इतर देशांशी सीमा जोडलेल्या सहा राज्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १७४ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सीमांच्या विकासासाठी हा निधी देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मणिपूर आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट कार्यक्रमांतर्गत (BADP) हा निधी देण्यात आला आहे.

या BADP कार्यक्रमांतर्गत नुकताच आंतरराष्ट्रीय सीमेवरील ० ते १० किमी परिघातील सर्व गावांच्या विकासासाठी निधी देण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छ भारत अभियान, स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम, खेळांचा प्रसार, ग्रामीण पर्यटनाचा प्रसार, सीमा पर्यटन आणि वारसास्थळांचे संरक्षण यांचाही समावेश आहे.

डोंगराळ भागातील दुर्गम भागात हेलिपॅड उभारणे, रस्त्याचे जाळे नसलेल्या ठिकाणी रस्ते बनवणे, आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणे त्याचबरोबर जैविक शेती करणे या सर्वांचा BADP कार्यक्रमात समावेश होतो.

आसामची बांगलादेशसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे. पश्चिम बंगालची नेपाळ आणि भूतानसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे. गुजरातची पाकिस्तानसोबत, मणिपूरची म्यानमारसोबत, उत्तर प्रदेशची नेपाळसोबत तर हिमाचल प्रदेशची चीन आणि नेपाळसोबत आंतरराष्ट्रीय सीमा जोडण्यात आली आहे.