पाकिस्तानी फौजांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून राजौरी जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेनजीक रात्रभर गोळीबार केला. भारतीय फौजांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या क्षेत्रात दोन्ही बाजूंनी सुमारे १५ तास गोळीबार सुरू होता.

राजौरीतील भिंबर गली क्षेत्रात नियंत्रण रेषेनजीक गुरुवारी सकाळी लहान आणि स्वयंचलित शस्त्रांनी गोळीबार सुरू होता. आमच्या फौजांनी त्याला योग्य असे आणि चोख प्रत्युत्तर दिले, असे संरक्षण दलाच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

रात्रभर सुरू असलेला तोफगोळ्यांचा मारा पहाटे साडेतीन वाजता संपला. काही कारण नसताना पाकिस्तानी फौजांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भिंबर गली क्षेत्रात बुधवारी दुपारी साडेचार वाजेपासून गोळीबार सुरू केला होता, असे हा प्रवक्ता म्हणाला.

पाकिस्तानी फौजांनी लहान शस्त्रे, स्वयंचलित शस्त्रे आणि ८२ एमएम मोर्टार बॉम्बचा वापर करून भारतीय चौक्यांना लक्ष्य केले. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळांवर सर्जिकल हल्ले केल्यानंतर पाकिस्तानी फौजांनी नियंत्रण रेषेवर ३० वेळा शस्त्रसंधीचा भंग केला आहे.

 

सहा दहशतवाद्यांच्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न उधळला

जम्मू : कथुआ जिल्ह्य़ातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सहा दहशतवाद्यांच्या एका गटाचा घुसखोरीचा प्रयत्न तुफान धुमश्चक्रीनंतर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी उधळून लावला, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कथुआ जिल्ह्य़ातील बोबिया परिसरात बुधवारी रात्री सहा दहशतवाद्यांच्या एका गटाने आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, या वेळी दहशतवाद्यांनी गस्ती घालणाऱ्या पथकाच्या वाहनावर रॉकेटने हल्ला चढविला आणि त्यानंतर बेछूट गोळीबारही केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा जवान वाहनातून गस्त घालत होते.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, जवळपास २० मिनिटे धुमश्चक्री सुरू होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या सीमेवरील ठाण्याकडूनही त्यांना पाठिंबा मिळत असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी बॉम्बच्या साहाय्याने परिसर प्रकाशमान केला असता दहशतवादी एका जखमी दहशतवाद्याला घेऊन जात असल्याचे दिसले, असेही अधिकाऱ्याने सांगितले.