विज्ञानातील संकल्पना वा घडामोडी सोप्या शैलीत समजावून देणारी पुस्तके मराठीत फारच थोडी आहेत. अशा मोजक्या पुस्तकांत ‘कथा हबल दुर्बिणीची..’ या डॉ. गिरीश पिंपळे लिखित पुस्तकाची नोंद करावी लागेल. खगोलशास्त्रीय संकल्पना विशद करत प्रसिद्ध ‘हबल दुर्बिणी’ची रंजक शैलीत समग्र माहिती देणारे हे पुस्तक आहे. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला दुर्बिणीचा शोध लागला आणि खगोलशास्त्रीय अभ्यासाला नवे वळण मिळाले. नंतरच्या काळात दुर्बिणीच्या रचना आणि क्षमतांमध्येही बदल होत गेले. मानवाला विश्वाचे ज्ञान करून देण्यात या दुर्बिणींनी मोलाची भूमिका बजावलेली आहे. हबल दुर्बिणीमुळे तर खगोलशास्त्राच्या अभ्यासात क्रांतीच झाली. याचे कारण साधारणपणे बसएवढय़ा आकाराची ही हबल दुर्बीण पृथ्वीवर नसून अंतराळात कार्यरत आहे. २४ एप्रिल १९९० पासून पृथ्वीभोवती एका विशिष्ट कक्षेत ती प्रचंड वेगाने घिरटय़ा घालते आहे. त्यामुळे पृथ्वीवरच्या दुर्बिणींप्रमाणे तिला हवेच्या घनदाट आवरणाचा किंवा इतर अडचणींचा सामना करावा लागत नाही. संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणाऱ्या आणि पृथ्वीवरून नियंत्रित होणाऱ्या या दुर्बिणीने आतापर्यंत प्रचंड म्हणावी इतकी माहिती संशोधकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यात कृष्णविवरे, विश्वाचे प्रसरण, दीर्घिकांची निर्मिती, शनी आणि त्याचे उपग्रह, नेपच्यूनचे वातावरण अशा विविध माहितीचा समावेश करता येईल. या साऱ्याचा ज्ञानरंजक वेध या पुस्तकात विस्ताराने घेण्यात आला आहे. आकृत्या, रंगीत छायाचित्रे आणि काही वैज्ञानिक संज्ञा आणि पारिभाषिक शब्दांविषयीची परिशिष्टे यांमुळे पुस्तकातील माहिती समजून घेणे सोपे झाले आहे. खगोलशास्त्रीयच नव्हे, तर एकूणच मानवी ज्ञानाच्या कक्षा रुंदावणाऱ्या हबल दुर्बिणीची ही कथा आवर्जून वाचायलाच हवी.

‘कथा हबल दुर्बिणीची..’

– डॉ. गिरीश पिंपळे, राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- ११४, मूल्य- १६० रुपये