जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. हा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तानचे जगभरात राहणारे नागरिक भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करत आहेत. अशीच घटना दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये समोर आली. येथील रस्त्यावर शेकडो पाकिस्तानी समर्थकांकडून ‘मोदी दहशतवादी, भारत दहशतवादी’, अशाप्रकारच्या घोषणा दिल्या जात होत्या. घोषणाबाजी करणाऱ्या या शेकडोंच्या जमावाला भाजपाच्या शाझिया इल्मी यांनी सणसणीत उत्तर दिलं. त्यांच्यासोबत दोन अन्य भाजपा आणि आरएसएसचे नेते देखील होते. केवळ तीन भारतीयांनी घोषणाबाजी करणाऱ्या तीनशे पाकिस्तानी समर्थकांना सडेतोड उत्तर दिलं अशा आशयाचं ट्विट करत शाझिया इल्मी यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.

शुक्रवारी(दि.16) भाजपा नेत्या शाझिया इल्मी या काही आरएसएस नेत्यांसह सेऊलमध्ये भारतीय दुतावासात गेल्या होत्या. त्यावेळी थोड्या अंतरावर शेकडो पाकिस्तानी समर्थकांचा जमाव भारतविरोधी घोषणाबाजी करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावर शाझिया इल्मी आणि नेत्यांनी आम्ही भारतातून आल्याचे सांगत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण शाझिया इल्मी यांचं पूर्ण बोलणं न ऐकून घेता त्या जमावाने पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर देशविरोधी आणि मोदींविरोधी नाऱ्यांमुळे चिडलेल्या शाझिया इल्मी यांनी त्या जमावासमोर ‘भारत जिंदाबाद’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ च्या घोषणा देत सणसणीत प्रत्युत्तर दिलं. शाझिया इल्मी आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन नेत्यांनी भारत जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ ट्विटरद्वारे शेअर केला आहे.

पाहा व्हिडिओ –

यानंतर परिस्थिती चिघळत असल्याचं पाहून स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शाझिया इल्मी यांचं भारतीय नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे.