12 December 2019

News Flash

परतफेड करावीच लागते

आपल्या न्यायावर त्यांचा पूर्ण विश्वास होता.

ऋण वैर हत्या, हे तो न सुटे नेदिता..
– संत तुकाराम

कोणाचे घेतेलेले कर्ज, कोणाशी घेतलेले वैर, कोणाची केलेली हत्या याची परतफेड करावीच लागते, यातून कोणाचीही सुटका होत नाही, नियतीकडे क्षमा नाही.
प्रसिद्ध न्यायमूर्ती राम केशव रानडे. आपल्या न्यायावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. एकदा सातारला सेशन कोर्टात ते न्यायाधीश असताना एका सकाळी नदीवर फिरायला गेले होते. त्या वेळी एका माणसाला दुसऱ्या माणसाला चाकूने भोसकून पळून जाताना त्यांनी पाहिले. नेमका या खुनाचा खटला न्यायमूर्तीसमोर आला. त्या वेळी आरोपीच्या पिंजऱ्यातला माणूस तो नसावा असे त्यांना वाटले. तो माणूसदेखील पुन: पुन्हा हा खून मी केला नाही असे सांगत होता. परंतु या माणसाच्या विरोधात पोलिसांकडे एवढे भक्कम पुरावे होते की, न्यायमूर्तीना त्याला शिक्षा द्यावीच लागली. कोर्ट संपल्यानंतर न्या. रानडे यांनी आरोपीला एकांतात भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. ते म्हणाले, ‘‘आत्तापर्यंत माझ्याकडून कोणावरही अन्याय झाला नाही, ईश्वराला स्मरून खरे सांग, हा खून तू केलास किंवा यापूर्वी तू कोणाचा खून केला होतास का ? अगदी खरे बोल.’’ यावर त्या आरोपीने खाली मान घालून सांगितले की, ‘‘२० वर्षांपूर्वी मी दोन खून केले होते, पण आत्ताचा खून मी केला नाही.’’ यावर न्या. रानडे म्हणाले, ‘‘तर मग देवाने तुला पूर्वी केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा आत्ता दिली आहे असं समज. नियती कोणालाही गैरकृत्याबद्दल सोडणार नाही हे लक्षात ठेव. देवाकडे न्याय आहेच आहे.’’ असं म्हणतात, ‘भगवान के घर देर है, लेकीन अंधेर नही है’, गुन्हेगाराला कदाचित गुन्ह्य़ामुळे शिक्षेला विलंब लागेल, पण सुटका नाही.

– माधवी कवीश्वर

First Published on April 16, 2016 1:04 am

Web Title: sant tukaram abhang
Just Now!
X