06 July 2020

News Flash

वास्तुकलेच्या विश्वात..

एकूणच वास्तुकलेच्या विश्वाची रंजक तितकीच माहितीपूर्ण सफर हे पुस्तक वाचकांना घडवून आणते.

‘बखर वास्तुकलेची’ - प्रकाश पेठे,

बखर म्हणजे इतिहास किंवा काळ-व्यक्तीचे चरित्र. प्रकाश पेठे यांच्या ‘बखर वास्तुकलेची’ या पुस्तकाचे स्वरूपही बखरीसारखेच आहे. म्हणजे रूढार्थाने ही बखर नव्हे, पण वास्तुकलेचा त्यात घेतलेला आढावा व्यापक आहे. त्यात इतिहास आहे. जुना तसाच नवा काळ आहे. संकल्पना आहेत. वास्तुसंकल्पक आहेत. विविध शहरांतील-देशांतील वास्तू आहेत. त्यातून भारतीय तसेच पाश्चिमात्य वास्तुकलेचा अन्वयार्थ लेखकाने मांडला आहे. स्वत: अनुभवलेले दुसऱ्यांना सांगावे, या हेतूने हे पुस्तक आकाराला आले आहे. वास्तुकलेच्या क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेर जे जे दिसले ते मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. याआधीच्या ‘बडोदा नगराची ओळख’ आणि ‘नगरमंथन’ या पुस्तकांमुळे त्यांच्या विवेचनशैलीची ओळख वाचकांना झाली आहे. हे नवे पुस्तकही त्याच वाटेने जाणारे. परंतु विवेचनाचा पट व्यापक असलेले. पुस्तकातील पहिलेच प्रकरण ‘वास्तुकला’ या संकल्पनेची ओळख करून देते. ‘वास्तुकला आणि वास्तव’ हे त्याचे शीर्षक. त्यात पेठे यांनी लिहिले आहे, ‘वास्तुकला हा व्यक्तीसाठी स्वत:चा आणि समाजाचा शोध असतो.’ परिपूर्ण वास्तू ही तिच्या स्थैर्य, उपयोगिता आणि सौंदर्य या गुणांद्वारे ठरत असते, असे सांगत पहिल्या प्रकरणात पेठे यांनी वास्तुकलेच्या विविध अंगांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. पुढचे प्रकरण हे वास्तुकलेच्या इतिहासाविषयी आहे. त्यानंतरचे ‘नववास्तुकलेच्या शोधात..’ हे प्रकरण अहमदाबाद आणि चंदिगढ या वास्तुकलेतील ‘मॉडर्न मूव्हमेंट’ची उदाहरणे ठरलेल्या शहरांविषयी आहेत. तिथल्या विविध वास्तूंच्या छायाचित्रांमुळे वास्तुकलेतला हा नवविचार समजण्यास मदत होते. पुढचे प्रकरण वास्तुकलेतील नवसर्जनकार ल कॉबुर्झिए यांच्याविषयी आहे. पं. नेहरू यांच्या आग्रहाखातर कॉबुर्झिए स्वित्र्झलडहून भारतात आले. त्यांच्या भारतातल्या आणि इतर ठिकाणच्या वास्तुरचनांची ओळख या प्रकरणात करून दिली आहे. याशिवाय मुंबई तसेच भारतभरातील आणि विदेशातीलही अनवट वास्तुरचनांचा व गगनचुंबी इमारतींचा सचित्र परिचय करून देणारी स्वतंत्र प्रकरणे पुस्तकात आहेत. सार्वजनिक वापरासाठीच्या इमारतींची रचना करताना प्रयोगशीलता आणि खर्च यांचे संतुलन राखत केल्या गेलेल्या रचनांची माहिती एका प्रकरणात दिली आहे. ‘माझे हक्काचे घर’ आणि ‘माझे सखेसोबती’ ही प्रकरणेही आवर्जून वाचावी अशी आहेत. पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात कलात्मक, ऐतिहासिक अशा वास्तूंचे जतन करताना येणाऱ्या अडथळ्यांची आणि शक्यतांची चर्चा केली आहे. एकूणच वास्तुकलेच्या विश्वाची रंजक तितकीच माहितीपूर्ण सफर हे पुस्तक वाचकांना घडवून आणते.

‘बखर वास्तुकलेची’ – प्रकाश पेठे,

ग्रंथाली प्रकाशन,

पृष्ठे- १९६, मूल्य- ३०० रुपये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 1:08 am

Web Title: marathi books review marathi books popular marathi books
Next Stories
1 ‘जंगल बुक’ मराठीत!
2 वाङ्मय-विवेचनाचा साक्षेपी आढावा
3 मिझोरमचा वाटाडय़ा!
Just Now!
X