कर्नाटकमधील एका रेल्वेला नियोजित स्थळी पोहोचायला उशीर झाल्याने विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहचू शकले नाहीत. द राणी चेनम्मा एक्स्प्रेस या रेल्वेमध्ये ३००० हून अधिक विद्यार्थी होते. हे विद्यार्थी पोलीस दलातर्फे घेण्यात येणाऱ्या जिल्हा सशस्त्र दलाच्या भरतीसाठी या रेल्वेने जात होते. हे विद्यार्थी बेळगाव आणि धारवाड याठिकाणहून बंगळुरुला जाण्यासाठी निघाले होते. रात्री १० वाजता हुबळीच्या जवळ या रेल्वेला तांत्रिक अडचण आल्याने तिला पोहोचण्यास उशीर झाला. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र ती दुपारी ३.३० वाजता पोहोचली. विद्यार्थ्यांची परीक्षा १०.३० वाजता असल्याने ते परीक्षेला उपस्थित राहू शकले नाहीत.

परीक्षी बुडल्याने विद्यार्थी चिंतेत होते. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुर्नपरीक्षा जाहीर केल्याने त्यांना दिलासा मिळाला. कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी. कुमारस्वामी यांनी ३ हजारहून जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा बुडल्याने ती परत घेतली जाणार असल्याचे जाहीर केले. त्याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत माहिती दिली. या ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे, राणी चेनम्मा एक्स्प्रेस बंगळुरुला पोहोचायला उशीर झाल्याने जिल्हा सशस्त्र दलाची परीक्षा पुन्हा घेण्याल येईल. तर हुबळीच्या सेंटरलाही याची परवानगी असेल. असे प्रकार कसे टाळता येतील यासंदर्भात रेल्वे प्रशासनाशीही चर्चा केली जाईल असे ते म्हणाले. तर हुबळी- धारवाड येथील पोलीस आयुक्त एमएन नागराज यांनी विद्यार्थ्यांनी त्यांचे रेल्वे तिकीट आणि परीक्षेचे हॉलतिकीट तपासणीसाठी जमा करावे असे आवाहन केले आहे.

कोल्हापूरहून दुपारी २.०५ वाजता सुटणारी ही रेल्वे दुसऱ्यादिवशी सकाळी ६.४५ ला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र ही रेल्वे धारवाडपासून २६ किलोमीटरवर असलेल्या कंबारगानवी येथे रात्री १० च्या दरम्यान थांबली. मालवाहतूक करणाऱ्या दुसऱ्या एका रेल्वेच्या इंजिनात बिघाड झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. या मालवाहू रेल्वेने गोव्यातून जिंदाल याठिकाणी कोळसा वाहून आणण्यात येत होता. या मार्गावर एकच रेल्वे रुळ असल्याने समोरुन येणारी चेनम्मा एक्स्प्रेस थांबविण्यात आली. रेल्वेला केवळ दिड तास उशीर झाला असता मात्र रेल्वे थांबविण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी रेल्वेतून उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केल्याने आणखी तीन तास उशीर झाला असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.