ब्रिस्बेन हे ऑस्ट्रेलियातील एक टुमदार शहर. रम्य समुद्रकिनारे आणि भारतासारखी थोडी दमट हवा. त्यामुळे भारतीयांना अगदी घरचीच आठवण करून देणारे.
युरोप आणि अमेरिकेशी तुलना करता इथे मराठी लोक अगदी मोजके आहे. जुन्या स्थायिक झालेली कुटुंबे अगदी हाताच्या बोटावर मोजता येण्याइतकीच आहेत. बरेचसे लोक दोन हजार सालानंतरच्या ‘मायिनग बूम’मध्ये आलेले आहेत. ब्रिम (इफकटट) किंवा ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळ या ग्रुपची सुरुवात २००५ साली झाली. जवळजवळ पंधरा मराठी कुटुंबांनी एकत्र येऊन मंडळाची सुरुवात केली. पहिली काही वर्षे गणेशोत्सव आणि दिवाळी, हळदीकुंकू असे कार्यक्रम मोजक्या काही कुटुंबांनी एकत्र येऊन साजरे केले. २०१५ साली गणपतीला साधारण ४०० लोक आणि सव्वाशे ते दीडशे कुटुंबे असतील अशी अपेक्षा आहे. आमचे मंडळ छोटे असले तरी उत्साही आहे. ऑस्ट्रेलियाच्या इतर मंडळांच्या मदतीने आणि कधीकधी मदतीशिवायसुद्धा भारतातले बरेच आर्टिस्ट पाहुणे गेल्या दहा वर्षांत इथे येऊन गेले आहेत. अतुल कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, अवधूत गुप्ते, वंदना गुप्ते, मकरंद अनासपुरे अशा दिग्गज कलावंतांना भेटायची संधी आम्हाला गेल्या दहा वर्षांत मिळाली. कथ्थक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांचा कार्यक्रम, वंदना गुप्ते यांची ‘ती’ नाटिका आणि अनासपुरे यांचा स्टेज परफॉर्मन्स आम्ही खूप एन्जॉय केला, पण अजून एखादे मराठी नाटक- भारतीय आणि स्थानिक कलाकारांनी एकत्र सादर केलेले, इथे झाले नाहीय याची खंत वाटते. आमचा गणपती इतर मंडळांपुढे थोडा वेगळा साजरा होतो. ब्रिमची स्वत:ची गणेशमूर्ती आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंदिरात साजरा न होता शाळेच्या किंवा कम्युनिटी हॉलमध्ये साजरा होतो. दुपारी बाप्पाची पूजा, साग्रसंगीत आरती, मोदकाचा प्रसाद असे सगळे झाले की, मनोरंजनाच्या/ रंगारंग कार्यक्रमाला सुरुवात हाते. नाच, गाणी, नाटुकली आमच्या मोजक्या ४०० लोकांत बरेच उत्साही कार्यकर्ते आणि कलाकार आहेत. आमच्या गणेशोत्सवाचा विशेष म्हणजे नंतरची मिरवणूक. कार्यक्रम झाला की काऊन्सिलची परवानगी असेल तर आम्ही बाप्पाला हॉलभोवती, नाही तर हॉलमध्ये विसर्जनाच्या आधी चक्कर मारून आणतो. विसर्जन फुलांनी पाणी शिंपडून प्रतीकात्मक असेल तरी ढोल, ताशा आणि हिट मराठी-हिंदी गाण्यांवर नाचत आमची मिरवणूक अगदी खरीखुरी असते.
ब्रिमच्या मेंबर्ससाठी (सभासद) आमच्या गणपतीला शुल्क नाही. आमची फॅमिली मेंबरशिप सत्तर डॉलर्स इतकी आहे आणि वर्षांच्या सुरुवातीला पैसे भरल्यास आम्ही गणपतीची फक्त ऐच्छिक वर्गणी घेतो. इथे ब्रिस्बेनमध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी काऊन्सिलच्या लायब्ररीमध्ये आम्ही छोटीशी ‘मराठी’ शाळा भरवतो. अगदी अनौपचारिक अशा या शाळेत बाराखडी, मराठी आकडे अशा गोष्टी दोन तास स्वयंसेवक येऊन शिकवतात. आम्ही इथल्या लायब्ररीत मराठी पुस्तकेसुद्धा आणली आहेत. मराठी शाळेतल्या चिमुकल्यांचा कार्यक्रम आमच्या गणपती कार्यक्रमात असतोच. ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे जसे आमचे मंडळ मोठे होते आहे तसे कुठल्या तरी सामाजिक प्रश्नासाठी एकत्र येऊन काही तरी करावे सामाजिक प्रश्नासाठी एकत्र येऊन काही तरी अशी आमची इच्छा आहे. रेड क्रॉस रक्तपेढीसाठी आम्ही मंडळाची नोंदणी केली आहे आणि नियमितपणे आमच्यातले काही कार्यकर्ते रक्तदान करतात.
ब्रिज टु ब्रिस्बेन हा ब्रिस्बेनमधला एक महत्त्वाचा उपक्रम. ब्रिजपासून ब्रिस्बेन सिटीपर्यंत तुम्ही पाच किंवा दहा किलोमीटर्स चालत/ धावत जाऊ शकता. तुम्ही टीम म्हणून हा टप्पा एकत्र करू शकता. निधी उभारण्यासाठीचा हा स्थानिक पातळीवरचा अफलातून उपक्रम आहे. या वर्षी ब्रिमच्या ‘ब्रिज टू ब्रिस्बेन’ टीमने सेरेब्रल पाल्सी लीग या संस्थेसाठी जवळजवळ नऊशे डॉलर्स जमा केले. ही संस्था अपंग मुलांना/मोठय़ांना व्हील चेअर्स, वॉकर्स, फिजिओथेरपी यांची मदत करते.
या वर्षी गणपतीची वर्गणी आणि गणेशोत्सवात देवासमोर जमा झालेली रक्कम आम्ही भूगाव येथे पीडित मुलांबरोबर काम करणाऱ्या ‘मानव्य’ या संस्थेला देणार आहेत. या मुलांचे एक महिन्याचे जेवण ब्रिस्बेनमधून प्रायोजित व्हावे, अशी इच्छा आहे. बघू या आमचे कार्यकर्ते किती वर्गणी जमवतात ते!
तर असा हा आमचा गणेशोत्सव झाला, की लगेच पुढच्या दिवाळीची चाहूल लागेल. ऑस्ट्रेलियन स्थानिक लोकांना आणि इतर भारतीयांनाही ‘दिवाळी’ किंवा फेस्टिव्हल ऑफ लाइट चांगलाच माहिती आहे, पण ब्रिस्बेनपुरता तरी गणेशोत्सव फक्त मराठी मंडळापुरताच मर्यादित आहे.