जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी केलेल्या हल्ल्यात बिगर काश्मिरी असलेले पाच मजूर ठार झाले आहेत. तर इतर एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. मारले गेलेले सर्वजण पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी होते.

दहशतवाद्यांनी हा हल्ला अशा वेळी केला जेव्हा युरोपियन युनियनच्या २७ जणांचे प्रतिनिधीमंडळ काश्मीरच्या दौऱ्यावर आले आहे. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला वेढा दिला असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. याशिवाय अतिरिक्त सुरक्षा दलांनाही पाचारण करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा संपवल्यानंतर चिडलेल्या दहशतवाद्यांनी आता ट्रक ड्रायव्हर, व्यापारी आणि इतर राज्यांतील मजुरांना टार्गेट केले आहे. यापूर्वी देखील दहशतवाद्यांनी बिगर काश्मिरी मजुरांची हत्या केली होती. गेल्या १५ दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी ४ ट्रक ड्रायव्हर, एक सफरचंदाचा व्यापारी आणि दुसऱ्या राज्यातून आलेल्या ६ मजुरांची हत्या केली आहे.

दरम्यान, गुप्तचर यंत्रणांनी जम्मू-काश्मिर आणि राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर लगेचच ही घटना घडली आहे.