जम्मू काश्मीरच्या शोपियांमधून तीन एसपीओसहित चार पोलीस बेपत्ता झाले आहेत. या सगळ्यांचं अपहरण दहशतवाद्यांनी केलं. त्यापैकी एका पोलिसाला त्यांनी सोडलं असून इतर तिघांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरमधील पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही घटना समोर आली आहे.  शुक्रवारीच शोपियांमध्ये चार पोलिसांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर एका पोलिसाला दहशतवाद्यांनी सोडून दिले.  मात्र इतर तिघांना त्यांनी ठार केले अशी माहिती समोर आली आहे.

बेपत्ता झालेल्या पोलिसांमध्ये तीन विशेष अधिकारी (SPO) आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश होता. यापैकी एका पोलिसाला दहशतवाद्यांनी सोडून दिले. त्यानंतर इतर तीन पोलिसांना दहशतवाद्यांनी ठार केले अशी माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरध्ये पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झाल्यावर दहशतवादी जास्त सक्रिय झाले आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाज याने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या सगळ्या पोलिसांनी राजीनामा द्यावा असा धमकीवजा इशाराच दिला. एवढेच नाही तर कोणीही पोलिसात नव्याने भरती होऊ नये असेही त्याने म्हटले होते.रियाजने जी धमकी दिली त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

रियाज या दहशतवाद्याची एक ऑडिओ क्लिपही समोर आली आहे. यामध्ये त्याने पोलिसांना चार दिवसात नोकरी सोडण्याची धमकी दिली आहे. तसेच एकाही काश्मिरी तरूणाने पोलिसात भरती होऊ नये अशीही धमकी त्याने दिली. मागच्याच महिन्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या १० कुटुंबीयांचे अपहरण केले होते. त्यांची नंतर सुटका करण्यात आली. मात्र याआधीही पोलिसांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याच्या घटना काश्मीर खोऱ्यात घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे.