थायी नववर्षांची नांदी देणारा ‘सोंगक्रान’ हा तीन दिवसांचा जलमहोत्सव साजरा करण्यासाठी आपल्या जन्मगावाकडे निघालेल्या लोकांपैकी १२०हून अधिक लोक मृत्युमुखी पडले असून एक हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
सोमवारपासून अधिकृतरीत्या सुरू झालेल्या या वार्षिक जलमहोत्सवाची सुरुवात शुक्रवारी संध्याकाळपासून झाली. या महोत्सवानिमित्त कुटुंबीयांना भेटण्यासाठी एकाच वेळी हजारोंच्या संख्येत लोक रेल्वे गाडय़ा, मोटारी, विमाने आणि मोटारसायकलने घराकडे निघाले. परिणामी ठिकठिकाणी झालेल्या रस्ते अपघातांमध्ये आतापर्यंत १२१ लोक ठार, तर १२८१ लोक जखमी झाले आहेत.
या महोत्सवात सहभागी होण्याकरिता आलेल्या विदेशी पर्यटकांसाठी बँकॉकसह थायलंडच्या उत्तरेकडील चियांगमायी हे शहर आवडीचे ठिकाण आहे. जेथे हा महोत्सव साजरा केला जातो, त्या मानम्यार, लाओस आणि कम्बोडियासह अनेक देशांमध्ये या महोत्सवादरम्यान जनजीवन ठप्प होते. सुगंधी पावडर मिसळलेले पाणी यात लोकांवर उडवण्यात येते.