जुलै-ऑगस्ट हे शाळांच्या सुट्टय़ांचे दिवस संपवून, देश-विदेशच्या सफरी करून, स्वमुक्कामी स्थिर झाले की दुबईकर मंडळींना वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते व दहा दिवस मोठय़ा उत्साहाने उत्सव साजरा केला जातो. हिंदू धर्मीयांचा हा सार्वजनिक उत्सव काही अंशी सर्वधर्मीयांचा झाला, अगदी जागतिक झाला. समाज हा एकसंध असावा, संघटित असावा या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी या उत्सवाला सुरुवात केली. भारताप्रमाणे इतर देशांतही मोठय़ा प्रमाणात, अगदी थाटामाटात गणेशोत्सव साजरे होताना दिसतात. आखाती देशातही, ‘महाराष्ट्र मंडळ, दुबई’ ही चाळीस वर्षांची परंपरा असलेल्या संस्थेतही मंडळाचा गणेशोत्सव हा साऱ्या भारतीयांचाच उत्सव असतो.
साधारणपणे ३५ वर्षांपूर्वी कार्यान्वित असलेल्या समितीने गणेश स्थापनेस सुरुवात केली. सुरुवातीस सभासदही मोजकेच होते. पैसे कमी. जागेची उपलब्धता नसायची. गणेशमूर्ती औषधालाही दिसायची नाही. आखाती देशात या उत्सवास सुरुवात करायची, हे धाडसच होते. पर्वते त्या वेळी एअर इंडियात होते. त्यामुळे गणरायाची पहिली मूर्ती थेट विमानाने मोठय़ा दिमाखात आणली गेली आणि महाराष्ट्र मंडळाच्या गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला. काही वर्षे मंडळाच्या सभासदांपैकी कुणाच्या तरी घरी गणेश स्थापना करून हा उत्सव साजरा होत असे. सारे सभासद एकत्रित मखर करण्यापासून आरास, प्रसाद, पूजा आरत्या, महाप्रसाद, अथर्वशीर्षांचे सहस्रावर्तन हे एकाच कुटुंबासारखे साजरे करत आणि त्याला सुंदर सोहळ्याचे स्वरूप यायचे. साधारणत: १४ वर्षांपासून मीना बाजार, बर दुबई येथील सिंधी कम्युनिटी हॉल मंडळाच्या गणरायास उपलब्ध झाला, तो आजतागायत. हे गणेशोत्सवाचे सोहळे दर वर्षी साजरे होऊ लागले.
दुबईचा सारा चेहरामोहरा कायापालट झाल्याप्रमाणे बदलत गेला. तसे राजकारण, धर्मकारण, समाजकारण आणि अर्थकारणही बदलत गेले. फार गाजावाजा न करता केले जाणारे हे सोहळे नंतर राजरोस मोठय़ा प्रमाणात साजरे करता येऊ लागले. ‘पूर्वेकडची संस्कृती आणि पश्चिमेकडचा थाट’ यांचा सुंदर मिलाफ जाणवण्याचे हेच ते वळण. हल्ली बाजारात सगळ्या दुकानांमध्ये विक्रीसाठी गणराजांच्या मूर्तीनी रकाने भरू लागले आहेत. तसेच सजावट, पूजेचे साहित्य, कृत्रिम फुलांच्या माळा, आकर्षक वेष्टनांमध्ये सजवून ठेवलेले दिसू लागले. दर वर्षी मंडळाची कार्यकारी समिती बदलते. त्यामुळे प्रत्येक वर्षी नवा गडी – नवे राज्य तसे नवी समिती – नवा उत्साह पाहायला मिळतो. दर वर्षी आपापल्या कल्पनेप्रमाणे प्रसिद्ध वास्तूंच्या प्रतिकृती मखरासाठी केल्या जातात. मंडळाचे सभासद मखराची जबाबदारी पार पाडतात. महिनाभर आधी नियोजन सुरू होते. असंख्य हात मदतीला येतात. गणेश स्थापनेच्या आदल्या दिवसापासून सजावटीची तयारी चालू होते. सकाळी साधारणत: दहा वाजता पूजेला सुरुवात होते. गणेशाला रेशमी वस्त्रे व सोन्या-चांदीचे दागिने घालून सजविले जाते. बायकांची सुंदर रेशमी वस्त्रे नेसून, दागदागिने घालून सगळीकडे लगबग सुरू असते. पूजेची तयारी, पाट, ताटं-वाटय़ा, फुलं-पत्री, दिवे, पंचामृत, प्रसाद, ताम्हण, तांबे, पळी, घंटी.. हजार गोष्टींची तयारी. सजलेला हॉल, अगरबत्त्या, धूप, कापूर, फुले-फळे, प्रसादाचा दरवळ, मन प्रसन्न करून जातो आणि उपस्थित भाविकांनी भरलेल्या हॉलमध्ये गणरायाच्या आरत्यांनी आणि जयघोषाने सारेच गणेशमय होऊन जातात.
