मानवी जीवन अधिक समृद्ध करणाऱ्या तंत्रज्ञानाचा महोत्सव म्हणजेच आयआयटी टेकफेस्ट. दरवर्षी हजारो तंत्रज्ञानप्रेमी मुंबईतील टेकफेस्टमध्ये सहभागी होतात. त्यातून आपले भविष्य कसे असेल याची झलक बघायला मिळते.

आयआयटीमध्ये अनेक विषयांवर संशोधन चालू असते. ‘टेकफेस्ट’मध्ये ‘टेककनेक्ट’ या नावाने त्या सर्व प्रकल्पांचे प्रदर्शन पहायला मिळते. संस्थेतील अनेक विभाग ‘टेकफेस्ट’मध्ये आपले प्रकल्प मांडतात. त्यातून तंत्रज्ञान या विषयाची व्यापकता आपल्याला दिसते. आणि तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात काय बदल आणू शकेल याची जाणीव होते. उदाहरणार्थ बऱ्याचदा एखादा गुन्हा घडतो तेव्हा तपास करताना पोलीस संशयिताची ओळख पटवायचा प्रयत्न करतात. पण प्रत्येक वेळा साक्षीदारांना संशयिताचे नीट वर्णन करता येत नाही. कारण कधी कधी संशयिताच्या कपडय़ांचा रंग किंवा वाहनाचा रंग अशाच गोष्टी लक्षात राहतात. पण त्यावरून तपास करणे कठीण असते. सीसीटीव्हीच्या चित्रिकरणाचा वापर करायचा तर एवढय़ा माहितीचे विश्लेषण करणे ही अत्यंत किचकट बाब बनते. एरवीही सतत सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवणे हे सोपे काम नाही. या समस्येवर तोडगा म्हणून आयआयटी पवईमधील विद्यार्थ्यांनी प्रोग्रॅम तयार केला आहे. त्याद्वारे भविष्यात रेकॉर्डिगमधील एका ठरावीक भागाचा सर्च करणे शक्य होईल. एखाद्या ठरावीक रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्तीबद्दल माहिती हवी असेल तर सर्च केल्यावर आपल्याला हवे ते रेकॉर्डिग क्षणात मिळू शकेल. तसेच हा प्रोग्रॅम स्वत: अनपेक्षित घटना ओळखून त्या साठवून ठेवू शकेल; उदाहरणार्थ रस्त्यावरील अपघात किंवा ठरावीक काळात फक्त एक वाहन रस्त्यावरून गेले आहे इत्यादी. किंवा सशस्त्र दलांना दोन किलोमीटरच्या परीघामध्ये फोरजी नेटवर्क देण्याची कल्पना. ज्यामुळे कारवाईची लाइव्ह माहिती नेतृत्व करणारे अधिकारी व इतर जवानांना मिळणे शक्य होईल. असे प्रकल्प प्रत्यक्ष वापरात आल्यावर संरक्षण व अंतर्गत सुरक्षा अधिक चांगल्या क्षमतेने करणे शक्य होईल.

‘टेकफेस्ट’मधील तंत्रज्ञानाचा आधार घेतला तर अगदी वैद्यकीय क्षेत्रातही नावीन्यपूर्ण बदल होतील. उदाहरणार्थ रुग्णाच्या गरजेप्रमाणे हाडांची त्रिमितीय मॉडेल्स बनवता येतील. त्यामुळे डॉक्टरांना शस्त्रक्रिया करताना योग्य निर्णय घेता येईल. त्याच्या जोडीला गरजेनुसार हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी साचे बनवता येतील. त्यामुळे अचूकतेने शस्त्रक्रिया करणे शक्य होईल. अनेकदा अपघातात पाय गमावलेल्या व्यक्तींना वापरायला दिले जाणारे कृत्रिम पाय फारसे सोयीचे नसतात. म्हणून विविध कोनात वाकणारा, कमी खर्चिक तसंच प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य ठरतील असे कृत्रिम पाय बनवण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.

