12 December 2018

News Flash

४७. डोळे मोडीत राधा चाले..

वारियाने कुंडल हाले, या तीन शब्दांचा अर्थ आपण जाणला..

वारियाने कुंडल हाले, या तीन शब्दांचा अर्थ आपण जाणला.. आता ‘डोळे मोडीत राधा चाले,’ याचा अर्थ काय आहे? आधीच सांगितल्याप्रमाणे  सद्गुरूंशी अनन्य झालेल्या भक्ताला नाथांनी ‘राधा’ म्हटलं आहे.. अन् या राधेनं, या भक्तानं आपले डोळे मोडून टाकले आहेत! जे डोळे आजवर जगाकडे लागलेले होते, ज्या डोळ्यांत जगाची आस होती, जे डोळे फसवं तेच खरं मानून तेच अंतर्मनात साठवून घेत होते, ते डोळे या भक्तानं मोडून टाकले आहेत. डोळे मोडण्यावरून मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांची कथा पुन्हा आठवली. मच्छिंद्रनाथ स्त्रीराज्यात गेले आणि तिथंच राहिले होते. त्यांना आणण्यासाठी गोरक्षनाथ गेले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की, ‘‘गोरक्षा तू ही इथंच राहा!’’ त्या राज्यातल्या राण्यांनीही आग्रह केला, तरी गोरक्ष बधले नाहीत. मग दोघं निघाले तेव्हा एक सोन्याची वीट राणीनं बरोबर दिली होती. ती सांभाळण्यासाठी मच्छिंद्रांनी गोरक्षांकडे दिली. ती वीट त्यांनी जंगलात फेकून दिली. कामिनी आणि कांचनाच्या या दोन्ही परीक्षांत गोरक्ष उत्तीर्ण झाले. मग नगर लागलं की गोरक्षनाथ भिक्षा मागून आणत असत. असंच एका घरी कुठल्याशा समारंभानिमित्त पंचपक्वान्नांचं जेवण होतं. ती भिक्षा घेऊन गोरक्षनाथ आले. त्या भिक्षेतले भाजणीचे वडे मच्छिंद्रांना खूप आवडले. ‘ते आणखी असते, तर फार आनंद वाटला असता,’ असं मच्छिंद्रनाथ म्हणाले. तेव्हा गोरक्ष परत त्याच घरी गेले. घरातल्या स्त्रीनं त्यांची निर्भत्सना केली आणि म्हणाली, ‘‘तू वडय़ांसाठी नव्हे, तर माझ्या सौंदर्यावर भाळून परत आला आहेस! तुला आता वडे हवे असतील, तर प्रथम तुझे दोन्ही डोळे काढून दे!!’’ गोरक्षांनी तत्काळ तसं केलं तेव्हा ती भेदरून क्षमा मागू लागली. गोरक्ष डोळ्यांवर एक फडकं धरून आणि ती भिक्षा घेऊन आले. मच्छिंद्रांनी डोळ्यावर फडकं धरल्याचं कारण वारंवार विचारूनही ते सांगेनात. पण मच्छिंद्रांनी ते ताडलं आणि फडकं दूर करायला लावलं. मग गोरक्षांच्या त्या डोळ्यांवरून मच्छिंद्रांनी हात फिरवला आणि त्यांना दिव्य दृष्टी दिली, अशी मूळ कथा आहे. थोडक्यात कामिनी, कांचन या दोन परीक्षांनंतर देहासक्ती आणि जगाची आसक्ती या दोन मोठय़ा परीक्षांतून गोरक्षनाथ उत्तीर्ण झाले तेव्हा त्यांना दिव्यदृष्टी मिळाली. तर ही ‘राधा’ असे जगाकडे लागलेले डोळे मोडून टाकत आहे. आता डोळे जर मोडून टाकले, तर चालायला जमेल का हो? व्यावहारिक जगात नाही, पण अध्यात्माच्या मार्गात, जगाकडे लागलेले डोळे जेव्हा मोडून टाकले जातात तेव्हाच खरं चालणं जमतं, तेव्हाच खरी वाटचाल सुरू होते! जेव्हा जगाकडेच डोळे खिळले असतात तेव्हा सत्य काय-असत्य काय, शाश्वत काय-अशाश्वत काय, क्षणिक काय आणि सार्वकालिक काय, हिताचं काय आणि अहिताचं काय, याबाबत गोंधळ असतो. मग जे अहिताचं आहे तेच हिताचं वाटतं. जे अशाश्वत आहे तेच शाश्वत वाटतं, जे भ्रामक आहे तेच सत्य वाटतं. त्या भ्रामक आकलनातून होणारी वाटचालसुद्धा भ्रम पोसणारीच असते. त्यामुळे ती दिशाहीन असते. जेव्हा जगाच्या आसक्तीत रूतलेले डोळे मोडून टाकले जातात तेव्हाच खरा रस्ता कोणता, ते सद्गुरू बोधानं उमगू लागतं. तेव्हाच त्या वाटेवरचं भ्रमाचं धुकं विरून जातं. तर भक्तीच्या अंगानं ‘डोळे मोडीत राधा चाले,’चा हा अर्थ आहे. दुसरा अर्थ असा की डोळे म्हणजे चक्र. कुंडलिनी जागृत होते आणि एक एक चक्र जसजसं उमलतं तसतसे बाह्य़ जाणिवेचे डोळे मिटतात आणि वेगानं ऊध्र्वगामी वाटचाल सुरू होते!

– चैतन्य प्रेम

chaitanyprem@gmail.com

First Published on March 9, 2018 2:01 am

Web Title: loksatta chintandhara part 52