जम्मू-काश्मीरमध्ये इसिसचे झेंडे फडकविणाऱ्या १२ जणांना सुरक्षा रक्षकांनी ओळखले असून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे, असे ज्येष्ठ  अधिकाऱ्याने सांगितले.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ छायाचित्र यांच्या आधारे या युवकांना सुरक्षा रक्षकांनी ओळखले आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे.
काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि इसिसचे झेंडे अलीकडेच फडकाविण्यात आले होते त्यावरून देशात खळबळ माजली होती. या प्रकारानंतर सुरक्षा रक्षकांनी माहितीचे सर्व स्रोत पडताळून पाहिले आणि १२ जणांना ओळखले आहे.
विविध राजकीय पक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती तर काही नेत्यांनी त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. जवळपास १२हून अधिक ठिकाणी इसिसचे झेंडे फडकाविण्यात आले होते. देशात इसिसवर बंदी घालण्यात आली आहे.