कुठेही ‘गणपती बाप्पा’ या शब्दांची साद ऐकली की अगदी झोपेतदेखील, ‘मोऽऽरया’ असा प्रतिसाद देतो तो म्हणजे मराठी माणूस! ज्याच्या शिक्षणाची सुरुवात ‘श्री गणेशाय नम:’ने होते तो मराठी माणूस!! जो कुठल्याही कार्याची सुरुवात ‘आधी नमन करू गणराया’ म्हणून करतो तो मराठी माणूस!!!
असा हा मराठी माणूस जेव्हा परदेशात जातो तेव्हा तो तिथेही आपल्या प्रिय बाप्पाचा उत्सव अगदी मनापासून, आलेल्या अडचणींवर मात करीत उत्साहाने साजरा करतो. जन्मापासून परिचित असलेल्या त्या सोहळ्यात सहभागी झाल्यामुळे त्याच्या मनाला अतिशय शांत वाटतं, निश्चिंत वाटतं.
अॅडलेडमधील मराठी माणूसही याहून निराळा मुळीच नाही. अॅडलेड हे साउथ ऑस्ट्रेलिया या राज्यातील मुख्य शहर. अॅडलेडमध्ये १९८६ सालापासून गणेशोत्सव साजरा होतो. त्या काळी मराठी मंडळ अस्तित्वात नव्हते. हिंदू सोसायटी होती. दिलीप चिरमुले हे या हिंदू सोसायटीच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीमध्ये काम करीत. त्यांनी या हिंदू सोसायटीकडे गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली व त्यास मूर्त स्वरूपही दिले. त्या काळी अॅडलेडमध्ये मराठी कुटुंबांची संख्या होती बारा. या सर्वाची एकत्र मोट बांधून, देणग्या मिळवून, तेव्हा अस्तित्वात असलेल्या देवळात पहिल्यांदा गणपती उत्सव साजरा करण्याचे काम चिरमुले कुटुंबाने केले. हा उत्सव तेव्हा अगदी साधेपणाने घरगुती स्वरूपात साजरा होत असे. पहिल्या वर्षी पूजा सांगण्यासाठी गुरुजीदेखील उपलब्ध झाले नाहीत. सदानंद लिमये यांनी पूजा सांगण्याचे कार्य केले व चिरमुले यांनी गणेशाची पूजा केली. त्या वर्षी साधारण पंचवीस मराठी तर दीडेकशे इतर मंडळी या उत्सवात सहभागी झाली. पुढे चारेक र्वष याच पद्धतीने पूजा सुरू राहिली. मग हळूहळू इतर मंडळींचा सहभाग वाढू लागला.
१९९५ साली मराठी कुटुंबांनी पुढाकार घेऊन ‘ओल्ड लुथरन’ चर्चची एक इमारत विकत घेतली व २००१ साली तिथे आता अस्तित्वात असणारे गणेश मंदिर बांधण्यात आले. हे गणेश मंदिर अत्यंत सुंदर असे वास्तुशिल्प आहे. या देवळाच्या बांधणीत रंगसंगतीचा अगदी उत्कृष्ट मेळ साधण्यात आला आहे. देवळातील ग्रॅनाइटची गणेशमूर्ती चेन्नई येथून आणण्यात आलेली आहे. याच देवळात लक्ष्मीनारायण, दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, नवग्रह, भैरव, हनुमान, मुरुगवल्ली व दैवनई यांच्याही मूर्ती आहेत. येथे शिवलिंगही आहे. या मंदिरात गणेशोत्सवाबरोबरच इतरही अनेक उत्सव साजरे होतात.
दिलीपकाकांनी लावलेल्या छोटय़ाशा रोपटय़ाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. अत्यंत छोटय़ा स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या या गणेशोत्सवाची जबाबदारी मराठी मंडळाची स्थापना झाल्यावर अॅडलेड मराठी मंडळ घेऊ लागले. आता गणेशोत्सव गणपतीच्या नव्या बांधलेल्या देवळात साजरा होतो. दोनेकशे मंडळींच्या हजेरीने सुरू झालेल्या उत्सवात आता मात्र साधारण दोन हजार मंडळी सहभागी होतात.
