बराती, दहेज, सिंदूर, सात फेरे, बिदाई, सुहाग रातमध्ये अडकलेला हिंदी चित्रपट आता त्याबाबतीत कमालीचा बदलला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कथा ज्या प्रांतांतून फिरते त्या प्रांतातील विवाह सोहळा आणि त्यानिमित्ताने त्यांच्या लग्नात घडणाऱ्या उलाढाली सिनेमाच्या एका तिकिटात पाहायला मिळतात.

चित्रपट हा मुख्यत: मानवी स्वभावातल्या नवरसांवरच बेतलेला असतो. त्यातील शृंगाररस हा चित्रपटांच्या कथानकात महत्त्वाचा ठरतो. त्याचा एक धागा पकडला की आपोआप त्या कथेत इतर भावरस ओघाने दाखवले जातात आणि प्रेक्षकांच्या मनात घरही करतात. हे ‘रस’वर्णन इथे करण्यामागचे कारण एकच या एका शृंगाररसाची सुरुवात प्रेमामुळे होते आणि मग या प्रेमभरी दास्ताँचे रूपांतर विवाहात होत असल्याने दर दोन हिंदी चित्रपटांमागे प्रत्येक चित्रपटात बँड, बाजा आणि वराती येतात. गेली कित्येक वर्षे बॉलीवूडचे हे बँड, बाजा, बराती पंजाबीच असायचे. आता मात्र दाक्षिणात्य, मराठी, पंजाबी, गुजराती आणि जोडीला पाश्चिमात्य पद्धतींचे एक कडबोळे बॉलीवूडच्या विवाहांमधून पाहायला मिळते.

21lp-marriageहिंदी चित्रपटांमध्ये ‘सात फेरे’ या शब्दाला फार महत्त्व असतं. या सात फे ऱ्यांभोवती बॉलीवूडने अनेक कथा रंगवल्या आहेत. गरीब नायक, श्रीमंत नायिका आणि मग त्यांच्या प्रेमाला घरून असणारा विरोध असे सगळे अडथळे पार करून लग्नापर्यंत पोहोचण्यासाठी मग अग्नीच्या साक्षीने घेतलेले हे सात फेरे आणि माँग मे चुटकीभर सिंदूर भरला की दोन प्रेमी जिवांचा पडद्यावरचा संसार सुरू होतो, ही हिंदी चित्रपटातील लग्नाची पहिली पायरी होती. नायक-नायिकांचे हे सात फेरे पूर्ण होईपर्यंत प्रेक्षकांचा श्वास अडकलेला असायचा, एवढय़ा उत्कंठावर्धक घडामोडी केवळ या सात फे ऱ्यांदरम्यान दिग्दर्शकांनी रंगवलेल्या आहेत. पण सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये केवळ सिंदूर आणि सात फे ऱ्यांवर ही फिल्मी लग्नाची कहाणी सुफळ संपूर्ण व्हायची. या लग्नांमधला हा आटोपशीरणा घालवून त्याचे भल्यामोठय़ा खानदानी सोहळ्याचे स्वरूप देण्याचा मान अर्थातच राजश्री प्रॉडक्शनच्या चित्रपटांकडे जातो. सूरज बडजात्यांनी ‘हम आपके  है कौन’ पासून अगदी आता प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रतन धन पायो’या चित्रपटापर्यंत लग्न हा एकच विषय हाताळला आहे. मात्र ‘लग्नाचा व्हिडीओ’ अशा शब्दांत हेटाळणी झालेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने पडद्यावरचा आणि पर्यायाने घराघरातला विवाह सोहळाही शाही करून टाकला. व्याही-विहिणीच्या नात्यातील गंमत, लग्नाच्या निमित्ताने दोन दिवस एकत्र जमलेली दोन्ही घराकडची मंडळी, गाणं-बजावणं आणि ऐन लग्नघटिकेला नवरदेवाचे बूट पळवून त्यासाठी पैसे मागणाऱ्या मेहुण्या अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना आवडून गेल्या. त्यामुळे ‘जूते दो पैसे लो’ हे दृश्य त्यानंतरच्या कित्येक घरांनी अनुभवलेलं आहे. नवरदेवाचे बूट सांभाळून ठेवणे हे तेव्हापासून लग्नसोहळ्यातील एक महत्त्वाचे काम होऊन बसले आहे. बडजात्यांनी लागोपाठ ‘हम साथ साथ है’, ‘मै प्रेम की दिवानी हूँ’, ‘विवाह’, ‘एक विवाह ऐसा भी’ अशा अनेक चित्रपटांमधून लग्नाचे सोहळे रंगवले. पण, ‘हम आपके  है कौन’चा प्रभाव काही या चित्रपटांना पुसता आला नाही.

