13 November 2019

News Flash

हरवलेल्या गावाचा कथात्म शोध!

शिक्षक असलेल्या लेखकाने त्याच्या गावाचे चित्र या पुस्तकातील कथांतून रंगवले आहे.

‘हरवलेलं गाव’ - गंगाधर ढोबळे

आज शहरीकरणाचा रेटा मोठय़ा प्रमाणात आहे. त्यात गावेच हरवून गेलेली दिसतात. हमरस्ता झाला की, ग्रामीण भागाचा चेहरामोहरा पार बदलून जातो आणि कधी एकेकाळी येथे एक गाव होते असे सांगण्याची वेळ येते. गंगाधर ढोबळे यांनी विदर्भातल्या अशाच गावाची कथा ‘हरवलेलं गाव’ या पुस्तकात सांगितली आहे.

शिक्षक असलेल्या लेखकाने त्याच्या गावाचे चित्र या पुस्तकातील कथांतून रंगवले आहे. शिक्षक म्हणून नेमणूक झाल्यानंतरचे पहिल्याच शाळेच्या निमित्ताने आलेले अनुभव ‘पहिली शाळा’ या कथेतून मांडले आहेत. विदर्भाच्या ग्रामीण भागातील शाळा, तिथली माणसे यांच्याविषयी या कथेत वाचायला मिळते. शिक्षक म्हणून लेखकाची गावोगावी बदली होते. अशाच एका गावात असताना लेखकाच्या घराच्या आसपास माकडांचे कळपच्या कळप होते. त्यांच्या करामती ‘माकडं’ या कथेत सांगितल्या आहेत. ‘चुली’, ‘शंकऱ्या’, ‘मनहरलाल’, ‘हरी बा हरी’, ‘पुंजीचं धन खाया’, ‘भोल्या’, ‘दादूबिर’ आदी कथा म्हणजे कथात्मक व्यक्तिचित्रणेच आहेत. मात्र, ही माणसे व त्यांचे स्वभाव यांचे वर्णन या कथा करीत असल्या तरी त्या केवळ कथानायकापुरत्या मर्यादित राहत नाहीत. या माणसांनी निर्माण केलेले माणुसकीचे बंध, गावरहाटी, ग्रामीण संस्कृती यांच्याविषयीची निरीक्षणेही कथनाच्या ओघात येत जातात. आधी शिक्षक असलेले गंगाधर ढोबळे पुढे हिंदी पत्रकारितेत कार्यरत झाले. त्यांच्या या पेशांचा प्रभाव या पुस्तकातील कथनशैलीवर पडलेला जाणवतो. साध्या-सोप्या भाषेत ग्रामीण पर्यावरण टिपत लेखकाने हरवलेल्या गावाचा घेतलेला हा प्रांजळ शोध वाचनीय झाला आहे.

‘हरवलेलं गाव’ – गंगाधर ढोबळे

संधिकाल प्रकाशन

पृष्ठे – १४३, मूल्य – १५० रुपये.

First Published on October 28, 2018 1:48 am

Web Title: book review haravlela gav by gangadhar dhobale