त्या त्या वर्षीच्या समितीच्या निर्णयाने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. एखाद्या संध्याकाळी नामांकितांची प्रवचने, भजने, अभंग वगैरे होतात. परंतु दोन्ही वेळची आरती, अथर्वशीर्षांचे सहस्रावर्तन आणि महाप्रसाद यात आजतागायत खंड पडलेला नाही. गजाननाला रोज दोन्ही वेळचा नैवेद्य मात्र मंडळातील गृहिणीकडूनच येतो. सगळ्याच भारतीय आणि अभारतीय लोकांना मुक्त प्रवेश असल्याने दिवसभर लोक दर्शन व प्रसादासाठी येत असतात. भक्तगणांकडून रोज वेगवेगळे प्रसाद फळांच्या वा मिठाईच्या रूपात चढविले जातात अणि दर्शनास आलेल्या भाविकांमध्ये तो वाटला जातो. समितीतील सदस्य आळीपाळीने मंदिरात गणरायाच्या सेवेस हजर असतात. काही जण पाच दिवसांची रजा घेऊन गणरायाजवळ थांबतात. दिव्याला तेल देणे, आलेल्या भाविकांना प्रसाद देणे, अजूबाजूला स्वच्छता ठेवणे, हे सारे स्वखुशीने केले जाते. दोन्ही वेळच्या आरतीची जबाबदारी सभासदांमध्ये वाटून दिली जाते. सकाळी फारशी नाही पण संध्याकाळच्या आरतीस मुंगीलाही शिरायला जागा नसते. पाच दिवसांचा यथासांग सोहळा संपन्न झाला की गणरायाला निरोप देण्याची वेळ येते. समितीचे लोक एक-दोन गाडय़ांमध्ये गणरायाला घेऊन समुद्राच्या खाडीपर्यंत जातात. विसर्जनाच्या मिरवणुकीची प्रथा येथे नाही. इथून पुढे गणरायांच्या परतीचा प्रवास छोटय़ाशा बोटीतून समुद्रापर्यंत होऊन, जड अंत:करणाने गणरायांना विसर्जित केले जाते. त्या वेळी दहिपोहे व अंबेडाळ प्रसाद म्हणून वाटली जाते. या पाच दिवसांत दानपेटीत जमा होणारा निधी हा फक्त सेवाभावी संस्थांना दिला जातो. असा हा गणपती सोहळा, आखाती देशातला असूनसुद्धा कुठलीही उणीव न ठेवता साग्रसंगीत पार पडतो.
रिद्धी-सिद्धी दासी असलेला हा देव लोकमान्यांमुळे जास्तीतजास्त १० दिवस घरोघरी चैतन्य आणतो, एरवी तो देवात असतोच, पण त्याही असण्याने असेच चैतन्य घराघरात नांदो, हेच गणेशचरणी पसायदान!!!
सुषमा शिंदे