अॅडलेड मराठी मंडळाचे अध्यक्ष आहेत सदानंद मोरे. ते या कार्यक्रमाचे समर्थपणे आयोजन करतात व इतर कार्यकारणी सदस्य आणि असंख्य स्वयंसेवक त्याची चोख अंमलबजावणी करतात. सध्या कमिटीमध्ये दिलीप कुलकर्णी उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. डॉ. वृषाली सानप सेक्रेटरी आहेत. गंगाधर पाटील कोषाध्यक्ष ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. अनुप देशमुख कल्चरल सेक्रेटरी आहेत. मी, डॉ. सोनाली मुखर्जी जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहते. तर दिनेश लाडे, सुनील ठाकरे व योगेश डांगे हे कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत असून विविध कामांमध्ये मोलाची मदत करतात.
हा गणेशोत्सव एक दिवसाचा सोहळा असतो. नवीन लग्न झालेले जोडपे किंवा नव्याने सेटल होण्यासाठी आलेली मंडळी पूजेला बसतात. त्या दिवशी मंदिरात होमहवन होते. त्यानंतर अॅडलेड शिवगर्जना या संस्थेच्या अत्यंत नियमबद्ध लेझीम, ढोल-ताशांच्या संचलनात बाप्पाची मिरवणूक काढली जाते. लेझीम, ढोल-ताशांचा तो परिचित ध्वनी खरं तर साऱ्यांना भारतातच घेऊन जातो. येथील सर्वच मराठी कुटुंब अगदी पारंपरिक वेशात या मिरवणुकीत सहभागी होतात. स्त्रिया या निमित्ताने हौसमौज करून घेतात, मिरवून घेतात. कुणी नऊवारी साडी नेसतात तर कुणी जरीची पाचवारी. दागदागिने घालायची हौसही बायका या दिवशी पुरवून घेतात. लहान मुली परकर-पोलका, चुडीदार असा वेश परिधान करतात. पुरुष झब्बा-पायजमा घालून फेटे बांधून मिरवणुकीत सहभागी होतात. अत्यंत मनोहारी रंगांची उधळण या मिरवणुकीत एकत्रित झालेला समूह करीत असतो. मिरवणूक सुरू असताना अनेक ऑस्ट्रेलियन मंडळी तिथे थांबून पारंपरिक वेशातल्या भारतीयांचे निरीक्षण करीत असतात. मिरवणुकीबद्दलची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर अगदी सहज दिसून येते. काही मंडळी त्याबद्दल चौकशीही करतात, काही फोटो काढतात तर काही सहभागीही होतात. आमच्या इथल्या सर्व समारंभांची छायाचित्रं काढण्याचे काम ऑस्ट्रेलियन स्टीफन अगदी मनापासून करतो. त्याला आपले सर्व कार्यक्रम, आपली वेशभूषा, आपले जेवण याबद्दल प्रचंड कुतूहल वाटतं. सर्व कार्यक्रमात शेवटपर्यंत सहभागी होऊन, कॅमेऱ्यात सर्वाना सुरेखपणे टिपून घेतो.
मिरवणुकीनंतर गणेशाचे पूजन केले जाते. साग्रसंगीत अशा पूजा विधीनंतर मंदिरात भजनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर सुरेख अशा वाद्यांच्या साथीने महाआरती करण्यात येते. महाआरतीला साधारण दीड हजार मंडळी उपस्थित असतात. सर्व मंडळी अत्यंत तल्लीन होऊन आरतीचा आनंद घेतात. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप होते. महाप्रसादासाठी सर्व स्वयंपाक मंदिराच्या आवारात करण्यात येतो. या महाप्रसादासाठी मोदक मात्र मराठी कुटुंबातील माणसे स्वत:च्या घरी बनवून आणतात. बहुतेकशी कुटुंबं एकवीस मोदकांचा नेवैद्य करून आणतात.