मेहंदी, संगीत, करवाँ चौथ या सगळय़ा गोष्टी कित्येक वर्ष प्रेक्षक हिंदी चित्रपटांमधून नित्यनेमाने प्रेक्षकांना पाहायला मिळतात. या पंजाबी लग्नाचं गारूड अजून एका चित्रपटामुळे प्रेक्षकांवर आहे ते म्हणजे शाहरूख खान-काजोल जोडीचा सुपरडुपर हिट चित्रपट ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ने..

‘मेहंदी लगा के रखना.. डोली सजा के रखना’ची साद घालणारा नायक या चित्रपटापासून बदलला. आपलं प्रेम सर्वाच्या आशीवार्दाने मिळवायचं, तिच्या वडिलांचा कितीही विरोध असला तरी त्यांची मनं जिंकूनच ‘दुल्हनिया’ला घेऊन जायचं, असा सूर प्रत्येक तरुणाच्या मनात उमटला तो आजही कायम आहे. किंबहुना काळानुसार विवाह संस्थेविषयी तरुणाईची मतं इतक्या भरभर बदलत गेली की लग्नाच्या रीतीरिवाजांना फार महत्त्व येऊ लागलं. या काळात घरच्यांचा विरोध आहे, हे लक्षात आल्यानंतर एकमेकांशी विवाह करून आपापल्या आई-वडिलांच्या घरात राहणारी ‘साथिया’ची जोडी प्रेक्षकांनी पाहिली. ‘साथिया’ या चित्रपटाचा उल्लेख मुद्दाम करावा लागतो. कारण, त्या वेळी अनेक जोडप्यांनी अशा पद्धतीने गुपचूप लग्न करून आपापल्या घरात स्वतंत्रपणे राहण्याचा फं डा प्रत्यक्षात अवलंबला होता. चित्रपटांचा जनमानसावर प्रभाव पडतो तो असा..

प्रियदर्शन दिग्दर्शित ‘डोली सजा के रखना’ या चित्रपटाने पुन्हा एकदा तरुण पिढीला विचार करायला लावला होता. लग्नासाठी घरातून पळून गेलेले नायक-नायिका आपल्यामागे आई-वडिलांची होणारी घालमेल पाहून अस्वस्थ होतात आणि त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायचं नाही म्हणून घरी परततात. हिंदी चित्रपटांच्या गोड शेवटाप्रमाणे त्यांचे आई-वडीलच त्यांना पुन्हा एकत्र आणतात आणि दुल्हनची डोली सजून वाजतगाजत घरी येते. हिंदी चित्रपटातील नायक-नायिकांचे विचार बदलले, प्रेमाची पद्धत बदलली, लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोणही बदलला. मात्र, लग्नाच्या प्रथा-परंपरा तशाच राहिल्या. त्यात कधी कथेप्रमाणे गुजराती लग्न आलं, दाक्षिणात्य लग्नंही झालं, ख्रिश्चन पद्धतीही आली. मराठी लग्नपद्धती हिंदीत क्वचितच आली. पण, बॅण्ड, बाजा आणि वरातीची धूम मात्र कायम तीच राहिली आहे.

बदल झाला तो नव्या पिढीच्या विचारांनुसार त्यात अनेक गोष्टींचा पसारा वाढत गेला. ‘बँड बाजा बरात’ या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे दिल्ली, मुंबईसारख्या शहरांत मोठमोठय़ा हॉलमधून दिवसच्या दिवस लग्नाचे शाही सोहळे रंगू लागले. मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये लग्नाची धूमधाम होऊ लागली. हॉटेल्समधून होणारी वऱ्हाडींच्या राहण्याची सोय, मध्यवर्ती भागात वेगवेगळ्या संकल्पनांवर बांधलेले छोटेखानी मंडप, पाहुण्यांची वर्दळ, त्यांच्यात रंगणारे खेळ, पाटर्य़ा-नाचगाणी या गोष्टी हिंदी चित्रपटात हमखास दिसू लागल्या. लग्नाची जय्यत तयारी करून देणाऱ्या वेडिंग प्लॅनरपासून, महेंगा असलेल्या लेहंगा-चोलीपर्यंत अनेक गोष्टींनी चित्रपटांमध्ये कायमची जागा पटकावली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणिती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘हंसी तो फसी’ चित्रपटात तर नायकाने वधू-वरांचा प्रवेश आकाशातून व्हावा, यासाठी वरून खाली येणाऱ्या सोफ्याची व्यवस्था केली होती. त्यात त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार होती. डेस्टिनेशन वेडिंग हाही प्रकार ‘यह जवानी है दीवानी’सारख्या चित्रपटांमधून पाहायला मिळाला. इथे लग्न हॉटेलमध्ये आयोजित करण्याऐवजी जयपूरच्या आलिशान हवेलीत करण्यात आले होते. कॉर्पोरेट्समध्ये नोकरी करणाऱ्या तरुण पिढीबरोबर त्यांच्या लग्नपद्धतींमध्ये लाक्षणिक बदल झालेले चित्रपटांत पाहायला मिळतात.

