पश्चिम बंगालमध्ये करोना लस घेतलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

प्राथमिकदृष्ट्या ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे हे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आरोग्य विभाग कोणताही निष्कर्ष काढण्याआधी शवविच्छेदन अहवाल तसंच तपास पूर्ण होण्याची वाट पाहत आहे.

“उत्तर बंगालमधील जिल्ह्यांमध्ये ८ मार्च आणि ९ मार्चला कोव्हिशिल्डची लस देण्यात आलेल्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिकदृष्ट्या दोन्ही मृत्यू ह्रदयाशी संबंधित आजारांमुळे झाल्याचा अंदाज आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. मृत व्यक्तींची नावं पारुल दत्ता (७५) आणि कृष्ण दत्ता (६५) अशी आहेत.

आणखी वाचा- कोव्हॅक्सिनचा चाचणी टप्पा पार, आपत्कालीन वापरासाठी परवानगी

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी तीन जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. यासोबतच मृतांची संख्या १० हजार २८६ वर पोहोचली आहे. तसंच करोना रुग्णसंख्या ५ लाख ७७ हजार ५११ इतकी झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या ३११० अॅक्टिव्ह करोना रुग्ण आहेत.