या मोदकांचीही एक अगदी सांगण्यासारखी गम्मत आहे. सर्व मंडळी मोदक करून आणायची. कुणाचे मोदक जम्बो साइझ तर कुणाचे मिनिएचर. कुणाचे सुबक तर कुणाचे वेडेवाकडे, कुणाचे सुरेख बदामी तर कुणाचे जरा करपलेले असे असायचे. ज्यांचे व्हायचे छान त्यांचा वाढे मान पण ज्यांचे बिघडायचे त्यांना उगीचच वाटायचे लहान. मग मोदक नीट होत नाहीत म्हणून वाईट वाटून घेणाऱ्या लोकांसाठी मंडळातील ज्येष्ठ बायकांनी चक्कएक पाककृती बनवली. ती पाककृती, मंडळ प्रत्येक सभासदाला ई-मेलद्वारे पाठवू लागले व मग त्या पाककृतीप्रमाणे बनवलेले सर्वच मोदक एकसारखे होऊ लागले. कोणाचा कुठला मुळी ओळखणे अशक्य झाले. तर सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की साधारणपणे सहा-सातशे मंडळी प्रसाद बनवण्यासाठी हातभार लावून दीड-दोन हजार मोदक महाप्रसादासाठी उपलब्ध करून देतात. पैशाने मदत करणे खूप सोपे असते पण इथे मंडळी कष्टांची मदत करतात. या कष्टांचे महत्त्व कदाचित भारतात राहणाऱ्या मंडळींना फारसे वाटणार नाही, पण इथे दूरदेशी आलेल्या आमच्यासारख्यांना मात्र हे कष्ट लाखमोलाचे वाटतात.
गणेशोत्सव साजरा करताना येथील गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन मात्र केले जात नाही. परदेशातील कायदाव्यवस्था अत्यंत कडक असल्याने कुठल्याही पाण्याच्या साठय़ाचा उपयोग विसर्जनासाठी करता येत नाही. सुरुवातीला कायदा पाळण्यासाठी विसर्जन होत नसे. नंतर मात्र पर्यावरणाची निगा राखणे हा विचार सर्वाच्या मनात बळावू लागला व विसर्जन न करता त्याच मूर्तीची पूजा करणे इष्ट असेच सर्वाचे मत पडले. त्यामुळे इथे वर्षांनुर्वष मंदिरात स्थापन केलेल्या मूर्तीचीच पूजा केली जाते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खरं तर भारतातही अशीच व्यवस्था मंडळींनी अंगीकारावी, असे अगदी मनापासून वाटते.
अॅडलेडमध्ये मराठी व त्यांच्याबरोबर अनेक अमराठी मंडळीदेखील या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात. इतकेच काय, तर अनेक ऑस्ट्रेलियन व इतरही परदेशी मंडळी ‘एलिफंट गॉड’ असे गणपतीचे वर्णन करीत देवळाला भेट देत असतात. स्वत:च्या घरी गणपती आणणारी मंडळीदेखील संध्याकाळी देवळात हजेरी लावल्याशिवाय राहत नाहीत. आपल्या माणसांपासून, देशापासून हजारो मैलांवर असूनदेखील आपल्या संस्कृतीचा आपल्या समारंभाचा मनापासून आनंद इथल्या मंडळींना घेता येतो.
इथे मराठी कुटुंब अत्यंत एकीने, एकमेकांना आधार देऊन राहतात. कैक वर्षे एकमेकांसोबत राहून सर्व कुटुंबातील मंडळी आता एकमेकांचे नातेवाईकच झाली आहेत. याचमुळे नातेवाईकांची अनुपस्थिती इथल्या मंडळींना फारशी जाणवत नाही. सर्व मराठी लोकांचे खरं तर एक मोठ्ठे कुटुंबच इथे आहे असे म्हणणेदेखील चुकीचे ठरणार नाही आणि म्हणूनच आपल्या देशापासून लांब असलो तरी आपल्या सणावारांचा आनंद आम्ही इथे अगदी जसाच्या तसा मिळवू शकतो.
आताही आम्ही मंडळींनी गणेशोत्सवाची अगदी जोरदार तयारी सुरू केली असून आनंदाची देवाणघेवाण करण्यासाठी सारे सज्ज होत आहोत. आपल्यापैकी कोणी इथे येणार असल्यास मराठी मंडळाशी अवश्य संपर्क साधा. मराठी मंडळाबद्दल जाणून घेण्यासाठी http://adelaidemm.org.au या संकेतस्थळाला भेट द्या. मराठी मंडळाविषयी आपल्याला कुठलीही माहिती हवी असल्यास contact@adelaidemm.org.au येथे संपर्क साधा. आम्ही इथे असलेले सर्व जण कुणाचीही मदत करण्यासाठी नेहमी सज्ज असतो.
आमच्या सर्वाकडून आपणाला अगदी मनापासून गणपती बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

(सर्व छायाचित्रे – स्टीफन व्ॉट्स)