काँग्रेसच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जवळपास २४ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप कर्नाटक दौ-यावर असलेल्या भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केला आहे. अमित शाह दोन दिवसांच्या कर्नाटक दौ-यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी २४ कार्यकर्त्यांची हत्या झाली, मात्र कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरल्याचा आरोप केला. सिद्धरमय्या यांचं सरकार पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असून लवकरच भाजपा सरकार सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

‘काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या भाजपा आणि आरएसएस कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. २४ पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून, हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. सिद्धरमय्या सरकारचा शेवट जवळ आला आहे आणि एकदा भाजपा सत्तेत आली की न्याया मिळेल याची खात्री घेऊ’, असं अमित शहा बोलले आहेत.

अमित शाह यांनी म्हैसूर येथूल आजच्या दौ-याची सुरुवात केली. अमित शाह मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्या मतदारसंघाचाही दौरा करणार आहेत. सोबतच येदीयुरप्पा यांच्यासोबत म्हैसूर पॅलेसचा दौरा करत शाही कुटुंबाची भेट घेणार आहेत.

गुरुवारी सिद्धरमय्या यांनी अहिंदू असा उल्लेख केल्याबद्दल अमित शाहांवर टीका केली होती. आधी त्यांनी आपण अहिंदू आहोत की नाही हे स्पष्ट करुन दाखवावं असं आव्हानच त्यांनी केलं. ‘अमित शाह जैन आहेत. आधी त्यांनी आपण अहिंदू आहोत की नाही हे स्पष्ट करावं. जैन हा वेगळा धर्म आहे. ते माझ्याबद्दल असं कसं काय बोलू शकतात’, असं सिद्धरमय्या बोलले होते.