बऱ्याचदा तंत्रज्ञान हा शब्द ऐकला की पहिल्यांदा स्मार्ट गॅजेट्स डोळ्यासमोर येतात. मात्र मिक्सरमध्ये बीएलडीसी मोटार वापरून पारंपरिक मोटारच्या तुलनेत अधिक परिणामकारकता आणण्याचा प्रयत्न आपल्याला दाखवून देतो की तंत्रज्ञान आपल्याला वाटते त्यापेक्षाही जास्त प्रमाणात आपल्या आयुष्याशी जोडलेले आहे. त्याचबरोबर बायोगॅसमधून कार्बन डाय ऑक्साइड आणि हायड्रोजन सल्फाइड असे पर्यावरणाला घातक वायू वेगळे करून बायोगॅसची परिणामकारकता वाढवणारा प्रकल्प पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचे उदाहरण आपल्यासमोर ठेवतो.

याशिवाय भारतीय सेना वापरत असलेल्या उपकरणांचे तसेच डीआरडीओने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन ‘टेकफेस्ट’मध्ये होते. यातून भारतीय सैन्यदलांद्वारे वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. त्याबरोबर देश-विदेशातील निवडक अशा कंपन्यांचे प्रदर्शन भरले होते. यात एनटीयू, सिंगापूरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले मानवरहित वाहन होते ज्याचा वापर बचावकार्याच्या वेळी माहिती मिळवण्यासाठी होऊ  शकतो. तसेच निनो हा रोबो गाण्यावर नृत्य करताना दिसतो. मात्र त्यापेक्षाही शिक्षणात शिक्षकांचा सहकारी म्हणून त्याचा वापर होऊ  शकतो. तो फेशिअल रेकग्निशन आणि मोशन सेन्सर वापरून मुलांची हजेरी घेऊ  शकेल किंवा मुलांच्या प्रश्नाची उत्तरे तो देऊ  शकेल. तसेच जे शिकवले गेले आहे ते मुलांना समजले आहे की नाही हे त्या तासिकेलाच सांगू शकेल, अशा पद्धतीने त्याला बनवण्यात येत आहे.

टेकफेस्टचे अजून एक महत्त्वाचे आकर्षण म्हणजे रोबोवॉर्स. यंदा भारतासह पाच देशांच्या संघांनी यात भाग घेतला होता. रोबोवॉरमधले हे रोबो साधारणपणे रिमोट कंट्रोलच्या गाडय़ांसारखे असतात. तीन मिनिटात प्रतिस्पर्धी रोबोला हरवायचे अथवा सामना अनिर्णित राहिल्यास आक्रमकता व चाली यानुसार विजेता ठरतो. हा अत्यंत रोमांचकारी असा खेळ आहे. या रोबोंकडे अनेक प्रकारची आयुधे असतात; ड्रम्स, वेज, लिफ्टर्स आणि अजून बरेच काही. एका विशिष्ट चौकोनी मैदानात बाहेरून नियंत्रण करणाऱ्या स्पर्धकाला तीन मिनिटात हल्लाही करायचा असतो आणि बचावसुद्धा करायचा असतो. यामध्ये रोबोच्या हालचालींवर नियंत्रण असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ते नसेल तर रोबो तसेच आयुधे चांगली असूनही जिंकता येणे कठीण आहे. रोबोवॉर म्हणजे खेळ ही झाली एक बाजू. मुळात आधी त्यासाठी रोबो डिझाइन करावा लागतो. या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या अक्षय जोशी या विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखील ३५ जणांची टीम भुसावळ येथे कार्यरत आहे. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा   अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उपलब्ध करून दिली आहे. त्याच जोरावर अक्षयच्या टिमने मागील वर्षी टेकफेस्टमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्याने चीन, ब्राझील येथील रोबोवॉर स्पर्धेतदेखील भाग घेतला होता. कॉम्बॅट रोबो तयार करण्याबद्दल अक्षय सांगतो की, रोबो बनवताना त्याचा आकार, मजबुती, आयुधे, खर्च, गुणवत्ता यांचा विचार करून विशिष्ट वजनात तो बसवावा लागतो. या सगळ्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि कोडिंग यांचे चांगले ज्ञान असावे लागते. मुख्य म्हणजे संघातील प्रत्येकाला हे किमान ज्ञान असावे लागते कारण काही बिघाड झाला तर त्याचे काम अडता कामा नये. खेळाच्या पलीकडे जाऊन स्पर्धक अधिक कार्यक्षम यंत्रे व डिझाइन तयार करतात. या कॉम्बॅट रोबोची नेमकी यापुढील काळातील भूमिका काय असेल यासंदर्भात आयआयटीमधील स्टुडन्ट अफेअर्सचे डीन प्रोफेसर सौम्य मुखर्जी सांगतात की, सध्या कॉम्बॅट रोबोचा सर्वाधिक वापर सुरुंग शोधून निकामी करण्याच्या कामी केला जात आहे. आफ्रि केत असे अनेक कॉम्बॅट रोबो कार्यरत आहेत. या रोबोंचा वापर उद्या वाढला तरी त्यामुळे मनुष्यबळाला फटका बसणार नाही. कारण यंत्राच्या मागे कार्यरत असणारा विचार करणारा माणूसदेखील गरजेचा आहे.