पारंपरिक पद्धतींबरोबरच लग्नाच्या आधीची मुलांची बॅचलर्स पार्टी हाही विषय चित्रपटातील कथानकात महत्त्वाचा ठरू लागला आहे. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मध्ये मित्राच्या बॅचलर्स पार्टीच्या निमित्तानेच एकत्र आलेल्या तिघांची कथा दिग्दर्शिका झोया अख्तरने रंगवली आहे. पाश्चिमात्यांची आणखी एक पद्धत सिनेमातील लग्नांमध्ये मुरली आहे ती म्हणजे ‘टोस्ट’ करण्याची. लग्नाच्या आधी किंवा त्या दिवशी नवऱ्याबद्दल किंवा नवरीबद्दल त्यांच्या मित्रांनी, आईवडिलांनी त्यांच्याविषयी काही तरी सांगायचे, त्यांना शुभसंदेश द्यायचा. अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई २’मध्येही बदलत्या पुणेरी शैलीत नायक  गौतमविषयी (स्वप्निल जोशी) संपूर्ण प्रधान कुटुंबाने आठवणी सांगितल्या. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटात तर नायिकेने याच समारंभात झ्ॉक इंग्रजीत भाषण ठोकून प्रेक्षकांचीही मनं जिंकली. हा प्रसंग ‘इंग्लिश विंग्लिश’मध्ये खूप छान पद्धतीने चित्रित झाला आहे. विवाहाची चित्रपटातील गाणी हा स्वतंत्र विषय असला तरी ‘इंग्लिश विंग्लिश’चा उल्लेख झाल्यानंतर ‘गौराई माझी लाडाची..’वर ठेका धरल्याशिवाय राहवत नाही. इतको या लग्नानिमित्ताने रंगलेल्या फिल्मी गाण्यांचाही आपल्यावर प्रभाव आहे.

एकीक डे बॉलीवूडपटातील विवाह सोहळ्यांवर पाश्चिमात्य पद्धतींचा पगडा बसत चालला असताना ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ या चित्रपटातून दिल्ली आणि लखनऊच्या गल्ल्यांमधून रंगणारी पारंपरिक शादी आणि तनुचा ठुमकाही प्रेक्षकांना ताल धरायला लावतो. ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ चित्रपटातून हरयाणवी लग्नही प्रेक्षकांना अनुभवता आले. ‘दम लगाके हैशा’मधून बनारसी घाटावरच्या शादीची धमाल तर ‘दावत-ए-इश्क’मधून अजूनही हैदराबादी विवाहांमध्ये हुंडय़ाच्या निमित्ताने होणाऱ्या वाटाघाटीतून पार पडणारे निकाह प्रेक्षकांनी पाहिले. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये आपल्याला स्वत:च्या लग्नात एकदा तरी मेहंगा लेहंगा घालायला मिळावा यासाठी वडिलांशी भांडणारी काव्या (अलिया) पाहायला मिळते. ‘वझीर’मध्येही थोडक्यात का होईना, पण ‘निकाह’चे दर्शन घडतेच. एके काळी बराती, दहेज, सिंदूर, सात फेरे, बिदाई, सुहाग रात अशा ठरावीक शब्दांत अडकलेला तीन तासांचा हिंदी चित्रपट आता त्याबाबतीत कमालीचा बदलला आहे. चित्रपटाच्या निमित्ताने कथा ज्या प्रांतांतून फिरते त्या प्रांतातील विवाह सोहळा आणि त्यानिमित्ताने त्यांच्या लग्नात घडणाऱ्या उलाढाली सिनेमाच्या एका तिकिटात पाहायला मिळतात. कारण पुन्हा एकदा हिंदी चित्रपटांच्या पद्धतीने विचार करायचा झालाच तर ‘लव्हगुरू’ म्हणतात, एक ‘शृंगार’रसातच मानवी स्वभावाच्या सर्व भावभावनांचे तीन तासांत टप्प्याटप्प्याने दर्शन घडवता येते.
रेश्मा राइकवार