरेल का, असा प्रश्न पडेल. त्यासाठीच पू. काका आत्मा आणि जीव यांच्यातला भेद समजून घ्यायला सांगतात. ते म्हणतात, ‘‘शास्त्र असे सांगते की जीव हा जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीनही अवस्थांचा भोक्ता आहे आणि आत्मा हा तीनही अवस्थांचा साक्षी आहे. आत्मा या तीनही अवस्थांच्या पलिकडचा आहे आणि मी आत्मा असल्याने मीही तिन्ही अवस्थांच्या पलिकडचा असणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये ‘मी कर्ता मी भोक्ता’ ही भूमिका खोलवर रुजलेली असते आणि त्यामुळेच आपण सर्व दु:खं व ओझी स्वत:वर लादून घेतो. शास्त्र सांगते की, साक्षी असणारा खरा मी कर्ताही नाही आणि भोक्ताही नाही.’’ आता हे जर वरवर वाचलं तर गोंधळच उडेल म्हणून नीट लक्षपूर्वक जाणून घेतलं पाहिजे. या विवरणात भोक्ता आणि साक्षी या दोघांचा उल्लेख आहे. जीव जो आहे तो भोक्ता आहे, तो साक्षी नाही! हा जीव ज्या चैतन्यशक्तीच्या आधारावर कर्मरत आहे तो आत्मा मात्र साक्षी आहे. तो भोक्ता नाही. आपण जीवबुद्धीनं अर्थात देहबुद्धीनं जगत आहोत म्हणून भोक्ते आहोत. त्यामुळे आपण सुखही भोगतो आणि दु:खंही भोगतो, पुण्यही भोगतो आणि पापही भोगतो, अनुकूलताही भोगतो आणि प्रतिकूलताही भोगतो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती म्हणजे ज्या तीनही अवस्थांत देह टिकून आहे त्या तिन्ही अवस्थांत जिवाचे भोग सुटलेले नाहीत. जागृतीत जीव सुख आणि दु:ख भोगतोच, तसंच ते स्वप्नातही भोगतो आणि सुषुप्तीतही त्याचा ठसा कायम असतो. सुख माझ्या कर्तेपणामुळे मिळत असल्याचं मी मानत असल्यानं आपोआप दु:ख दूर करण्याचं कर्तेपणही मलाच निभवायचं आहे, या भावनेनं दु:खभोगांच्या जाणिवेचं आणि ते दूर होत नसल्याच्या वेदनेचं ओझंही माझ्याच माथी येतं!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com