25 April 2019

News Flash

चाबहारमधील बॉम्बस्फोटात दोन ठार, अनेक जखमी

भारताने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

भारताच्या सहकार्याने विकसित होत असलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या शहरातील पोलीस मुख्यालयाबाहेर गुरुवारी झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान दोन जण ठार, तर अनेक लोक जखमी झाले. भारताने या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

चाबहार हे इराणच्या ईशान्येकडील अशांत अशा सिस्तान- बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सीमेपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे. पाकिस्तानातील बलुची फुटीरतावादी आणि सुन्नी मुस्लीम दहशतवादी इराणमधील शिया अधिकाऱ्यांना लक्ष्य बनवून सीमेपलीकडे करत असलेल्या हल्ल्यांमुळे हा भाग संघर्षांचे केंद्र आहे.

या दहशतवादी हल्ल्यात पोलीस दलातील दोघे शहीद झाले, असे प्रांताचे प्रभारी सुरक्षा आयुक्त मोहम्मद हादी मराशी यांनी सरकारी दूरचित्रवाहिनीला सांगितले. चाबहार शहराचे गव्हर्नर रहमदेल बामेरी यांनी आधी ४ लोक ठार झाल्याचे व तितकेच जखमी झाल्याचे सांगितले होते, मात्र नंतर हा आकडा सुधारून दोघांचाच मृत्यू झाल्याचे सांगितले. हल्लेखोरांनी चाबहार पोलीस मुख्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला.

भारताकडून निषेध

दरम्यान, चाबहार शहरात झालेल्या या ‘तिरस्करणीय’ दहशतवादी हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध केला असून, या गुन्ह्य़ाच्या सूत्रधारांना लवकरात लवकर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

भारत हा इराण व अफगाणिस्तानच्या सहकार्याने चाबहार बंदराचा विकास करत आहे. या क्षेत्रातील सामरिक हितासाठी चाबहार हे बंदर अतिशय महत्त्वाचे असल्याचे भारताचे मत आहे. चाबहारमधील दहशतवादी हल्ल्याचा भारत तीव्र निषेध करत असून, इराण सरकार तसेच तेथील लोकांबाबत आणि हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांबाबत आपली शोकसंवेदना व्यक्त करत आहे. या हल्ल्याच्या सूत्रधारांना लवकरात लवकर शिक्षा केली जायला हवी, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

First Published on December 7, 2018 1:14 am

Web Title: 2 killed several injured in suicide bomb attack in iran