या रोबोवॉरमधील चीनचा सहभाग त्यांच्या नेहमीच्या शैलीने आक्रमक असाच होता. त्यांच्या प्रतिनिधीला त्यांचा रोबो सर्वात शक्तिशाली बनवणे हे ध्येय वाटत होते.

‘टेकफेस्ट’मध्ये अनेक विषयांवर व्याख्याने आयोजित केली होती. मात्र सगळ्यांमध्ये एका वक्त्याला ऐकण्यासाठी लोक सर्वात जास्त उत्सुक होते, तो वक्ता म्हणजे सोफिया. यंत्रमानवासारखी दिसणारी ही रोबो सौदी अरेबियाची नागरिक आहे आणि असे नागरिकत्व मिळालेली ती पहिली रोबो आहे. सोफिया फेशिअल रेकग्निशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संभाषण करू शकते. सोफियाशी झालेल्या प्रश्नोत्तरांतून मानव आणि रोबो संबंधांची सकारात्मक बाजू दिसून आली. आदर्श भविष्याचे स्वप्न तिने मांडले. मात्र सोफियाच्या निमित्ताने नागरिकत्व आणि एकूणच रोबो आपली जागा घेतील का असे प्रश्न पडतात.

वक्त्यांमध्ये महत्त्वाचे आणखी एक नाव होते १४ वर्षीय तन्मय बक्षीचे. तो जगातील सर्वात तरुण आयबीएम वॉट्सन डेव्हलपर आहे. त्याच्या व्याख्यानातून कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आपल्या जीवनात कसा फरक पडू शकतो याची माहिती मिळाली. तो सांगतो की, बऱ्याचदा ग्रह शोधण्यासाठी ट्रान्झिट पद्धतीचा वापर केला जातो. ज्यात त्या ग्रह-ताऱ्यासमोरून जाताना तो त्या ताऱ्याचा प्रकाश काही प्रमाणात अडवतो, त्याचे मोजमाप केले जाते. मात्र या मोजमापात अंतराळातील इतर गोंधळाचाही समावेश असतो. अशा वेळी आलेल्या माहितीचे विश्लेषण त्यातील अनावश्यक गोंधळ काढून केले जाते. त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतो. फेशिअल रेकग्निशन तंत्राचा वापर केला जातो अशा ट्रेडिंग, वैद्यकीय क्षेत्र आणि सुरक्षा यंत्रणा यासारख्या सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगी ठरू शकते. मुख्य म्हणजे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जिथे हेल्पलाइन्सवर ताण असतो आणि डिप्रेशनमध्ये असणाऱ्या लोकांचे कॉल घेता येत नाहीत तिथे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता मदत करू शकते. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक अचूकतेने, कमी खर्चात मानवी आयुष्य अधिक सोपे करू शकेल.

टेकफेस्टमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन केले जाते, कार्यशाळा घेतल्या जातात. यातून खूप काही शिकायला मिळते. टेकफेस्टमधून परत जाताना तंत्रज्ञानविषयक दृष्टिकोन आणि बरेच काही घेऊन आपण परततो.\
निशांत पाटील – response.lokprabha@expressindia.com